Fashion Trend : ‘साडी’..फॅशन जगतात अजूनही टिकलेले नाव...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2017 16:26 IST
आपले व्यक्तिमत्त्व एका विशिष्ट शैलीत दिसावे असे प्रत्येक साडी परिधान करणाऱ्या महिलेला वाटते. विशेष म्हणजे साडी परिधान करणे ही देखील एक कला आहे.
Fashion Trend : ‘साडी’..फॅशन जगतात अजूनही टिकलेले नाव...!
-Ravindra Moreएका डिझायनरला फॅशनचे ज्ञान असण्यापेक्षा त्या लोकांना आणि त्यांच्या मनाला समजून घेणे महत्त्वाचे आहे. एकदा जर त्यांच्या फॅशनबाबतच्या आवडीबद्दल आपणास ज्ञात झाले तर त्यासाठी विविध शैलीची फॅशन निर्माण करायला आपणास सहजसोपे होते. आपले व्यक्तिमत्त्व एका विशिष्ट शैलीत दिसावे असे प्रत्येक साडी परिधान करणाऱ्या महिलेला वाटते. विशेष म्हणजे साडी परिधान करणे ही देखील एक कला आहे. कारण याद्वारे आपल्या भावना आणि क्रियाशिलता प्रक ट होत असते. साडीचा वापर जरी जुन्या काळापासून होत आहे, तरी आज विविध फॅशन ट्रिक्स वापरून साडीला परिधान केले जात आहे. साडीचे नाव ऐकताच भारतीय महिलाचे व्यक्तित्त्व डोळ्यासमोर येते. साडी भारतीय महिलाचे मुख्य परिधान आहे. विशेष म्हणजे विदेशातदेखील साडीला खूप आवडीने परिधान केले जाते. शिवाय भारतात आलेली विदेशी महिला एकदातरी साडी परिधान करतेच. साडी जगातील सर्वात लांब आणि जुन्या वस्त्रांपैकी एक आहे. साडीची लांबी सर्व वस्त्रांपेक्षा जास्त आहे आणि साडी म्हणजे भारतीय महिलांची ओेळखच मानण्यात आली आहे. साडी मुख्यत: ब्लाउज किंवा चोळी आणि पेटीकोटसोबत परिधान केली जाते. लेटेस्ट ट्रेंड साडी परिधान केल्यानंतर भारतीय महिलाचा लुक जरी साधा वाटत असला तरी विशिष्ट शैलीत साडी परिधान केल्यानंतर तोच लुक ग्लॅमरस वाटतो. त्यासाठी आज प्रत्येक महिला साडी तर परिधान करते पण साडी परिधान करून आपण फॅशनेबल कसे वाटू यावर जास्त भर देत असते. त्यासाठी अत्यंत तलम किंवा सुती कापडाच्या साड्यांवर जरीची बॉर्डर असलेल्या साड्यांची निवड प्रामुख्याने करतात. त्याच बरोबर हातकाम, एंब्रॉयडरी आदी वर्क केलेल्या साड्यांचीही निवड ते करतात. विशेष म्हणजे डिझायनरदेखील महिलांच्या पसंतीला दाद देत साड्यांवर वेगवेगळ्या अॅँगलने फॅ शनेबल टच देऊन यूनिक डिझाईन करीत असतात. बॉलिवूडचे साडी प्रेम बॉलिवूडचे साडी प्रेम तर सुरूवातीपासूनच दिसून येत आहे. डिंपल कपाडियाची बॉबी प्रिंट साडी पासून ते श्रीदेवीची शिफॉन साडी आपणास माहितच आहे. शिवाय सोनम कपूर, प्रियांका चोप्रा, दीपिका पादुकोण आदी सध्याच्या स्टाइल आयकॉन सेलिब्रिटीदेखील साडीवर तेवढेच प्रेम करताना दिसतात. विशेष म्हणजे त्या वेगळ्या शैलीने साडी परिधान करतात. पॅरिसमधील कान्स फेस्टिवलमध्येतर प्रत्येक सेलिब्रिटीला रात्रीच्या वेळी साडीमध्येच पाहणे पसंत करतात. फॅशन डिझायनरांनी तर साडीमध्ये नवनवीन बदल करुन साडीच्या स्टाइलला एका नव्या रुपात सादर केले आहे. साडीतच नव्हे तर ब्लाउजच्या डिझाइनमध्येही बदल करुन त्याला आधुुनिक टच दिला आहे. सोनम कपूर जेव्हाही साडी परिधान करते तेव्हा प्रत्येकवेळी तिच्या ब्लाउजची स्टाइल आकर्षक असते. आता तर आकर्षक आणि वेगळा लुक मिळविण्यासाठी साडीसोबत कमरपट्टादेखील परिधान केला जातो. महिलांच्या आवडीनिवडीचा विचार करुनच या पारंपरिक साडीच्या वस्त्रावर आदिवासी कला, इकट आणि बेटीक सौंदर्य, गोंड प्रिंट्स, कलमकारी वंडर आदी विविध कलाकुसरीने डिझायनिंग करून त्या साडीचे वेगळे रुप पालटले जाते आणि नव्या कल्पकतेने साडीला बाजारात सादर केले जाते.Also Read : साडी नेसताना या गोष्टी टाळा !