नवी दिल्ली: सामाजिक सुधारणावादी शिक्षणतज्ज्ञ व जलवायू कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी हिमनद्यांच्या संरक्षणासाठी भारताने पुढाकार घ्यावा व ही समस्या सोडवण्याच्या दिशेने पावले टाकावीत, असे आवाहन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या खुल्या पत्रात त्यांनी याचे महत्त्व विशद केले आहे.
दरम्यान, राजधानीत पत्रकार परिषदेत वांगचूक यांनी हिमालयाच्या स्थितीकडे लक्ष वेधले. ते म्हणाले की, हिमनद्या बहाल करण्यासाठी पावले उचलली गेली पाहिजेत; कारण आमच्या बारमाही वाहणाऱ्या नद्यांचे ते स्रोत आहेत, अन्यथा १४४ वर्षांनी येणारा पुढील महाकुंभ आपल्याला बहुधा वाळूमध्ये भरवावा लागेल; कारण तोवर या नद्या आटू शकतात.
बर्फाच्या तुकड्याचा प्रवास हिमालयातील हिमनद्यांच्या संरक्षणावर काम करणारे वांगचूक हे खारदुंगला येथील हिमनदीतील वर्षांचा एक तुकडा घेऊन लडाखहून दिल्ली व नंतर अमेरिकेत गेले. बर्फाच्या इन्सुलेशनसाठी लडाखमधील पश्मिना लोकरीमध्ये गुंडाळून तो कंटेनरमध्ये ठेवला होता. हा बर्फ दिल्लीतील संयुक्त राष्ट्र कार्यालयात त्यानंतर अमेरिकेत नेण्यात आला. २१ रोजी बर्फाचा तो तुकडा न्यूयॉर्कमधील हडसन नदी व ईस्ट रिव्हरच्या संगमात विसर्जित करण्यात आला. जागतिक ग्लेशियर दिवस २१ मार्च रोजी साजरा करण्यात येत असून, त्याच्या एक महिना आधी ही घडामोड घडली आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाने ग्लेशियस्च्या संरक्षणासाठी २०२५ हे आंतरराष्ट्रीय वर्ष घोषित केले असून या पार्श्वभूमीवर वांगचूक यांचे हे वक्तव्य महत्त्वाचे आहे. वांगचूक यांनी म्हटले आहे की, हिमनद्या वितळत आहेत. जंगलांची कत्तल याच वेगाने होत राहिली तर गंगा, ब्रह्मपुत्रा व सिंधूसारख्या आमच्या पवित्र नद्या मोसमी नद्या बनतील. याचमुळे १४४ वर्षांनी येणारा पुढील महाकुंभ कदाचित वाळूमध्ये घ्यावा लागेल. हा धोका टाळला पाहिजे.
वांगचूक यांनी म्हटले आहे की, भारताने ग्लेशियर वर्षात अग्रणी भूमिका बजावली पाहिजे; कारण आर्क्टिक आणि अंटार्क्टिकानंतर पृथ्वीवर जगात तिसरा सर्वांत मोठा हिमसाठा हिमालयात आहे.