हात जोडले, डोकं टेकलं...; अजित पवारांना शेवटचा निरोप देताना रितेश देशमुख भावुक, पार्थिवाचं घेतलं अंत्यदर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 12:35 IST2026-01-29T12:34:00+5:302026-01-29T12:35:20+5:30
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बुधवारी(२८ जानेवारी) बारामती येथे झालेल्या विमान अपघातात दुर्देवी निधन झालं. आज त्यांच्या पार्थिवावर बारामती येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. रितेश देशमुखही अजित पवार यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित होता.

हात जोडले, डोकं टेकलं...; अजित पवारांना शेवटचा निरोप देताना रितेश देशमुख भावुक, पार्थिवाचं घेतलं अंत्यदर्शन
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बुधवारी(२८ जानेवारी) बारामती येथे झालेल्या विमान अपघातात दुर्देवी निधन झालं. त्यांच्या अकाली एक्झिटने संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. अनेक कलाकारांनी त्यांच्या निधनावर हळहळ व्यक्त केली. अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीत त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. आज त्यांच्या पार्थिवावर बारामती येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याआधी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं.
अजित पवार यांना शेवटचा निरोप देण्यासाठी जनसागर उसळला होता. नेते, मंडळींनी हजेरी लावली होती. मराठी अभिनेता आणि दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे पूत्र रितेश देशमुखही अजित पवार यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित होता. रितेशने अजित पवारांच्या पार्थिवाचे दर्शन घेत त्यांना शेवटचा निरोप दिला. पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करत त्याने डोकं ठेवत हात जोडून नमस्कार केला. यावेळी तो भावुक झाल्याचं दिसलं.
बारामतीत विद्या प्रतिष्ठान मैदान येथे शासकीय इतमामात अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पार्थ पवार आणि जय पवार यांनी अजित पवार यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. यावेळी लाखोंच्या जनसमुदायाने अजित पवारांना अखेरचा निरोप दिला. देशाचे गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आदी प्रमुख नेत्यांबरोबर राज्यातील सर्व नेते उपस्थित होते.
अजित पवार यांनी आपल्या दीर्घ राजकीय कारकिर्दीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणावर ठसा उमटवला होता. काका शदर पवार यांच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणात आलेल्या अजित पवार यांनी सहकार क्षेत्रातून आपल्या कारकीर्दीची सुरूवात केली. पुढे १९९१ मध्ये ते बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. मात्र ते खऱ्या अर्थाने रुळले ते महाराष्ट्राच्या राजकारणात बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार हे सलग आमदार म्हणून निवडून आले. तसेच अर्थ, नियोजन, जलसंपदा, ऊर्जा अशा प्रमुख मंत्रालयांची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती. महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रिपद सर्वाधिक काळ सांभाळण्याचा विक्रम अजित पवार यांच्या नावावर होता. तसेच सध्या राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारमध्ये अजित पवार हे उपमुख्यमंत्री होते.