आमिरचा ‘पीके’ झळकणार; याचिका फेटाळली
By Admin | Updated: August 15, 2014 00:11 IST2014-08-14T23:11:55+5:302014-08-15T00:11:19+5:30
पीके’ या चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्यासंबंधी याचिका फेटाळत सर्वोच्च न्यायालयाने अभिनेता आमीर खानला मोठा दिलासा दिला आहे.

आमिरचा ‘पीके’ झळकणार; याचिका फेटाळली
नवी दिल्ली : ‘पीके’ या चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्यासंबंधी याचिका फेटाळत सर्वोच्च न्यायालयाने अभिनेता आमीर खानला मोठा दिलासा दिला आहे. वादग्रस्त पोस्टरमुळे आमीरवर टीकेचा भडिमार होत असतानाच या चित्रपटाला परवानगी नाकारण्यासाठी सादर करण्यात आलेली याचिका गुरुवारी सरन्यायाधीश आर.एम. लोढा यांच्या नेतृत्वातील खंडपीठाने फेटाळून लावली.
पीके या चित्रपटामुळे अश्लीलतेला प्रोत्साहन मिळणार असून धार्मिक भावना दुखावल्या जातील असा अ.भा. मानवाधिकार आणि सामाजिक न्याय या स्वयंसेवी संघटनेने केलेला दावा फेटाळताना खंडपीठाने हा कला आणि मनोरंजनाचा विषय असून त्याच्याशी धार्मिक भावना जोडण्याची गल्लत करू नका या शब्दांत समज दिली. आमीर खान रेल्वे रूळावर उभा असून तो पूर्णपणे नग्न असल्याचे भासवताना त्याने लज्जा रक्षणासाठी ट्रान्झिस्टर हाती घेतल्याचे दृश्य ‘पीके’ या राजकुमार हिरानी दिग्दर्शित चित्रपटात आहे.
अलीकडेच तसे पोस्टर झळकल्याने आमीरवर सडकून टीका होऊ लागली होती.
सरन्यायाधीश लोढा, कुरियन जोसेफ आणि आर.एफ. नरीमन या न्यायाधीशांचा समावेश असलेल्या खंडपीठाने म्हटले की, यात चूक काय आहे. या बाबी एवढ्या संवदेनशील बनवू नका. याचिकाकर्त्या संघटनेची बाजू मांडताना वकील नफीस सिद्दिकी यांनी या चित्रपटाचे पोस्टरही सोबत आणले होते.
या पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे अॅड. सिद्दिकी म्हणाले. त्यावर खंडपीठाने सदर पोस्टर किंवा चित्रपटामुळे घटनात्मक किंवा कायदेशीर तरतुदींचा भंग कसा होतो ते सांगा. कोणत्या घटनात्मक किंवा कायदेशीर अधिकारांचे उल्लंघन झाले आहे. चित्रपट निर्मात्यावर निर्बंध आणल्यास संबंधितांच्या अधिकारांवर प्रभाव पडेल काय? असा उलट सवाल केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)