भारतीयांचा कल खासगी शाळा-कॉलेजकडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2016 19:11 IST
आता देशामध्ये खाजगी शिक्षणसंस्था आणि ट्यूशनकडे पालकांचा कल वाढला आहे.
भारतीयांचा कल खासगी शाळा-कॉलेजकडे
गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’ कार्यक्रमात देशाच्या शिक्षण व्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त केली होती. शाळांमध्ये केवळ संख्या नाही तर गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्याचा त्यांनी सल्ला दिला.विशेष करून सरकारी शाळांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कारण आता देशामध्ये खाजगी शिक्षणसंस्था आणि ट्यूशनकडे पालकांचा कल वाढला आहे.नॅशनल सॅम्पल सर्व्हे आॅर्गनायझायशेनच्या (एनएसएसओ) आकडेवारीचे ‘इंडियास्पेंड’ने विश्लेषण करून अनेक धक्कादायक माहिती समोर आणली आहे.त्यानुसार 2014 साली 62 टक्के विद्यार्थ्यांनी सरकारी शाळेत शिक्षण घेतले. 2006-07 साली हेच प्रमाण 72.6 टक्के एवढे होते. याचा अर्थ लोकांचा सरकारी शाळांपेक्षा खाजगी शाळांकडे ओढा दिसतो.बारावीपर्यंत विद्यार्थी खाजगी शाळा-कॉलेजमध्ये शिकणेच पसंत करतात. 58.7 टक्के विद्यार्थ्यांना असे वाटते की, खाजगी संस्थांमध्ये शैक्षणिक वातावरण सरकारी शाळांपेक्षा अधिक चांगले असते. विशेष म्हणजे केवळ 11.6 विद्यार्थ्यांनी इंग्रजी माध्यमातून शिकण्यासाठी खाजगी शाळेत प्रवेश घेतल्याचे मान्य केले. उच्चशिक्षणासाठी मात्र विद्यार्थ्यांना सरकारी कॉलेजमध्ये अॅडमिशन हवे असते. परंतु त्यासाठी असणारी स्पर्धा पाहता नाईलाजाने अनेकांना खाजगी कॉलेजकडे वळावे लागते. अशा विद्यार्थ्यांचा आकडा 43 टक्का आहे.