सेलिब्रेटींच्या बेबी बम्प फोटोशूट फॅशन मागे आहे एक सक्षम विचार. मातृत्त्वाचा आनंद वेगळ्यापध्दतीनं साजरा करण्यासाठी केलं जातं बेबी बम्प फोटोशूट.
By Admin | Updated: July 5, 2017 19:39 IST2017-07-05T19:39:36+5:302017-07-05T19:39:36+5:30
हल्ली सेलिब्रेटिंच्या जगात बेबी बम्प दाखवण्याची नवी फॅशन रूढ झाली आहे. सेरेनाचं बेबी बम्प फोटो शूट हे या फॅशनमधलं बोल्ड पाऊल.

सेलिब्रेटींच्या बेबी बम्प फोटोशूट फॅशन मागे आहे एक सक्षम विचार. मातृत्त्वाचा आनंद वेगळ्यापध्दतीनं साजरा करण्यासाठी केलं जातं बेबी बम्प फोटोशूट.
-सारिका पूरकर-गुजराथी
सेरेना विल्यम्स. स्टेफी ग्राफचा २२ ग्रॅण्डस्लॅमचा विक्रम मोडून टेनिस जगतात आपला दबदबा निर्माण करणारी आंतरराष्ट्रीय ख्यातीची नंबर वन टेनिसपटू. तिला टेनिस सम्राज्ञी म्हणनंच जास्त संयुक्तिक. सेरेना ओळखली जाते ते तिच्या झंझावातामुळे . टेनिस कोर्टवरील झंझावातानं जगप्रसिध्द झालेली ही टेनिसपटू हल्ली तिच्या खाजगी आयुष्यातल्या एका घटनेने भलतीच चर्चेत आली आहे. सेरेनाची यामुळेही एक वेगळी ओळख जगाला झालीय.
एक धडाकेबाज खेळाडूसोबतच स्वतंंत्र बाण्याची स्त्री म्हणून सेरेना सध्या चर्चेत आहे. दोन महिन्यांची गरोदर असतानाही आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये ती खेळली. नुसतीच खेळली नाही तर जेतेपदही पटकावलं. साहजिकच गर्भारपणाचा बाऊ न करता ते सक्षमपणे पेलण्याचा, सांभाळण्याचा आणि यात कुठेही स्वत:चं अस्तित्त्व विसरु नका हा संदेशच तिनं दिला आहे. देऊ केला आहे.
भारतात बेबी बम्प फोटोशूट आत्ताआत्ता सेलिब्रेटी धाडसानं करताना दिसताहेत. अमेरिकन अभिनेत्री डेमी मूर हिनं मात्र १९९१ मध्येच बेबी बम्पसह न्यूड फोटोशूट करुन एक नवा विचार रूजवू पाहिला होता. त्यानंतर ब्रिटनी स्पिअर ( २००६), मिरांडा केर (२०१० ), जेसिका सिम्पसन ( २०११ ) यांनीही असे फोटोशूट करुन डेमीला पाठिंबा दिला होता. आता सेरेनानं असं फोटोशूट केल्यानंतर साहजिकच या फोटोशूटला अधिक ग्लॅमर आणि महत्व प्राप्त झालंय. कारण या अभिनेत्रींपेक्षा सेरेना टेनिसच्या माध्यमातून जगभरात पोहोचली आहे. साहजिकच तिच्या या फोटोशूटनं सर्वच महिला सेलिब्रेटी, प्रसारमाध्यमं, व्यावसायिक छायाचित्रकारांना गर्भवती महिलांचं सौंदर्य नव्यानं समजून घेण्यात मदतच होणार आहे. गर्भवती असताना बाळाच्या वाढीनुसार वाढणारा पोटाचा आकार आता चिंतेचं, लज्जेचं आणि संकोचाचं विशेषत: लपवण्याचं कारण नाही तर आनंदाचं, अभिमानाचं कारण असणार आहे.
गर्भावस्थेत आपण कसे दिसतोय? या प्रश्नाला आता कायमचाच पूर्णविराम मिळेल. बेबीमून, बेबी बम्प फोटोेशूट हे नवे ट्रेण्ड भारतातही सेट होताय. एरवी गर्भवती अभिनेत्रीची एक झलक कॅमेऱ्यात बंदिस्त करण्यासाठी छायाचित्रकार धडपडत असत आता तर त्या स्वत:हूनच कॅमेऱ्यासमोर येताहेत. सेलिब्रेटींमधल्या या धाडसी स्त्रीचं म्हणूनच जगालाही कौतुक वाटतं.