वडिलांच्या निधनामुळे भाऊ कदम झाले एकाकी शांत; म्हणाले..'वडील गेले आणि घरची...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 09:59 IST2026-04-30T09:59:11+5:302026-04-30T09:59:45+5:30
Bhau kadam: इतरांना हसवणाऱ्या भाऊ कदम यांनी खऱ्या आयुष्यात अनेक दु:ख, संकटांचा सामना केला आहे.

वडिलांच्या निधनामुळे भाऊ कदम झाले एकाकी शांत; म्हणाले..'वडील गेले आणि घरची...'
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता, विनोदवीर म्हणजे भाऊ कदम. आपल्या दमदार अभिनय आणि विनोदबुद्धीच्या जोरावर आजवर त्यांनी अनेकांना हसवलं आहे. परंतु, इतरांना हसवणाऱ्या भाऊ कदम यांनी खऱ्या आयुष्यात अनेक दु:ख, संकटांचा सामना केला आहे. वडिलांच्या निधनानंतर घरची सगळी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली ज्यामुळे त्यांच्यातील खोडकरपणा कुठेतरी हरवून गेला.
अलिकडेच भाऊ कदम यांनी सागर खापरे यांच्या पॉडकास्टला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य केलं. पडद्यावर दिलखुलासपणे वावरणारे भाऊ कदम एकदम शांत असतात, असा खुलासा त्यांनी यावेळी केला. तसंच त्या मागचं कारणही त्यांनी सांगितलं.
''मी घरी खूप शांत असतो. माझे वडील गेल्यानंतर घरची सगळी जबाबदारी माझ्यावर आली त्यामुळे मी शांत झालो. मस्ती वगैरे मी काहीच करत नाही. फार शांत असतो. मी घरी असतांना जर कोणी मला या रुपात पाहिलं तर मीच तो भाऊ कदम आहे यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. आम्ही पूर्वी फार लहान घरात रहायचो. पण, आता ३ बीएचके घर घेतलं आहे'', असं भाऊ कदम म्हणाले.
या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या पत्नीविषयी, तिच्या रागाविषयीदेखील भाष्य केलं. 'जर पत्नी चिडली तर आपण गप्प बसायचं. आणि जर ती वैतागलेली असेल तरीदेखील गप्पच बसायचं', असं त्यांनी विनोदी अंदाजात म्हटलं.