लोकतम न्यूज नेटवर्कमुंबई : राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (एनटीए) रविवारी एकाच सत्रात देशभरात नीट परीक्षा घेतली. देशभरातून जवळपास २२ लाख ७० हजार विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. मात्र, यंदा फिजिक्स विषयाचा पेपर अवघड होता, अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली. त्यामुळे यंदा नीट युजीचा कट ऑफ घसरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
एमबीबीएस, बीडीएस आणि अन्य वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नीट परीक्षा महत्त्वपूर्ण आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी मोठी स्पर्धा असते. यंदा नीट यूजीचा पेपर काहीसा अवघड गेल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगितले जात आहे. त्यातून नीटचा कट ऑफ घटण्याची चिन्हे वर्तविली जात आहेत.
कोरोनानंतर यंदा काठीण्य पातळी वाढविण्यात आली होती तसेच एकाच प्रश्नाच्या उत्तरांचे पर्याय काहीसे साधर्म्य असलेले देण्यात आल्याने विद्यार्थ्यांना ते प्रश्न सोडविताना अधिक वेळ द्यावा लागत होता. त्यातून काही विद्यार्थ्यांना सर्व प्रश्न सोडविणे शक्य झाले नाही, असेही तज्ज्ञांनी नमूद केले.
‘फिजिक्स विषयाचा पेपर यंदा अवघड होता. तर, बायोलॉजी विषयाचा पेपर काहीसा वेळखाऊ होता. विद्यार्थ्यांना एकाच प्रश्नावर अधिक वेळ द्यावा लागत होता,’ अशी प्रतिक्रिया पालक प्रतिनिधी सुधा शेनॉय यांनी दिली.
एमबीबीएस, बीडीएस आणि अन्य वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नीट परीक्षा रविवारी देशभरात पार पडली. मुंबईतील अँटॉप हिल येथील केंद्रीय विद्यालयाच्या केंद्रातून परीक्षा देऊन बाहेर पडताना विद्यार्थिनी. तर शेजारील छायाचित्रात ठाण्यातील एका केंद्रावर ग्रामीण भागातून आपल्या पाल्यास परीक्षा केंद्रावर घेऊन आलेल्या पालकांनी परीक्षा सुरू झाल्यानंतर घरून आणलेला डबा तेथे काढून जेवण केले.