काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 09:41 IST2026-04-30T09:41:15+5:302026-04-30T09:41:40+5:30
९० चं दशक गाजवणाऱ्या अभिनेत्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, जे पाहून चाहते आश्चर्यचकीत झाले आहेत.

काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
९० च्या दशकातील सुपरहिट चित्रपट 'आशिकी' आणि त्यातील अभिनेता राहुल रॉय यांचं फॅन फॉलोईंग सर्वांना माहितच आहे. राहुल रॉय आणि अभिनेत्री अनु अग्रवाल यांना या एका चित्रपटाने रातोरात स्टार बनवले होते. मात्र, अलीकडेच राहुल रॉय यांचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. राहुल यांनी एका इन्फ्ल्युएन्सरसोबत रिल व्हिडीओ बनवल्याने ते चर्चेत आले आहेत. पण हा व्हिडीओ पाहून लोकांनी त्यांना ट्रोल केलंय. यावर अभिनेत्याने प्रतिक्रिया दिली आहे.
राहुल रॉय यांचा 'रील' अवतार
अलीकडेच डॉ. वनिता घाडगे नावाच्या एका इंस्टाग्राम यूजरने राहुल रॉय यांच्यासोबत काही रील्स शेअर केले आहेत. यामध्ये राहुल रॉय त्यांच्या गाजलेल्या चित्रपटांतील गाण्यांवर उदा. 'आशिकी', 'फिर तेरी कहानी याद आई' डान्स करताना किंवा पोज देताना दिसत आहेत. या रीलमध्ये ९० चा काळ गाजवलेल्या राहुल रॉय यांचा असा वेगळाच अवतार पाहून चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. राहुल रॉय यांचा या रिलमधला अवघडलेपणा स्पष्ट झळकत आहे.
राहुल रॉय यांचे हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. राहुल रॉय यांचे इतके वाईट दिवस आले? अशा कमेंट करुन नेटकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. आता या व्हिडीओवर राहुल यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. एका मुलाखतीत बोलताना राहुल रॉय म्हणाले, ''हा व्हिडीओ तसा व्हायरल झाला नाहीये पण ती एक गरज होती. आता मी पुन्हा असं करणार नाही. तुम्हा सर्वांचे आभार.', अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. त्यामुळे एकूणच आपण काय केलंय याचा अंदाज त्यांना आला आहे.
काही दिवसांपूर्वी राहुल रॉय यांचा एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये ते मुंबईतील वर्सोवा भागात एका खराब रस्त्यावरून हातामध्ये सूटकेस घेऊन चालताना दिसले होते. गेल्या वर्षी देखील बिहारमधील बिक्रमगंज येथे एका लग्नात 'आशिकी'च्या गाण्यावर गिटार वाजवताना आणि लिप-सिंक करतानाचा त्यांचा व्हिडिओ चर्चेत आला होता. त्यामुळे एकेकाळी लाखो तरुणींच्या हृदयावर राज्य करणाऱ्या या सुपरस्टारची सध्याची अवस्था पाहून ९० च्या दशकातील चाहते हळहळ व्यक्त करत आहेत.