माधुरी दीक्षितसाठी पती डॉ. श्रीराम नेने यांची खास पोस्ट; "ती फक्त माझी पत्नी नाही, माझ्या जगण्याचं कारण…"
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 14:23 IST2026-04-30T14:23:23+5:302026-04-30T14:23:40+5:30
डॉ श्रीराम नेने यांनी खास पोस्ट करत माधुरीचं कौतुक केलं आहे.

माधुरी दीक्षितसाठी पती डॉ. श्रीराम नेने यांची खास पोस्ट; "ती फक्त माझी पत्नी नाही, माझ्या जगण्याचं कारण…"
Madhuri Dixit : माधुरी दीक्षित बॉलीवूडची 'धक धक गर्ल' म्हणून ओळखली जाते. बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि उत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहे. माधुरी दीक्षित फक्त एक उत्तम अभिनेत्री नाही तर एक उत्कृष्ट नर्तिकासुद्धा आहे. ती एक प्रशिक्षित कथक नृत्यांगना आहे, तिच्या नृत्यात कमालीची अचूकता, शालीनता आहे. विशेष म्हणजे तिचे नृत्यातील हावभाव चाहत्यांना भुरळ घालतात. माधुरी आजही सोशल मीडियावर त्यांचे डान्स व्हिडीओ शेअर करतात, जे खूप व्हायरल होतात. काल बुधवारी २९ एप्रिल रोजी वर्ल्ड डान्स डे होता. या निमित्ताने माधुरीचे पती डॉ श्रीराम नेने यांनी खास पोस्ट करत माधुरीचं कौतुक केलं आहे.
श्रीराम नेने यांनी इन्स्टाग्रामवर यानिमित्ताने माधुरी दीक्षितबरोबरचे काही रोमँटिक फोटोसुद्धा शेअर केले आहेत. या फोटोंसोबत कॅप्शनमध्ये त्यांनी लिहलं, "ती फक्त माझी पत्नी नाही… ती माझी लय आहे, जगण्याचं कारण आहे आणि आयुष्यात असंच पुढे चालत राहण्याची आठवण करून देणारी शक्ती आहे. कारण दीर्घायुष्य मोठ्या क्षणांतून नाही, तर अशा छोट्या-छोट्या, सतत पुनरावृत्ती होणाऱ्या क्षणांतून घडतं. आजचं नृत्य म्हणजे उद्याची ताकद. आजचा आनंद म्हणजे अशी काही वर्षे, जी आपल्याला कायमची जपून ठेवता येतात. आंतरराष्ट्रीय नृत्य दिन आज वेगळाच वाटतोय, जेव्हा जाणवतं…असंच एकत्र राहूनच आपण कायम तरुण राहतो".
ते म्हणाले, "सर्जन म्हणून मला वाटायचं की दीर्घायुष्याबद्दल मला बरंच काही माहिती आहे…पण लग्नानंतर त्याकडे पाहण्याची एक नवीनच दृष्टी मिळाली. तिला नाचताना पाहून मला जाणवलं की, दीर्घायुष्य म्हणजे लय, हालचाल आणि आनंद .ती नृत्य करते. आणि मी तिच्याशी ताळमेळ राखण्याचा प्रयत्न करतो. आणि या साऱ्याच्या मधात आम्ही दोघंही अधिक सुंदरपणे मोठे होत आहोत. शेवटी कळलं... दीर्घायुष्य फक्त विज्ञान नाही. ती एक हालचाल आहे, आनंद आहे. आणि ते तुम्ही कोणासोबत शेअर करता, त्यातच त्याचं खरं सौंदर्य आहे".
डॉ. नेनेंनी शेअर केलेले हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. अनेकांनी या जोडीला 'मेड फॉर इच अदर' म्हणत त्यांच्या बॉन्डिंगचे कौतुक केले आहे. डॉ. नेने नेहमीच माधुरीच्या कलेचे समर्थन करताना दिसतात. माधुरी आता अभिनयापुरती मर्यादित राहिलेली नसून, ती एक यशस्वी निर्माती म्हणूनही नावारूपास आली आहे. अनेक मराठी चित्रपटांच्या निर्मितीनंतर, अलीकडेच ती ओटीटीवरील 'मिसेस देशपांडे' या सीरिजमुळे विशेष चर्चेत राहिली. आपल्या चिरतरुण सौंदर्याने आणि अष्टपैलू कलेने तिने आजही प्रेक्षकांच्या मनावरचं अधिराज्य कायम राखलं आहे.