डेविड धवन घेणार इंडस्ट्रीतून निवृत्ती? 'हैं जवानी तो इश्क होना है' ठरणार अखेरचा सिनेमा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 09:09 IST2026-04-22T09:08:14+5:302026-04-22T09:09:22+5:30
David dhawan: डेविड धवन यांच्या निवृत्तीविषयीची कलाविश्वात जोरदार चर्चा रंगली आहे.

डेविड धवन घेणार इंडस्ट्रीतून निवृत्ती? 'हैं जवानी तो इश्क होना है' ठरणार अखेरचा सिनेमा
डेविड धवन हे नाव इंडस्ट्रीसाठी नवीन नाही. आजवरच्या कारकिर्दीत त्यांनी असंख्य सुपरहिट सिनेमाबॉलिवूडला दिले. यात खासकरुन त्यांचे 'बीवी नंबर 1', राजा बाबू, जुड़वा, दुल्हन हम ले जाएंगे, मुझसे शादी करोगी, पार्टनर, जुड़वा 2, असे कितीतरी सिनेमा बॉक्स ऑफिसवर गाजले. सध्या डेविड धवन त्यांच्या आगामी हैं जवानी तो इश्क होना हैं या सिनेमाची तयारी करत आहेत. मात्र, हा सिनेमा कदाचित त्यांचा अखेरचा चित्रपट ठरु शकतो. याविषयी त्यांनी एक मोठं विधान केलं असून सध्या ते चर्चिलं जात आहे.
ANI ला दिलेल्या मुलाखतीमध्ये डेविड धवन यांनी त्यांच्या निवृत्तीविषयी भाष्य केलं आहे. त्यामुळे आता लवकरच ते कलाविश्वातून काढता पाय घेणार असल्याची जोरदार चर्चा कलावर्तुळात रंगली आहे.
''एक डायरेक्टर कायमच एका चांगल्या कलाकाराच्या शोधात असतो. आणि, ही त्याची पहिली प्रायोरिटी असते. वरुण फक्त माझा मुलगाच नाही, तर तो वेळोवेळी मला प्रश्न विचारतो. ते समजून घेतो. मी त्याच्यासोबत १३-१४ सिनेमा केले आहेत. आमच्या दोघांचं एकमेकांसोबत चांगलं जमतं. त्यामुळे जोपर्यंत मी सिनेमा करतोय तोपर्यंत १-२ सिनेमात तरी त्याच्यासोबत नक्कीच काम करणार. ज्यावेळी मी कॅमेरामागे असतो त्यावेळी तो माझा मुलगा नसतो. तो फक्त एक अभिनेता असतो. आणि, मला त्याच्या कामातून फक्त रिझल्ट हवा असतो,'' असं डेविड धवन म्हणाले.
पुढे ते म्हणतात, ''पूर्वीच्या काळी सिनेमा फक्त विश्वासावर केले जायचे सलमान खान, गोविंदा, संजय दत्त हे कलाकार सिनेमाची स्क्रिप्ट पूर्ण वाचतही नव्हते. आम्ही फक्त त्यांना सीन सांगायचो आणि चित्रपट तयार व्हायचा.''
डेविड धवन घेणार निवृत्ती?
''आता मी अजून जास्त काम करावं असं मला वाटत नाही. कदाचित हा माझा अखेरचा सिनेमा असेल. त्यानंतर मला फक्त वरुणचे वडील म्हणूनच रहायला आवडेल. या सिनेमाचं चित्रीकरण सुरु असतांना मी खूप आजारी होतो. पण, वरुणने माझी खूप काळजी घेतली. सगळ्या डॉक्टरांचे नंबर त्याच्याकडे होते. तो सतत त्यांच्या संपर्कात होता. आणि, प्रत्येक वेळी माझ्यासोबत सावलीसारखा उभा होता. तो एक पूर्ण फॅमिली मॅन आहे.''
दरम्यान, डेविड धवन यांचा है जवानी तो इश्क होना है हा सिनेमा १२ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात वरुण धवनसोबत पूजा हेगडे आणि मृणाल ठाकूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. डेविड धवन यांनी आजवरच्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट सिनेमा इंडस्ट्रीला दिले. त्यांनी आजवरच्या कारकिर्दीत 'बीवी नंबर 1' ,शोला और शबनम , बोल राधा बोल, राजा बाबू, कुली नंबर 1, साजन चले ससुराल, जुड़वा , हीरो नंबर 1 , दीवाना मस्ताना, बड़े मियां छोटे मियां, हसीना मान जाएंगी, दुल्हन हम ले जाएंगे, चल मेरे भाई, जोड़ी नंबर 1, एक और एक ग्यारह, मुझसे शादी करोगी, मैंने प्यार क्यों किया?, पार्टनर, चश्मे बद्दूर, मैं तेरा हीरो, जुड़वा 2, और कुली नंबर 1 असे असंख्य सिनेमा बॉलिवूडला दिले आहेत.