'बिग बॉस मराठी'च्या महाअंतिम सोहळ्यात अभिषेक बच्चन आणि जिनिलियाची एन्ट्री, पाहा प्रोमो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 18:53 IST2026-04-19T18:50:00+5:302026-04-19T18:53:21+5:30
'बिग बॉस मराठी'च्या ग्रँड फिनालेमध्ये बॉलिवूडचा 'ज्युनिअर बी' म्हणजेच अभिषेक बच्चन आणि महाराष्ट्राची लाडकी 'वहिनी' जिनिलिया देशमुख खास पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

'बिग बॉस मराठी'च्या महाअंतिम सोहळ्यात अभिषेक बच्चन आणि जिनिलियाची एन्ट्री, पाहा प्रोमो
अवघ्या महाराष्ट्राला ज्या क्षणाची प्रतीक्षा होती, तो क्षण अखेर येऊन ठेपला आहे. प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणाऱ्या 'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या पर्वाचा महाअंतिम सोहळा आज सायंकाळी आठ वाजता कलर्स मराठीवर रंगणार आहे. मात्र, या सोहळ्याची खरी रंगत वाढणार आहे ती म्हणजे मंचावर येणाऱ्या दोन सुपरस्टार पाहुण्यांमुळे. या ग्रँड फिनालेमध्ये बॉलिवूडचा 'ज्युनिअर बी' म्हणजेच अभिषेक बच्चन आणि महाराष्ट्राची लाडकी 'वहिनी' जिनिलिया देशमुख खास पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
कलर्स मराठीने नुकत्याच शेअर केलेल्या प्रोमोमध्ये या दोघांची धडाकेबाज एन्ट्री पाहायला मिळत आहे. रितेश देशमुखचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या 'राजा शिवाजी' या आगामी भव्य चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त हे कलाकार 'बिग बॉस'च्या मंचावर दाखल झाले. या सोहळ्यासाठी जिनिलियाने अतिशय सुंदर असा मराठमोळा लूक केला होता. निळ्या रंगाची इरकल साडी, पारंपरिक दागिने आणि केसात माळलेला गजरा अशा मोहक रूपात जिनिलियाने प्रेक्षकांची मने जिंकली.
रितेशने मंचावर तिचं अत्यंत प्रेमाने स्वागत केलं. मंचावर आल्यानंतर जिनिलियाने घरातील स्पर्धकांशी संवाद साधला. यावेळी वाईल्ड कार्ड स्पर्धक संस्कृती साळुंके हिने जिनिलियाला एक मिश्किल प्रश्न विचारला. संस्कृती म्हणाली, "मंचावर तर 'रितेशचा धक्का' बसतो, पण तुमच्या घरी असा कोणता धक्का पार पडतो का? आणि घरी होस्ट कोण असतं?". यावेळी जिनिलिया हसत-हसत म्हणाली, "आमच्या घरी फक्त वहिनीचा धक्का असतो. अहो बरोबर ना?". यावर रितेश मान डोलवत हो म्हणताना दिसला.
जानेवारी महिन्यात सुरू झालेला हा शो आता शेवटच्या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचला. सुरुवातीला १७ स्पर्धक 'बिग बॉस'च्या घरात सदस्य म्हणून दाखल झाले. अगदी पहिल्या दिवसापासूनच स्पर्धकांमध्ये अटीतटीचा सामना दिसून आला. यामधून प्रत्येक आठवड्यात एक एक स्पर्धक बाहेर पडले आणि सरते शेवटी घराला टॉप ५ स्पर्धक मिळाले. राकेश बापट, विशाल कोटियन, तन्वी कोलते, दीपाली सय्यद आणि अनुश्री माने यांच्यापैकी ट्रॉफी कोण उचलणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, रितेश देशमुख दिग्दर्शित 'राजा शिवाजी' सिनेमा येत्या १ मे २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.