"नाव फायनल होऊनही प्रोजेक्टमधून काढलं...", सावळ्या रंगामुळे डावललं, मराठी अभिनेत्रीने सांगितली इंडस्ट्रीची रिअॅलिटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 15:54 IST2026-04-22T15:35:32+5:302026-04-22T15:54:59+5:30
रंगामुळे नाकारलेलं काम; मराठी अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ कटू अनुभव

"नाव फायनल होऊनही प्रोजेक्टमधून काढलं...", सावळ्या रंगामुळे डावललं, मराठी अभिनेत्रीने सांगितली इंडस्ट्रीची रिअॅलिटी
Madhuri Pawar: मनोरंजन क्षेत्रात काम करताना अनेक कलाकारांना सावळ्या रंगामुळे भेदभावाला सामोरं जावं लागतं. अनेकदा गोऱ्या वर्णाच्या कलाकारांना मालिका किंवा सिनेमांत मुख्य भूमिकांसाठी विचारणा होते. मात्र सावळ्या रंगामुळे अनेक कलाकारांमध्ये टॅलेंट असूनही त्यांना डावललं जातं. आपल्या करिअरमध्ये अनेक कलाकारांना वर्णभेदाचा सामना करावा लागतो.असाच वर्णभेदाचा सामना एका मराठी अभिनेत्रीला सहन करावा लागला होता. ही अभिनेत्री म्हणजे माधुरी पवार. नुकत्याच एका
'देवमाणूस','तुझ्यात जीव रंगला'तसंच 'रानबाजार' या कलाकृतींमुळे अभिनेत्री माधुरी पवार घराघरांत पोहोचली. याशिवाय माधुरी एक उत्तम नृत्यांगणा देखील आहे. अलिकडेच ती स्टार प्रवाह वाहिनीवरील 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत झळकली. नुकतीच माधुरी पवारने सर्वकाही ला मुलाखत दिली. यादरम्यान, तिने इंडस्ट्रीत तिला इंडस्ट्रीत आलेले कटू अनुभव शेअर केले.
या मुलाखतीत माधुरी म्हणाली," माझ्या आयुष्यात जन्मापासून बाहेरच्या काही लोकांनी आणि आता मी जिथे काम करते तिथेही काही लोक आहेत, त्यांना वाटतं की सावळा रंग आहे मग एका सावळ्या रंगाच्या मुलीला हिरोईन म्हणून कसं पदार्पण द्यावं. असं अनेकदा होतं. मी कधीकधी माझी प्रोफाईल काही लोकांना पाठवते, शिवाय कधीकधी मला असंही समजतं की, एखाद्या प्रोजेक्टमध्ये माझं नाव फायनल केलेलं असताना अचानक मला काढून टाकलं जातं.माझ्या रंगामुळे मला अनेकदा असं होतं. याचं प्रमाण आता कमी झालं असेल, पण अजूनही इंडस्ट्रीत हे होतं."
त्यानंतर पुढे माधुरी म्हणाली,"आपल्याकडे लोकांनी सुंदरतेची एक व्याख्या करून ठेवली आहे. एक गोरी, छान, सुंदर, सडपातळ आणि तिची त्वचा फार तुकतुकीत असं एक बंबाड केलं गेलं आहे. पण, मी जेव्हा स्मिता पाटील तसेच बिपाशा बसू यांना बघते तेव्हा फार छान वाटतं. आता मला लोकांच्या सकारात्मक प्रतिक्रिया येतात. वॉव,यू लूकिंग ब्लॅक कॅट किंवा सावळी सुंदरी अशा कमेंट माझ्या फोटोंवर येतात. मला असं वाटतं प्रेक्षक माझ्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहतात. त्यांना मी त्या रंगात, रुपात आवडते. " असं मत अभिनेत्रीने व्यक्त केलं.