केस गळतीऐवजी कॅन्सरच्या पेशंट्सचे केस झाले काळे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 19:17 IST2017-07-22T17:51:46+5:302017-07-24T19:17:37+5:30
कसा झाला हा चमत्कार? पेशंट आनंदात, तर डॉक्टर उत्तराच्या शोधात..

केस गळतीऐवजी कॅन्सरच्या पेशंट्सचे केस झाले काळे!
- मयूर पठाडे
कॅन्सर पेशंटचा मुख्य प्रॉब्लेम काय असतो? एकतर आधीच ते दुर्धर आजारानं त्रस्त असतात, शिवाय त्यांच्या डोक्यावरचे सारे केस उडून जातात. डॉक्टरांंचं तर म्हणणं आहे की, प्रत्यक्ष आजारापेक्षा बरेच रुग्ण त्यांच्या उडालेल्या केसांनीच अधिक खचतात आणि आपलं आता काही खरं नाही, आता आपले थोडेच दिवस राहिलेत अशा मानसिकतेत ते जातात.
केमोथेरपीनंतर सगळ्यांचेच केस जातात, पण संशोधकांना नुकताच एक आश्चर्यजनक प्रकार पाहायला मिळाला. केमोथेरपीनंतर एका पेशंटच्या डोक्यावरील केस जाणं तर सोडा, उलट त्या पेशंटच्या डोक्यावरील पांढरे केस काळे झाले!
ही अपवादात्मक घटना असेल असं अगोदर शास्त्रज्ञांना वाटलं होतं, पण त्यांनी अधिक खोलात जाऊन अभ्यास केला, शोध घेतला तर त्यांना आढळून आलं, असे तब्बल १४ पेशंट आहेत, ज्यांच्या डोक्यावरचे केस केमोथेरपीनंतर जाण्याऐवजी उलट त्यांच्या केसांचा रंग बदलला. म्हणजे ज्यांचे केस पांढरे, करडे होते त्यापैकी काहींचे ब्राऊन झाले, तर काहींचे काळे!
कसं काय झालं असं?
हा काय चमत्कार आहे?
संशोधकांनी अधिक खोलात जाऊन अभ्यास केल्यावर त्यांच्या लक्षात आलं, कॅन्सरवर मात करण्यासाठी या साऱ्या रुग्णांवर नव्या प्रकारच्या थेरपीने उपचार करण्यात येत होते. त्याच थेरपीचा परिणाम म्हणून या साऱ्यांचे केस काळे झाले!
यातील अनेकांनी पांढऱ्या केसांचे आपले जुने आणि काळ्या केसांचे नवे फोटो आनंदानं शेअरही केले.
पण त्यातही आश्चर्याची गोष्ट म्हणजे या नव्या पद्धतीने उपचार घेणाऱ्या साऱ्याच रुग्णांचे केस काळे झाले नाहीत. तरीही हे प्रमाण बऱ्यापैकी होतं. कॅन्सरच्या एकूण ४२ रुग्णांवर ही थेरपी वापरण्यात आली, त्यापैकी १४ जणांचे केस काळे झाले.
आता ते नेमके कशामुळे झाले, केवळ त्यांचेच का झाले, इतरांचे का झाले नाही, या कारणानं शास्त्रज्ञ डोकं खाजवताहेत.
त्यातलं आणखी एक गौडबंगाल म्हणजे हेच औषध याच आजारावर म्हणजे कॅन्सरवर वापरलं जात होतं, तेव्हा केमोथेरपीनंतर पेशंट्सचे केस गळत होते. मग आता असं काय झालं, की या रुग्णांना केसगळतीऐवजी काळ्या केसांचा उपहार मिळाला!
(फोटो सौजन्य- असोसिएटेड प्रेस)
शास्त्रज्ञ त्याबद्दल अजूनही आपलं डोकं खाजवताहेत, पण त्याबद्दल त्यांचा अंदाज असा आहे, ज्या रुग्णांचे केस काळे झाले, ते सारे रुग्ण फुफ्फुसाच्या कॅँन्सरचे होते. इतर पेशंटही कॅन्सरनेच त्रस्त होते, पण त्यांचा कॅन्सर वेगळ्या प्रकारचा होता. आणि ही जी नवी थेरपी या रुग्णांवर वापरली गेली, त्यात असे काही घटक असावेत, की केसांतले मुळ रंगद्रव्य पुन्हा निर्माण करीत असावेत..
या साऱ्याच प्रश्नांची उत्तरं शोधण्यात सध्या ते गुंतले आहेत, पण ज्या रुग्णांचे केस गळण्याऐवजी उलट काळे झाले, ते रुग्ण मात्र आनंदात आहेत. या किमयेमुळे ते पहिल्यापेक्षा अधिक तजेलदार आणि तरुणही दिसायला लागले आहेत...