Border 2 Box Office Collection: 'बॉर्डर २' सिनेमाने 'धुरंधर'ला पछाडले! दोन दिवसांत केली विक्रमी कमाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 10:31 IST2026-01-25T10:18:09+5:302026-01-25T10:31:52+5:30
'बॉर्डर २' सिनेमाने दोनच दिवसांत विक्रमी कमाई केली आहे. सनी देओलच्या या नवीन सिनेमाला प्रेक्षकांनी पसंती दिली आहे

Border 2 Box Office Collection: 'बॉर्डर २' सिनेमाने 'धुरंधर'ला पछाडले! दोन दिवसांत केली विक्रमी कमाई
बॉलिवूड सुपरस्टार सनी देओलचा 'बॉर्डर २' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुसाट कमाई करत आहे. शुक्रवारी जबरदस्त ओपनिंग केल्यानंतर, शनिवारी (दुसऱ्या दिवशी) या चित्रपटाच्या कमाईत मोठी वाढ पाहायला मिळाली. विशेष म्हणजे, या चित्रपटाने २०२५ मधील सर्वात मोठा हिट ठरलेल्या 'धुरंधर' या चित्रपटाचे रेकॉर्ड्सही मोडीत काढले आहेत.
दुसऱ्या दिवशी किती झाली कमाई?
'बॉर्डर २' ने रिलीजच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी तब्बल ३६.७० कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. पहिल्या दिवशी (शुक्रवारी) चित्रपटाने ३० कोटींची कमाई केली होती. अशाप्रकारे, अवघ्या दोन दिवसांत या चित्रपटाचे भारतीय बॉक्स ऑफिसवर ६६.७० कोटी रुपयांचं कलेक्शन केलं आहे. या कमाईसह सनी देओलच्या चित्रपटाने रणवीर सिंह स्टारर 'धुरंधर' या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला आहे. 'धुरंधर'ने पहिल्या दिवशी २८ कोटी आणि दुसऱ्या दिवशी ३२ कोटींची कमाई केली होती. 'बॉर्डर २' ने पहिल्या आणि दुसऱ्या या दोन्ही दिवशी 'धुरंधर'पेक्षा जास्त कमाई करत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
दिल्ली, पंजाब आणि उत्तर प्रदेशमध्ये या चित्रपटाची प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी प्रेक्षक चक्क ट्रॅक्टर घेऊन चित्रपट पाहायला येत आहेत. थिएटरमध्ये 'हिंदुस्तान जिंदाबाद'च्या घोषणा पाहायला मिळत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग सिंह यांनी केले असून यात सनी देओलसोबत वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
आज रविवार असून प्रजासत्ताक दिनानिमित्त सोमवारीही सुट्टी आहे. त्यामुळे या 'लॉन्ग विकेंड'चा चित्रपटाला मोठा फायदा होणार आहे. आज संध्याकाळपर्यंत हा चित्रपट १०० कोटींचा टप्पा सहज पार करेल. या चित्रपटाचे एकूण बजेट जवळपास १७५ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे, ज्यापैकी मोठी रक्कम चित्रपटाने पहिल्या दोन दिवसांतच वसूल केली आहे. त्यामुळे नवीन वर्ष अर्थात २०२६ मध्ये पहिला हिट सिनेमा होण्याचा मान 'बॉर्डर २' ला मिळालाय, असं म्हटल्यास वावगं ठरु नये.