कामाच्या ठिकाणी फॉर्मल आणि इतर ठिकाणी आपण जे इनफॉर्मल कपडे घालतो ते कपडे नुसतेच पेहराव नसतात. तर ते आपल्याविषयी माहिती देणारे माध्यम असतात. कपड्यांनाही भाषा असते, त्यांनाही बोलता येतं. फक्त त्यांची बोलण्याची पध्दत वेगळी असते. खरंतर न बोलताही आपल्या अंगावरचे कपडे समोरच्याला खूप काही सांगून जातात. त्यामुळे आपलं इंप्रेशन कुठेही चांगलं पाडायचं असेल तर आपल्याला आधी कपडे नीट निवडता यायलाच हवेत.
कपडे कसे घालाल?
* आता अलीकडचा एक साधा नियम पाहा. सगळ्या कार्पोरेट जगात कार्पोरेट मीटिंग्ज, इव्हेण्ट्स यासाठी ठळकपणे नोंदवलेलं असतं की, ‘ड्रेसकोड फॉर्मल’ हवा. ते का? तर त्यात हे अभिप्रेत आहे की, कार्यालयीन कामकाजासाठी समाजमान्य कपडे घालावेत. उगीच फॅशनेबल, अंग उघडे टाकणारे कपडे घालू नयेत. आता हा संदर्भ फक्त स्त्रियांनाच लागू आहे आणि जरा वेगळे कपडे स्त्रियांनी घातले तर सहकारी पुरुषांच्याच भावना चाळवतात असं काही नाही. सोबत काम करणाऱ्या इतर महिला सहकाऱ्यांनाही एखादीचा पोशाख पाहून राग येऊ शकतो, आॅकवर्ड वाटू शकतं. घृणा वाटू शकते. केवळ ‘त्या’ नजरेनं पुरुषांच्या भावना चाळवतात किंवा तेच अभिप्रेत असतं असं काही नाही. त्यामुळे कार्यालयीन कामकाजाच्या ठिकाणी आपण जे कपडे घालतो त्याकडे फार बेपर्वाईनं पाहणंही योग्य नाही.
* आपण आकर्षक दिसावं असं वाटण्यात चूक काही नाही पण आकर्षक दिसणं आणि उन्मादक दिसणं यात खूप फरक असतो, हे कपड्यांची निवड करताना कायम लक्षात ठेवायला हवं.
* कपड्याची निवड करताना आपलं वय, चण, आपला व्यवसाय, तिथलं वातावरण, संपर्कात येणाऱ्या व्यक्ती अथवा समाज या साऱ्याचा विचार करायला हवा. कामकाज करताना आपल्याला कुठल्या प्रसंगी, कुठे, कुणाला भेटायला जावं लागणार आहे याचं भान ठेवून कपडे निवडणं आणि ते योग्य पद्धतीनं परिधान करणं हा खरं तर कॉमन सेन्सचा भाग आहे.
* कपडे निवडताना आणि घालतानाच एक साधं सूत्र आहे जे कायम लक्षात ठेवायला हवं की कपड्यांची निवड करताना कसेतरीच कपडे, अजिबात विचार न करता घालू नयेत तसंच अतीविचार करूनही कपडे निवडू आणि घालू नयेत.
* एक साधं लॉजिक आहे की आपण वापरत असलेले कपडे, वस्तू हे सारं आपलं स्वत:चं एक ‘प्रेझेण्टेशन’ आहे. आपण दिसतो कसे? आपला रंग, ठेवण, आपल्याला कुठले रंग खुलून दिसतात, काय घातल्यानं आपल्याला कम्फर्टेबल वाटतं, आपल्या कपड्यांचं फिटिंग योग्य आहे ना? या साऱ्याचा विचार प्रत्येकाला करता यायलाच हवा.
* यासह त्या कपड्यांसोबत आपण कुठले बूट घालतो, बॅग्ज कशा वापरतो, दागिने काय घालतो हे सारंही महत्त्वाचं असतं. आणि ते योग्य असेल तर आपलं व्यक्तिमत्त्वही बरंच काही सांगून जातं.
कपडे आपल्याविषयी काय काय सांगतात?
१) ज्या व्यक्ती सारख्या फॅशन फॅशन करत आपल्या कपड्यांची स्टाइल चेंज करत राहतात त्या यक्ती सहसा उथळ असतात. फार विचारी नसतात. किंवा गांभीर्यानं विचारपूर्वक निर्णय घेत नाहीत.
२) ज्या व्यक्ती गबाळे, कसेही कपडे घालतात त्या अव्यवस्थित असतात. त्यांच्याकडे नीटनेटकेपणा नसतो. त्यांचं नियोजन चांगलं नसतं.
३) ज्या व्यक्ती स्वत:ला, स्वत:च्या वयाला न शोभणारे कपडे घालतात त्या स्वत:चा फारसा विचार न करता वागतात. इतरांप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करतात. इतरांसारख्या वागण्याचा प्रयत्न करतात.