World Biodiversity Day : काटेपूर्णा अभयारण्यात रुजली जैवविविधता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 10:10 AM2020-05-22T10:10:08+5:302020-05-22T10:15:07+5:30

World Biodiversity Day : जिल्ह्याच्या एकूणच पर्यावरणात या अभयारण्यातील जैवविविधतेचा मोठा हातभार लागलेला आहे.

World Biodiversity Day: Biodiversity rooted in Katepurna Sanctuary | World Biodiversity Day : काटेपूर्णा अभयारण्यात रुजली जैवविविधता

World Biodiversity Day : काटेपूर्णा अभयारण्यात रुजली जैवविविधता

Next
ठळक मुद्देमहाराष्ट्राचा राज्य पक्षी हरियल या अभयारण्यात आढळतो. या अभयारण्यात २७ प्रजातींच्या पक्ष्यांचे स्थलांतर होते. अभयारण्यात कोळ््याच्या ९२ प्रजाती आढळतात.

अकोला : पर्यावरणातील घटकांचा दैनंदिन होत असलेला ºहास पाहता अकोला जिल्ह्याच्या पर्यावरणासाठी महत्त्वाचा घटक असलेल्या काटेपूर्णा अभयारण्यात विविध प्रकारची जैवविविधता रुजली आहे. जैवविविधतेची संपन्नता टिकवून ठेवण्यासाठी अभयारण्यातील मानवी हस्तक्षेप रोखण्यासोबतच पर्यावरणातील घटकांच्या संरक्षणासाठी प्रत्येकाने पुढे येण्याची गरज जैवविविधता दिनानिमित्त अधोरेखित होत आहे. अकोला जिल्ह्यातील जंगलाचे प्रमाण पाहता अत्यल्प आहे. त्यातील जैवविविधतेलाही मर्यादा आहेत. या दोन्ही बाबी पाहता काटेपूर्णा अभयारण्य जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. या अभयारण्यातील जैवविविधता पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तेवढीच महत्त्वाची आहे. या अभयारण्याचे क्षेत्र कमी असले तरी तेथे विविध जातींचे प्राणी, वनस्पती आहेत. वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ मध्ये नमूद प्राण्यांच्या नोंदीपैकी सस्तन प्राण्यांच्या २५ प्रजाती आहेत. त्यातील तीन धोकाग्रस्त झाल्या आहेत. त्यामध्ये बिबट, अस्वल, इंडियन पँगोलिनचा समावेश आहे. पक्ष्यांच्या १२३ प्रजाती आहेत.   या अभयारण्यात २७ प्रजातींच्या पक्ष्यांचे स्थलांतर होते. सोबतच महाराष्ट्राचा राज्य पक्षी हरियल या अभयारण्यात आढळतो. १९ प्रकारचे सरपटणारे प्राणी आहेत. त्यापैकी अजगर व सुसर धोकाग्रस्त आहेत. तर फुलपाखरांच्या ७४ प्रजाती आहेत. त्यातील दोन प्रजाती धोक्यात आहेत. या अभयारण्यात कोळ््याच्या ९२ प्रजाती आढळतात. तर वनस्पती प्रजातींमध्ये मोठी व मध्यम प्रकारची झाडे ५१ आहेत. झुडुपांच्या प्रजाती २३ आहेत. वेलींच्या ८ प्रजाती आहेत. बांबू व गवताच्या १८ प्रजाती आहेत. जिल्ह्याच्या एकूणच पर्यावरणात या अभयारण्यातील जैवविविधतेचा मोठा हातभार लागलेला आहे.


पक्ष्यांसाठी कृत्रिम बेट
पक्ष्यांसाठी कृत्रिम बेटांची निर्मिती हा राज्यातील पहिला अभिनव उपक्रम या अभयारण्यात सुरू झाला आहे. काटेपूर्णा अभयारण्यातील जलाशयात पक्ष्यांसाठी या बेटांची निर्मिती करण्यात आली आहे. नदी सुराय व छोटी पाण भिंगरी हे पक्षी या बेटांवर अंडी घालतात.

या अभयारण्यालगत शेती असलेल्या अनेकांनी मोठ्या प्रमाणात जमिनीवर अतिक्रमण केले आहे. ते रोखणे आवश्यक आहे. पक्ष्यांची शिकार करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्यांना आवर घालणेही आवश्यक आहे. तसेच काटेपूर्णा धरण परिसरातून चोरटी मासेमारी करणाऱ्यांमुळेही जैवविविधतेतील अनेक घटकांच्या दैनंदिन वास्तव्यात व्यत्यय निर्माण केला जात आहे.


अभयारण्यातील जैवविविधता वाढविण्यासाठी तीन वर्षांपासून प्रयत्न केले. पक्ष्यांची संख्या वाढण्यासाठी नऊ कृत्रिम बेटे तयार केली. त्यामुळे पक्ष्यांची संख्या वाढली. वन्यजीवांच्या संरक्षणासाठी नाकेबंदी, चेकनाके तयार केले. परिणामी चितळची, नीलगायींची संख्या वाढली. एकूणच जैवविविधतेला हातभार लागला आहे.
- मनोजकुमार खैरनार, विभागीय वनाधिकारी, वन्यजीव, अकोला.


जिल्ह्याच्या पर्यावरणासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या अभयारण्याचेसंरक्षण आणि संवर्धन करणे, ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. पर्यावरण टिकेल तरच मानवी जीवन सुरक्षित आहे, हेही सर्वांनी ध्यानात घ्यायला हवे.
- अमोल सावंत, संस्थापक, निसर्गकट्टा.

 

 

Web Title: World Biodiversity Day: Biodiversity rooted in Katepurna Sanctuary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.