तुझ्यासोबत लग्न करण्याची आणखी वाट पाहू शकत नाही! प्रसिद्ध अभिनेत्रीने बॉयफ्रेंडसोबत केला साखरपुडा, कॅप्शन चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 17:03 IST2026-01-21T17:00:49+5:302026-01-21T17:03:33+5:30
टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रीने वयाच्या २९ व्या वर्षी बॉयफ्रेंडसोबत साखरपुडा केला आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या रोमँटिक कॅप्शनची चर्चा आहे

तुझ्यासोबत लग्न करण्याची आणखी वाट पाहू शकत नाही! प्रसिद्ध अभिनेत्रीने बॉयफ्रेंडसोबत केला साखरपुडा, कॅप्शन चर्चेत
सध्या सर्वत्र लगीनघाई दिसतेय. नुकतीच 'अशोक मा.मा.' फेम अभिनेत्री रसिका वाखारकरने लग्न केलं. अशातच रसिकानंतर टीव्ही इंडस्ट्रीतील आणखी एका अभिनेत्रीच्या घरी लगीनघाई सुरु आहे. ही अभिनेत्री म्हणजे सृष्टी जैन. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री सृष्टी जैन हिच्या आयुष्यात सध्या आनंदाचे वातावरण आहे. सृष्टीने तिचा मित्र आणि बॉयफ्रेंड श्रेय गुप्ता याच्याशी साखरपुडा केला असून, या सोहळ्याचे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
सृष्टी आणि श्रेय गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. अखेर त्यांनी साखरपुडा करत सर्वांना एक सुखद धक्का दिला आहे. या खास प्रसंगी सृष्टीने अतिशय सुंदर ड्रेस परिधान केला होता, तर श्रेयने देखील पारंपरिक पोशाख परिधान केला होता. दोघांनीही सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. 'मी तुझ्यासोबत लग्न करण्याची आणखी वाट पाहू शकत नाही!', असं खास कॅप्शन देत सृष्टीने तिच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.
कोण आहे सृष्टी जैन?
सृष्टी जैन ही टीव्ही जगतातील एक ओळखीचा चेहरा आहे. तिने 'मेरी दुर्गा', 'सुहानी सी एक लडकी' आणि 'हमारी वाली गुड न्यूज' यांसारख्या प्रसिद्ध मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. सृष्टीने साखरपुड्याचे फोटो शेअर करताच तिचे चाहते आणि टीव्ही इंडस्ट्रीतील कलाकारांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. "खूप सुंदर जोडी", "तुमच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा" अशा कमेंट्स करुन लोकांनी या जोडीला प्रेम दिलं आहे.