'हँडसम हंक' अभिनेता राकेश बापट दुसरं लग्न करणार का? म्हणाला, "आता रिस्टार्ट..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 17:01 IST2026-05-01T15:46:55+5:302026-05-01T17:01:03+5:30

राकेश बापटने सांगितला त्याचा प्लॅन

बिग बॉस मराठी ६ मधून नुकताच बाहेर आलेला सर्वांचा लाडका राकेश बापट चर्चेत आहे. राकेश बिग बॉस मराठी सीझन ६ चा रनर अप ठरला.

बिग बॉसच्या घरात असताना राकेशने बऱ्याचदा वैयक्तिक आयुष्यावर भाष्य केलं. यावेळी त्याने एक्स वाईफ रिद्धी डोगराचा अनेकदा उल्लेख केला. तर आता त्याने दुसरं लग्न करणार का? यावरही उत्तर दिलं आहे.

'मित्र म्हणे'ला दिलेल्या मुलाखतीत राकेश बापट म्हणाला, " मी आणि रिद्धी पहिल्या दिवसापासूनच खूप चांगले मित्र आहोत. ८ वर्ष आम्ही एकत्र होतो. आयुष्य खूप सुंदर होतं. चढउतार येतच असतात. पण कुठेतरी बिनसतं. मतभेद होतात."

"तेव्हाच आम्ही ठरवलं की आपली मैत्री खूप महत्वाची आहे. त्यामुळे आपल्या या वादात मैत्रीही संपू नये. यासाठी वेळीच निर्णय घेणं महत्वाचं आहे."

"तसंच तिच्या आयुष्यात कोणीतरी दुसरं असायला किंवा माझ्या आयुष्यात कोणी दुसरं यायलाही जागा मिळेल. एकमेकांना ती संधीही दिली पाहिजे.आमच्या दोघांचेही हेच विचार होते."

आम्ही करिअरमध्ये खूप व्यग्र होतो. लग्न झालं तेव्हा आम्ही यशाच्या शिखरावर होतो. त्यात मुंबईत आम्ही दोघंच राहायचो. बाकी फॅमिली आमच्यासोबत नव्हती. त्यामुळे आम्ही कधीच मुलांचा विचार केला नाही. तो जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय होता. "

"मग मित्र म्हणून आम्ही खूप चांगले आहोत त्यामुळे उगीच खेचत बसण्यापेक्षा नवरा बायकोचं नातं थांबवलेलं बरं असा आम्ही निर्णय घेतला. बांद्रा कोर्टात अगदी शांततेत घटस्फोट झाला. आम्ही नंतर मित्रमंडळींना बोलवून घटस्फोटाची पार्टीही दिली."

"आता पुन्हा लग्न करायची सध्या तरी माझी इच्छा नाही. मी स्वत:सोबतच खूप खूश आहे. कधी कधी मी अगदीच रिकामाही असतो. तेव्हा मी काहीही विचार करत नाही. जग कुठे चाललंय मी मागे राहिलो असा काहीच विचार नसतो."

"मी आज काहीही करणार नाही असं मी माझ्या शरीराला सांगतो. नंतर अचानक 'रिस्टार्ट' असं मनात येतं आणि पुन्हा मी कामाला लागतो. त्यामुळे असं छान निवांत आयुष्य सुरु असताना मला सध्या जोडीदाराची गरज नाही."