"सर तुम्ही लय भारी…" अनुश्री मानेची रितेश देशमुखसाठी खास पोस्ट, 'राजा शिवाजी' चित्रपटाला दिल्या शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 13:13 IST2026-04-21T13:13:35+5:302026-04-21T13:13:49+5:30
अनुश्रीने रितेशसाठी खास पोस्ट लिहिली आहे.

"सर तुम्ही लय भारी…" अनुश्री मानेची रितेश देशमुखसाठी खास पोस्ट, 'राजा शिवाजी' चित्रपटाला दिल्या शुभेच्छा
Anushree Mane : 'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या पर्वाचा महाअंतिम सोहळा रविवारी पार पडला. तन्वी कोलते, राकेश बापट, विशाल कोटियन, अनुश्री माने आणि दिपाली सय्यद हे या पर्वाचे टॉप ५ सदस्य होते. या चुरशीच्या स्पर्धेत अनुश्री माने हिचा प्रवास संपला असून ती चौथ्या क्रमांकावर बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली आहे. घरातून बाहेर पडल्यानंतर अनुश्रीने रितेश देशमुखसोबतचा एक सुंदर फोटो शेअर करत चाहत्यांसाठी आणि रितेशसाठी खास पोस्ट लिहिली आहे.
अनुश्रीने महाअंतिम सोहळ्यातील रितेशसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंसोबत लांबलचक पोस्ट लिहून अनुश्रीनं रितेशबद्दलचा आदर व्यक्त करत त्यांच्या आगामी ऐतिहासिक सिनेमाला मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत. तिनं लिहलं, "रितेश सर, तुम्ही खऱ्या अर्थाने 'लय भारी' आहात..! बिग बॉस मराठीचा हा प्रवास माझ्यासाठी खरंच अविस्मरणीय होता, ह्या १०० दिवसांत अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या; त्यात झालेली प्रत्येक चूक सुधारण्यासाठी ‘भाऊच्या धक्क्यावर’ तुम्ही करत असलेले मार्गदर्शन आणि चांगल्या गेमबद्दल करत असलेलं कौतुक नेहमीच प्रेरणादायी ठरलं", अशी भावना तिने व्यक्त केली.
रितेश देशमुखचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला शुभेच्छा देत अनुश्री म्हणाली, "विशेष म्हणजे तुमचा, अखंड हिंदुस्थानाचे आराध्यदैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाज्वल्य इतिहास दाखवणारा ऐतिहासिक 'राजा शिवाजी' या स्वप्नवत प्रकल्पासाठी तुम्हाला आणि सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा! हा सिनेमा नक्कीच इतिहास रचणार..! जय जिजाऊ | जय शिवराय".
अनुश्रीने आपल्या चाहत्यांना हा ऐतिहासिक चित्रपट पाहण्याचे आवाहनही केले आहे. "सर्वांनी नक्कीच हा चित्रपट महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे ला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन बघावा", असे सांगत तिने 'जय जिजाऊ, जय शिवराय'च्या घोषणेने आपल्या पोस्टचा शेवट केला आहे. अनुश्रीच्या या पोस्टवर रितेशचे चाहते आणि बिग बॉस प्रेमींकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.