Gauahar Khan : 20 वर्षे इंडस्ट्रीत काम करूनही गौहर खानला 'या' कारणामुळे वाटतं खूप नर्वस, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 01:49 PM2024-02-22T13:49:54+5:302024-02-22T14:14:38+5:30

Gauahar Khan : गौहर जवळपास 20 वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करत आहे.

अभिनेत्री-होस्ट गौहर खान आपल्या कामाबद्दल नेहमीच खूप सीरियस असते. बाळाला जन्म दिल्यानंतर काही महिन्यांतच तिने पुन्हा कामाला सुरुवात केली. काही दिवसांपूर्वी गौहरही तिच्या ट्रान्सफॉर्मेशनमुळे जोरादार चर्चेत आली होती.

गौहर जवळपास 20 वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करत आहे. मात्र अलीकडेच गौहरने सांगितले की, 20 वर्षे इंडस्ट्रीत काम केल्यानंतरही तिला अजूनही नर्वस वाटतं. अभिनेत्रीने स्वत:च हा खुलासा केला आहे.

अभिनेत्रीने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती सोफ्यावर बसून आराम करताना दिसत आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 2 दशकं इंडस्ट्रीत काम केल्यानंतरही मी शूटच्या आधल्या रात्री नेहमीच नर्वस होते असं म्हटलं आहे.

सध्या गौहर खान झलक दिखला जा डान्स रिएलिटी शोमध्ये दिसत आहे. ती ऋत्विक धनजानीसोबत होस्टिंग करत आहे. शोमधील तिचं होस्टिंग अनेकांना फार आवडत आहे.

गौहरने मॉडेलिंगपासून सुरुवात केली होती. तिने फेमिना मिस इंडियामध्येही भाग घेतला आणि चौथा क्रमांक मिळवला. गौहरने 2004 मध्ये चित्रपटांमध्ये प्रवेश केला. पहिल्या गाण्यात स्पेशल अपीरियन्स होता. त्यानंतर 2009 मध्ये ती रॉकेट सिंगमध्ये दिसली होती.

अभिनेत्रीने वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई, गेम, इशकजादे, क्या कूल हैं हम 3, फीवर, बद्रीनाथ की दुल्हनिया, बेगम जान, तेरा इंतजार, नाइन आवर्स इन मुंबई असे चित्रपट केले. 14 फेरे या चित्रपटात दिसली होती.

गौहरने काही रिॲलिटी शोमध्येही भाग घेतला आहे. झलक दिखला जा 3 मध्ये स्पर्धक म्हणून दिसली होती. ती फर्स्ट रनर अप होती. त्यानंतर तिने बिग बॉस 7 मध्ये भाग घेतला आणि ती विजेती ठरली. बिग बॉस 14 मध्येही ती दोन आठवडे दिसली होती.

गौहर खानला एक मुलगा देखील आहे. ती सोशल मीडियावर एक्टिव्ह असून ती नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. तिच्या अदांनी चाहते घायाळ होतात. तिचे असंख्य चाहते आहेत.