मॅक्सी ड्रेस- उन्हाळ्यातली कम्फर्टेबल फॅशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2017 16:27 IST2017-04-29T16:27:42+5:302017-04-29T16:27:42+5:30
अत्यंत तलम वस्त्रापासून बनवलेले झुळझुळीत असे मॅक्सी ड्रेस दैनंदिन वापरातही अत्यंत सुंदर आणि स्टायलिश दिसतात.

मॅक्सी ड्रेस- उन्हाळ्यातली कम्फर्टेबल फॅशन
- मोहिनी घारपुरे-देशमुख
अत्यंत तलम वस्त्रापासून बनवलेले झुळझुळीत असे मॅक्सी ड्रेस दैनंदिन वापरातही अत्यंत सुंदर दिसतात. हे ड्रेस पायापर्यंत लांब आणि वेगवेगळ्या टाईपच्या स्लीव्हजमुळे अत्यंत आकर्षक, सुंदर आणि स्टायलिश दिसतात. अलिकडे या प्रकारच्या ड्रेसेसमध्ये वेगवेगळ्या प्रिंट्स बाजारात उपलब्ध आहेत. त्यांपैकी फ्लोरल प्रिंट्स आणि प्लेन कलर्सची जास्त चलती आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात हे तलम, मुलायम कापडापासून बनवलेले ड्रेस वापरणं अत्यंत आरामदायी असून त्याचा लुक देखील खूपच ग्रेसफुल असतो. शिफॉन, लिनन, कॉटन, क्रेप आदी कापडापासून बहुतेकरून तयार केले जाणारे हे मॅक्सी ड्रेसेस वेगवेगळ्या आकाराच्या गळ्यांच्या पॅटर्नमुळे आणि बाह्यांच्या वेगवेगळ्या प्रकारांमुळे अत्यंत आकर्षक दिसतात. या कापडांच्या मॅक्सीवर लेसवर्कअधिक प्रमाणात असतं. साधारणत: दिड ते दोन हजारापासून वीस एक हजारांपर्यंत हे ड्रेसेस बाजारात उपलब्ध आहेत. त्याचबरोबर इंटरनेटवरही वेगवेगळ्या साईट्सवर या मॅक्सी ड्रेसेसचे अक्षरश: शेकडो प्रकार विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तरीही ते स्वत:साठी घ्यायचे म्हटलं तर केवळ डोळ्यांना छान दिसतात म्हणून घेवू नये. आपल्याला ते कसे दिसतील आणि काय केलं तर चांगले दिसतील याचा विचार करूनच ते घ्यावेत.