सोनमची ट्राऊझर साडी आपल्याला शोभेल काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2017 18:29 IST2017-05-26T18:24:19+5:302017-05-26T18:29:24+5:30
सोनम कपूरच्या साडीच्या स्टाईल्स चर्चेत आहेत, पण तशा साड्या नेसतं कोण?

सोनमची ट्राऊझर साडी आपल्याला शोभेल काय?
- नेहा चढ्ढा
सोनम कपूर स्टाईल आयकॉन आहेच, त्यात यंदा कान्स महोत्सवातही तिच्या फॅशनचे जलवे होतेच. एकाच वेळी बोल्ड, मॉडर्न आणि ट्रॅडिशनल असणं तिला कसं जमतं याचं भल्याभल्यांना आश्चर्य वाटतं. यंदाही तिनं तेच केलं. तिच्या निळ्या रंगाच्या ट्राऊझर साडीनं अनेक फॅशन पंडितांना चकित केलं. तिचे ते फोटो तिच्या स्टायलिस्ट रेहानं इन्स्टाग्रामवर पोस्ट केले. त्यानं इंटरनेट ब्रेक केलं. ती ट्राऊझर साडी मसाबा गुप्तानं डिझाइन केली होती. अशा साऱ्या बातम्या एव्हाना तुमच्यापर्यंतही आल्या असतीलच.
आता मूळ प्रश्न असा आहे की अशा पद्धतीची ट्राऊझर साडी फॅशनेबल महिला तरी नेसू शकतात का?
तर त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यापूर्वी हे ही लक्षात घ्यायला हवं की यापूर्वीही एकदा सोनमने डेनीस साडी नेसली होती. म्हणजे जिन्सवाल्या डेनिम कपड्याची साडी.ती साडी तिनं उत्तम कॉन्फिडण्टली कॅरीही केली.
याशिवाय गेल्या काही दिवसात तिनं नेसलेली धोती स्टाईल साडी, जॅकेट स्टाईल साडी, डबल पल्लू साडी यांचेही देखणे फोटो इंटरनेटवर व्हायरल झालेच.
तुम्ही गुगल करुन पहा.
धोती स्टाईल साडी कशी नेसायची?
जॅकेट स्टाईल, डबल पल्लू, इव्हिनिंंग गाऊन स्टाईल साडी कशी नेसायची याचे अनेक व्हिडिओ, फ्री ट्युटोरिअल्स युट्यूबवर उपलब्ध आहेत. ते पाहूनही काही स्टायलिंग आपण करू शकतो.
सध्या अशा स्टायलिश साड्यांचा ट्रेण्ड आहे.
साडी नेसणं आवडत असेल तर या नव्या स्टायलिंगचा विचार करायला हरकत नाही.