Created By: आजतक Translated By: ऑनलाईन लोकमत
हातात काठ्या, चाकू आणि तलवारी घेऊन एका महिलेवर हल्ला करणाऱ्या पुरुषांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गुलाबी कुर्ता-पायजमा घातलेली ही महिला तिचा दुपट्टा कमरेला घट्ट बांधते. मागून 'रोलिंग, एक्शन' असा आवाज येताच, गुंड हल्ला करतात आणि ती महिला लाथा-बुक्क्यांनी त्यांचा सामना करते.
महाकुंभमध्ये व्हायरल झालेली मोनालिसा असल्याचं लोकांचं म्हणणं आहे. मोनालिसा दिग्दर्शक सनोज मिश्रा यांच्या 'द डायरी ऑफ मणिपूर' नावाच्या चित्रपटात काम करत आहे. हा व्हिडीओमोनालिसाचा असल्याचा दावा करणाऱ्या अनेक बातम्या आतापर्यंत प्रकाशित झाल्या आहेत.
फेसबुकवर हा व्हिडीओ शेअर करताना एका व्यक्तीने म्हटलं की, “प्रयागराज महाकुंभात माळा विकताना व्हायरल झालेली मोनालिसा आता चित्रपटांमध्ये शूटिंग करत आहे. ती गुंडांना मारत आहे. काळ किती लवकर बदलला आहे. म्हणून जे कमकुवत आहेत त्यांच्यावर तुमची ताकद दाखवण्यापूर्वी,तुम्ही याचा विचार केला पाहिजे जेणेकरून कमीत कमी तुम्हाला मागे वळून पाहावं लागणार नाही."
आज तक फॅक्ट चेकमध्ये असं आढळून आलं की, हा व्हिडीओ मोनालिसाचा नसून 'ये है चाहतें' या मालिकेचे शूटिंग करणाऱ्या अभिनेत्री शगुन शर्माचा आहे.
सत्य कसं कळलं?
व्हिडिओच्या कीफ्रेम्स रिवर्ल सर्च केल्यावर, आम्हाला तो व्हिडीओ २५ जानेवारी २०२५ रोजीच्या एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये सापडला.
थोडा जास्त शोध घेतल्यानंतर आम्हाला या शूटिंगचे आणखी काही व्हिडीओ सापडले. या महिलेचे गुंडांना मारहाण करतानाचे व्हिडीओ २०२४ आणि २०२३ मध्येही पोस्ट करण्यात आले होते.
मोनालिसाला चित्रपट मिळण्याची बातमी या वर्षी जानेवारीमध्ये आली. सनोज मिश्रा यांनी स्वतः २२ जानेवारी रोजी पहिल्यांदा मोनालिसाबद्दल पोस्ट केली होती. येथे हे स्पष्ट होतं की हा शूटिंग व्हिडीओ मोनालिसाला चित्रपट मिळण्यापूर्वीचा आहे.
ही महिला कोण?
आम्हाला 'फ्रेमिंग थॉट्स एंटरटेनमेंट' नावाच्या यूट्यूब चॅनेलवर सुमारे ४ मिनिटांचा एक व्हिडीओ सापडला. यामध्ये गुलाबी ड्रेस घातलेली ही महिला अनेक लोकांसोबत एक्शन सीन शूट करताना दिसत आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये असं नमूद केलं आहे की, हा व्हिडीओ 'ये है चाहतें' चा बिहाइंड द सीन्स आहे.
'ये है चाहतें' ही मालिका २०१९ मध्ये टीव्हीवर सुरू झाली. त्याचा शेवटचा भाग सप्टेंबर २०२४ मध्ये आला होता. 'स्टार प्लस' आणि 'जियो हॉटस्टार' वर प्रसारित होणाऱ्या या शोमध्ये सरगुन कौर लुथरा आणि शगुन शर्मा सारख्या प्रसिद्ध कलाकारांनी काम केलं आहे.
आम्हाला अभिनेत्री शगुन शर्माच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर १ डिसेंबर २०२३ रोजीची एक पोस्ट सापडली. यामध्ये शगुनने व्हायरल व्हिडिओमधील महिलेने घातलेला गुलाबी ड्रेस आणि प्रिंटेड दुपट्टा दिसला.
यानंतर आम्ही या शोचे कार्यकारी निर्माते रंजन जेना यांच्याशी बोललो. त्यांनी आम्हाला पुष्टी दिली की व्हायरल व्हिडिओ 'ये है चाहतें' या मालिकेतील आहे आणि त्यात एक्शन करणारी महिला शगुन शर्मा आहे.
एका मालिकेच्या शूटिंगमधील जुना व्हिडीओ मोनालिसाचा असल्याचा दावा करून गोंधळ पसरवला जात आहे हे स्पष्ट आहे.
(सदर फॅक्ट चेक आजतक या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)