TMKOC मध्ये मोठा बदल, 'बापूजी' मालिका सोडणार? नव्या प्रोमोमुळे वाढला सस्पेन्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 16:20 IST2026-04-27T16:19:53+5:302026-04-27T16:20:57+5:30
काय आहे हा प्रोमो?

TMKOC मध्ये मोठा बदल, 'बापूजी' मालिका सोडणार? नव्या प्रोमोमुळे वाढला सस्पेन्स
'तारक मेहता का उल्टा चश्मा' या लोकप्रिय मालिकेचा नवा प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. १६ वर्षांपासून प्रेक्षकांना खळखळून हसवणारी ही मालिका अचानक एका गंभीर वळणावर येऊन ठेपली आहे. मालिकेतील सर्वात लोकप्रिय पात्र 'बापूजी' म्हणजेच चंपकलाल गडा हे आता मालिका सोडणार का? असा प्रश्न या प्रोमोमुळे चाहत्यांना पडला आहे. काय आहे हा प्रोमो?
या प्रोमोची सुरुवात एका अनपेक्षित घटनेने होते. चंपकलाल गडा म्हणजेच बापूजी कोणालाही काहीही न सांगता अचानक घरातून बेपत्ता होतात. यामुळे संपूर्ण गोकुळधाम सोसायटीत खळबळ माजते. जेठालाल अत्यंत व्याकुळ होऊन आपल्या वडिलांचा शोध घेत घरोघरी फिरतो, मात्र कोणाकडेच बापूजींचा पत्ता नसतो. बापूजी आपला फोनही घरीच विसरल्याने तणाव अधिकच वाढतो.
प्रोमोमधील चिंतेचं वळण तेव्हा येतं जेव्हा जेठालाल एका व्यक्तीला फोन करतो आणि पलीकडून "बापूजी गेले... ते आपल्याला सोडून गेले," असे शब्द कानावर पडतात. हे ऐकताच जेठालालचा संयम सुटतो आणि तो ढसाढसा रडू लागतो. यावरुन बापूजी मालिका सोडत आहेत का अशी चर्चा नेटकऱ्यांमध्ये रंगली. तर दुसरीकडे यामागे नक्कीच काहीतरी गैरसमज असणार असं चाहते म्हणत आहेत.
अनेकदा मालिकांमध्ये प्रेक्षकांची उत्सुकता वाढवण्यासाठी भावनिक ट्रॅकचा वापर केला जातो. बापूजींचा मृत्यू झाला नसून ते फक्त कुठेतरी निघून गेल्याचंही कथानक असू शकतं. अमित भट्ट हे मालिका सोडणार असल्याच्या चर्चा चाहत्यांमध्ये असल्या, तरी अद्याप निर्मात्यांनी किंवा स्वतः अभिनेत्याने याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी केलेली नाही. बापूजी खरोखरच बेपत्ता झाले आहेत की हा काही वेगळाच गोंधळ आहे, याचा उलगडा आगामी भागांमध्ये होईलच. मात्र, इतक्या वर्षांनंतरही 'तारक मेहता...'ची टीम प्रेक्षकांना अशा प्रकारे आश्चर्यचकित करण्यात यशस्वी ठरली आहे.