सरत्या वर्षात खंडग्रास चंद्रग्रहण
By Admin | Updated: December 22, 2015 00:24 IST2015-12-22T00:24:54+5:302015-12-22T00:24:54+5:30
अंतराळात दररोज असंख्य घडामोडी घडतात. २०१५ हे वर्ष अनेक खगोलीय घटनांनी गाजले. खंडग्रास चंद्रग्रहण, ...

सरत्या वर्षात खंडग्रास चंद्रग्रहण
उल्कावर्षाव : गुरु-सूर्य प्रतियुती
अमरावती : अंतराळात दररोज असंख्य घडामोडी घडतात. २०१५ हे वर्ष अनेक खगोलीय घटनांनी गाजले. खंडग्रास चंद्रग्रहण, गुरू-सूर्य प्रतियुती, उल्कावर्षाव यासारखे विहंगम दृश्य नागरिकांना बघायला मिळाले.
आकाशात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीला खगोलशास्त्रात फार महत्त्व आहे. २०१५ या वर्षात अनेक खगोलीय घटनांची रेलचेल राहिली. ४ जानेवारी रोजी पृथ्वी-सूर्य हे अंतर कमीत कमी होते. या घटनेला खगोलशास्त्रात पेरेहेलीआॅन असे म्हणतात. या दिवशी पृथ्वी सूर्य हे अंतर १४७ दशलक्ष किमी होते. ८ जानेवारीला सायंकाळी पूर्व क्षितिजावर चंद्राजवळ गुरू ग्रहाचे दर्शन झाले. हा प्रसंग सर्वांना सुखावणारा होता. १० जानेवारीला सायंकाळी पश्चिम क्षितिजावर शुक्राशेजारी बुध ग्रह दिसला. ६ फेब्रुवारी रोजी गुरू-सूर्य प्रतियुती झाली. या दिवशी पृथ्वीपासून गुरूचे अंतर हे कमीत कमी होते. टेलीस्कोपमधून गुरूचे चंद्र खगोलप्रेमींना पाहता आले. २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पश्चिम क्षितिजावर चंद्रकोरीजवळ मंगळ व शुक्र जवळ आले होते.
२० मार्च रोजी खग्रास सूर्यग्रहण बघण्याची कमालीची उत्सुकता तमाम नागरिकांना होती. परंतु हे ग्रहण ग्रिनलँड व सैयबेरीयामधून दिसले. वर्षभरात घडलेल्या खगोलीय घटनांमध्ये २२ मार्च रोजी दिवस व रात्र समान राहिली. ४ एप्रिल या दिवशी खंडग्रास चंद्रग्रहण बघण्याची पर्वणी नागरिकांना मिळाली. हे ग्रहण मात्र भारतात दिसले. वरील सर्व घटना या नैसर्गिक असून याचा राशीनुसार मानवी जीवनावर कुठलाही वाईट परिणाम झाल्याचे दिसून आले नाही. (प्रतिनिधी)
शनीच्या सुंदर रिंगचे दर्शन
२३ मे रोजी शनी आणि सूर्य यांच्यात प्रतियुती झाली. या दिवशी शनी पृथ्वीच्या जवळ होता. टेलिस्कोपमधून शनीची सुंदर रिंंग तमाम खगोल जिज्ञासूंना पाहता आली. ही रिंंग साध्या डोळ्यांनी दिसली नाही.
सिंह राशीतून झाला उल्कावर्षाव
१७ ते २० नोव्हेंबर या काळात सिंह राशीतून उल्कावर्षाव झाला. आकाशातून तुटणाऱ्या तारांचे विलोभनीय दृश्य नागरिकांना पहायला मिळाले. १३ ते १७ डिसेंबर या काळात मिथून राशीतून उल्कावर्षाव झाल्याचे दिसून आले.
सरत्या वर्षात घडलेल्या सर्व घटना या नैसर्गिक होत्या. याचा राशीनुसार मानवी जीवनावर कुठल्याही वाईट परिणाम झाला नाही. नागरिकांनी कर्मकांडाच्या मागे न लागता आकाशात पुढील वर्षात घडणाऱ्या खगोलीय घटनांचे निरीक्षण करून आनंद घ्यावा.
-विजय गिरुळकर, हौशी खगोल अभ्यासक, अमरावती.