मराठवाड्यातील सामान्य कुटुंबातील मुलगा आज गाजवतोय टीव्ही इंडस्ट्री, 'आनंदी' मालिकेत करतोय काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 12:53 IST2026-05-05T12:51:58+5:302026-05-05T12:53:18+5:30
मराठी टीव्ही इंडस्ट्रीत सामान्य कुटुंबातून अनेक मुलं पुढे येऊन इंडस्ट्रीत मेहनत घेऊन स्वतःचं नाव कमावतात. अभिनेता अमर जाधव यापैकीच एक

मराठवाड्यातील सामान्य कुटुंबातील मुलगा आज गाजवतोय टीव्ही इंडस्ट्री, 'आनंदी' मालिकेत करतोय काम
मराठी टीव्ही इंडस्ट्रीत सामान्य कुटुंबातून अनेक मुलं पुढे येऊन इंडस्ट्रीत मेहनत घेऊन स्वतःचं नाव कमावतात. अभिनेता अमर जाधव यापैकीच एक. अमर जाधवने याआधी विविध भूमिकांमधून प्रेक्षकांनी पाहिले आहे. ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ या मालिकेतील कावेबाज-खलनायकी ‘गौरव सारडा’ आणि ‘आप्पी आमची कलेक्टर’मधील साधा-भोळा ‘अनिल सर’ या अमरच्या भूमिका विशेष गाजल्या.
याशिवाय ‘येड लागलं प्रेमाचं’मधील ‘प्रशांत दाजी’ या भूमिकेवर प्रेक्षकांनी अक्षरशः प्रेमाचा वर्षाव केला. ‘धर्मवीर २’ या चित्रपटातही अमरने भूमिका साकारली असून, दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या ‘राकेश मारिया’ या आगामी हिंदी चित्रपटातही ते झळकणार आहेत. सध्या अमर 'आनंदी' मालिकेत झळकणार आहे.
‘आनंदी’ मालिकेतील ‘अभय’ या आपल्या भूमिकेबद्दल बोलताना अमर जाधव म्हणाला, “सोल प्रोडक्शन आणि स्टार प्रवाहसोबत पुन्हा काम करताना मला खूप आनंद आणि उत्साह वाटतो आहे. ‘अभय’ ही भूमिका प्रेक्षकांना नक्की आवडेल. अभय हा अत्यंत आज्ञाधारक, गुणी आणि कुटुंबवत्सल मुलगा आहे. तो ‘Work is Worship’ या तत्वावर विश्वास ठेवतो. मात्र, त्याच्या याच स्वभावामुळे त्याच्या आयुष्यात अनेक अनपेक्षित घटना घडतात, ज्यामुळे कथेला वेगळी वळणं मिळतात. ज्या बघायला प्रेक्षकांना नक्की मजा येईल.''
अत्यंत संघर्षातून स्वतःचा मार्ग तयार करणाऱ्या अभिनेत्यांपैकी अमर जाधव एक आहे. मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील साध्या कुटुंबातून तो पुढे आला. त्याच्या वडिलांचा शेतीचा व्यवसाय आहे. इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. आपल्या मेहनतीने आणि जिद्दीने सिनेसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या या अमरला भविष्यातही चांगल्या भूमिका मिळतील अशी त्याच्या चाहत्यांची आशा आहे.