'उत्तर रामायण'मधले लव-कुश आठवतायेत? स्वप्नील जोशी आज लोकप्रिय अभिनेता, पण 'लव' कुठेय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 12:44 IST2026-04-29T12:32:30+5:302026-04-29T12:44:14+5:30

'उत्तर रामायण'मधला कुश म्हणजे स्वप्नील जोशी सगळ्यांनाच माहित आहे. पण 'लव'च्या भूमिकेत दिसलेला कलाकार आता काय करतो माहितीये का? फोटो ओळखणंही कठीण

८० च्या दशकात दूरदर्शनवर रामानंद सागर यांची 'रामायण' मालिका लोकप्रिय झाली होती. नंतर त्यांची 'उत्तर रामायण' मालिका आली.

यामध्ये लव-कुश च्या भूमिकेतील बालकलाकारांनाही प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं. या दोन्ही छोट्या अभिनेत्यांनी त्यांच्या टॅलेंटने मन जिंकलं होतं.

मालिकेत 'कुश'ची भूमिका अभिनेता स्वप्नील जोशीने साकारली. स्वप्नील जोशी मराठी सिनेविश्वातलं आघाडीचं नाव आहे. अनेक दशकांपासून तो इंडस्ट्रीत काम करत आहे.

तर दुसरीकडे 'लव'ची भूमिका साकारणारा अभिनेता आज कुठे आहे माहितीये का? मयुरेश क्षेत्रमाडेने या कलाकाराने ती भूमिका साकारली होती. आज मयुरेश हा कोटींच्या संपत्तीचा मालक आहे.

अनेकांना वाटले होते की मयुरेश अभिनयातच करिअर करेल, मात्र त्याने वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी चंदेरी दुनियेचा निरोप घेतला. केवळ प्रसिद्धीच्या मागे न धावता त्याने आपल्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्याचा मोठा निर्णय घेतला.

अभिनयापासून दुरावल्यानंतर मयुरेश शिक्षणासाठी अमेरिकेला गेला. तिथे त्याने फायनान्समध्ये उच्च शिक्षण पूर्ण केले आणि कॉर्पोरेट जगतात आपली वेगळी ओळख निर्माण करण्यास सुरुवात केली.

नंतर त्याने वर्ल्ड बँकेत संशोधक म्हणून काम केलं. मयुरेशच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, त्याने २००३ मध्ये 'वर्ल्ड बँक' सारख्या नामांकित संस्थेत संशोधक म्हणून काम केले. अनेक वर्षे तिथे अनुभव घेतल्यानंतर त्याने बिझनेस आणि मार्केटिंगच्या क्षेत्रात पाऊल ठेवले.

मयुरेशच्या कष्टाचे फळ त्याला २०१६ मध्ये मिळाले, जेव्हा त्याची 'कमिशन जंक्शन' या जागतिक मार्केटिंग प्लॅटफॉर्म कंपनीच्या CEO पदी नियुक्ती करण्यात आली. एका बालकलाकाराने कॉर्पोरेट विश्वाच्या शिखरावर पोहोचणे ही सर्वांसाठीच प्रेरणादायी गोष्ट ठरली.

मयुरेशच्या नेतृत्वाखाली या कंपनीने मोठी प्रगती केली. २०२२ पर्यंत त्याने आपल्या मेहनतीच्या जोरावर कंपनीचा महसूल तब्बल १४०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचवला. अभिनयातील 'लव' आता बिझनेस विश्वातील एक दिग्गज नाव बनले आहे.

मयुरेश क्षेत्रमाडे याचा हा प्रवास हेच सिद्ध करतो की, सुरुवातीच्या यशानंतरही जिद्द आणि शिक्षणाच्या जोरावर आपण आयुष्यात कोणतेही शिखर सर करू शकतो. आज तो कॉर्पोरेट किंग असला तरी, चाहत्यांसाठी तो आजही त्यांचा लाडका 'लव'च आहे.