"पप्पा काही झालंच तर...", इराण-इस्रायल युद्धात अडकली अभिनेत्याची ६ वर्षांची चिमुरडी, डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 17:46 IST2026-03-02T17:46:33+5:302026-03-02T17:46:50+5:30
बॉलिवूड अभिनेता आणि पंजाबी सिंगर असलेल्या एमी वर्कची पत्नी आणि सहा वर्षांची मुलगीदेखील युएईमध्ये अडकले आहेत. अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट करत याची माहिती दिली आहे.

"पप्पा काही झालंच तर...", इराण-इस्रायल युद्धात अडकली अभिनेत्याची ६ वर्षांची चिमुरडी, डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट
अमेरिका-इस्रायल-इराण या देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धाचे पडसाद संपूर्ण जगभरात उमटताना दिसत आहेत. इस्रायल-अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्लाह अली खामेनेई मारले गेले. यामुळे संपूर्ण जग हादरून गेलं आहे. इराण प्रत्युत्तर म्हणून मध्य पूर्वेतील देशांवर जबरदस्त हल्ले चढवत आहे. इराणनने युएई मधील काही ठिकाणांवर हल्ला केला आहे. यामुळे अनेक भारतीय सेलिब्रिटी आणि नागरिक हे युएईमध्ये अडकून पडले आहेत. बॉलिवूड अभिनेता आणि पंजाबी सिंगर असलेल्या एमी वर्कची पत्नी आणि सहा वर्षांची मुलगीदेखील युएईमध्ये अडकले आहेत. अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट करत याची माहिती दिली आहे.
एमी वर्कने भावुक पोस्ट शेअर केली आहे. तो पोस्टमध्ये म्हणतो, "युएईमधल्या परिस्थितीमुळे मी चिंतेत आहे. माझी पत्नी आणि सहा वर्षांची मुलगी तिथे अडकले आहेत. एक पती आणि वडील म्हणून या कठीण काळात भावुक न होणं आणि चिंता न करणं हे कठीण आहे. पप्पा, जर काही झालंच तर मी बेडखाली लपेन. मी स्ट्राँग गर्ल आहे. काळजी करू नका. हे कुठल्याही वडिलांना ऐकायला आवडणार नाही. चाहत्यांमध्ये कितीही स्ट्राँग दाखवण्याचा प्रयत्न केला तरी शेवटी आम्हीदेखील कौटुंबिक आहोत".
"अशी अनेक कुटुंब असतील जी यातून जात असतील. माझ्या प्रार्थना फक्त माझ्या कुटुंबासाठी नाहीत तर यातून जात असलेल्या प्रत्येकासाठी आहेत. युएई सरकारकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांसाठी मी आभारी आहे. लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी ते पूर्णपणे प्रयत्न करत आहेत. लवकरच हे सगळं संपेल. आणि सगळी कुटुंब सुरक्षित राहतील", असं त्याने म्हटलं आहे.