सीईटी शुल्काचा विद्यार्थ्यांना ‘रिफंड’; शिक्षण मंडळाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2022 08:53 AM2022-01-06T08:53:51+5:302022-01-06T08:54:01+5:30

मागील वर्षी दहावीची परीक्षा अंतर्गत मूल्यमापन धोरणांनुसार घेण्यात आली, त्यामुळे प्रवेशात एकसूत्रीपणा येण्यासाठी मंडळाकडून अकरावी प्रवेशासाठी सीईटीचा पर्याय निवडण्यात आला होता.

‘Refund’ of CET fees to students; Board of Education information | सीईटी शुल्काचा विद्यार्थ्यांना ‘रिफंड’; शिक्षण मंडळाची माहिती

सीईटी शुल्काचा विद्यार्थ्यांना ‘रिफंड’; शिक्षण मंडळाची माहिती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने अकरावी प्रवेशासाठी आयोजित सीईटी रद्द करण्यात आली. त्यामुळे या परीक्षेसाठी घेतलेले नोंदणी शुल्क जवळपास ४४ हजार विद्यार्थ्यांना परत करण्यात येणार आहे. ज्या गेटवेमधून विद्यार्थ्यांकडून नोंदणी शुल्क भरले होते त्याच मार्गाने विद्यार्थ्यांना त्यांच्या शुल्काची रक्कम परत करण्यात येणार असल्याची माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे. 

मागील वर्षी दहावीची परीक्षा अंतर्गत मूल्यमापन धोरणांनुसार घेण्यात आली, त्यामुळे प्रवेशात एकसूत्रीपणा येण्यासाठी मंडळाकडून अकरावी प्रवेशासाठी सीईटीचा पर्याय निवडण्यात आला होता. परीक्षा रद्द होण्याआधी या सीईटीच्या नोंदणीची प्रक्रिया मंडळाने पूर्ण केली होती. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने सीईटी रद्द करण्याचे निर्देश राज्य शासनाला दिले आणि त्यानुसार परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. सीईटीसाठी राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क घेण्यात आले नव्हते. मात्र, सीबीएसई, सीआयएससीई व आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी १७८ रुपये शुल्क घेतले होते. सीईटीच रद्द झाल्याने परीक्षा शुल्क परत मिळावे, अशी मागणी विद्यार्थी, पालक व संघटनांनी केली होती. इतर मंडळांच्या विद्यार्थ्यांकडून सीईटीचे शुल्क त्यांना लवकरच परत करण्यात येणार आहे.
 

प्रतिविद्यार्थी १४३ रुपये परतावा
राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर २,०५२ आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक या संकेतस्थळावर ४१,५८२ 
विद्यार्थ्यांना ज्या पेमेंट गेटवेद्वारे व ज्या माध्यमातून परीक्षा शुल्क जमा केले आहे. त्याच मार्गाने प्रतिविद्यार्थी १४३ रुपयांप्रमाणे परीक्षा शुल्काचा परतावा करण्याचा निर्णय राज्य मंडळाने घेतला असल्याची माहिती राज्य मंडळाचे सचिव अशोक भोसले यांनी दिली.

Web Title: ‘Refund’ of CET fees to students; Board of Education information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.