उच्चशिक्षण सुविधेबरोबर गुणवत्तेची गरज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 12:00 AM2020-06-20T00:00:47+5:302020-06-20T00:01:00+5:30

सध्याच्या स्थितीत शिक्षणाबद्दल विचार करायचा असेल, तर जागतिकीकरण, संगणकीकरण, माहिती तंत्रज्ञानाचे युग आणि ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्था अशा महत्त्वपूर्ण संकल्पनांना नजरेआड करून चालणार नाही.

The need for quality with higher education facilities | उच्चशिक्षण सुविधेबरोबर गुणवत्तेची गरज

उच्चशिक्षण सुविधेबरोबर गुणवत्तेची गरज

googlenewsNext

- आविष्कार देसाई

आज सर्वच क्षेत्रांतील शिक्षण घेणे महाग झाले आहे. आपल्या मुलाला चांगल्या शाळा, कॉलेजमध्ये उत्तम शिक्षण मिळण्यासाठी पालक धडपडत आहेत. या शैक्षणिक क्षेत्रात मोठी स्पर्धा वाढली आहे. अशात बेताचीच परिस्थिती असलेले पालकही नाना खटापटी करून, आपल्या मुलांना एरोनॉटिकल इंजिनीअरिंग, कॉम्प्युटर सायन्स, फॅशन डिझायनिंग किंवा हॉटेल मॅनेजमेंट अशा कोर्सना पाठवत आहेत. त्यासाठी नवी मुंबई ही रायगडमधील अनेक विद्यार्थ्यांसाठी उपकारक ठरल्याचे स्पष्ट चित्र आपल्याला दिसत आहे.

शिक्षण हा मानवी उन्नतीचा भक्कम पाया आहे. माणसाचा विकास साधणारे ते साधन आहे. रायगड जिल्हा पनवेलपासून पोलादपूरपर्यंत आणि श्रीवर्धन तालुक्यापर्यंत पसरलेला आहे. सध्याच्या स्थितीत शिक्षणाबद्दल विचार करायचा असेल, तर जागतिकीकरण, संगणकीकरण, माहिती तंत्रज्ञानाचे युग आणि ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्था अशा महत्त्वपूर्ण संकल्पनांना नजरेआड करून चालणार नाही.

रायगड जिल्हा मुंबईला लागून आहे आणि विद्येचे माहेरघर समजले जाणारे पुणेही जिल्ह्याच्या जवळ आहे. ही केंद्रे शैक्षणिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहेत. ऐतिहासिक काळातही येथील अनेक सामाजिक राजकीय नेते पुण्या-मुंबईकडे शिकण्यासाठी गेले होते असा इतिहास आहे; परंतु हे प्रमाण तुरळक होते. समाजातील प्रत्येक स्तरापर्यंत शिक्षण पोहोचले नव्हते. त्यामुळे शहरांमध्ये शिक्षणासाठी जाणारे आर्थिकदृष्ट्या प्रगत वर्गांमधील होते. १९९०च्या दशकात नवी मुंबईत अनेक शैक्षणिक संस्थांनी जन्म घेतला. त्या ठिकाणी शिक्षण घेणे मध्यमवर्गाच्या आवाक्यात होते. म्हणजेच रायगडमधील पेण आणि आसपासच्या परिसरातील विद्यार्थी दहावी-बारावीनंतर नवी मुंबईकडे जाऊ शकत होते आणि सध्याही जात आहेत. आपल्या जवळचे आणि शिक्षणाचे उत्तम ठिकाण म्हणून पालक आणि मुलांकडूनही नवी मुंबईला पसंती दिली जात आहेत. विविध क्षेत्राबरोबरच व्यावसायिक शिक्षण देणारे कॉलेजेस नवी मुंबईत आहेत.

रायगड जिल्ह्यातही विविध शिक्षण संस्थांचा विकास झाला. कोकण एज्युकेशन सोसायटी असेल किंवा द.ग. तटकरे अथवा पीएनपी यांची शैक्षणिक संकुले असतील. शिक्षणाचा विकास जिल्ह्यातील ग्रामीण भागातही होत होता. लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तांत्रिक विद्यापीठही दक्षिण रायगडमधील ग्रामीण भागासाठी अत्यंत उपकारक ठरले. बॅ. ए. आर. अंतुले यांची दूरदृष्टी शिक्षणाच्या प्रांतातही अनुभूतीस येते, हे यावरून सहज लक्षात येते. उत्तर रायगडकर मुंबई-नवी मुंबईकडे उच्चशिक्षणासाठी जात होते आणि तुरळकपणे दक्षिण रायगडमधून नवी मुंबईकडे ओढा होता. माणगाव, महाड, श्रीवर्धन, तळा येथून पुण्याकडेही शिक्षणासाठी जाणारे अनेक होते आणि आजही आहेत.

आज अभियांत्रिकी महाविद्यालये रायगडमध्ये आहेत, परंतु अभियांत्रिकी शाखेलाच एक साचलेपण आल्याचा मतप्रवाह आहे. शिक्षणाच्या सुविधा जरूर निर्माण झाल्या, परंतु शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रोजगारासाठी वणवण भटकण्याची वेळ येथील युवकांवर आलेली आहे. सरकारने शैक्षणिक संस्था आणि औद्योगिक कंपन्या यांच्यात ताळमेळ घालणाऱ्या अनेक योजना आखलेल्या आहेत. मात्र, आजही त्यासाठी राखून ठेवलेला निधी प्रशासनाला वापरता
येत नाही.

रायगडपुढे खूप आव्हाने आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शक्षण, शैक्षणिक सोयी निर्माण झाल्या, पण गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी कोण देणार? हा मोठा प्रश्न आजही कायम आहे. भारताचे पहिले अर्थमंत्री सी. डी. देशमुख हे रोहा येथील होते. सी.डी. देशमुख खरे तर वनस्पती शास्त्रातून एम.एस्सी झाले होते, पण त्यांचे अर्थशास्त्रावरील प्रभुत्व भल्याभल्यांनाही चकीत करणारे असेच होते. गुणवत्ता याला म्हणतात. रायगडच्या शैक्षणिक मूल्यमापनानिमित्त सीडींची आठवण येणे क्रमप्राप्त आहे. असे अनेक क्षेत्रांमध्ये उत्तुंग नेतृत्व रायगडने केलेले आहे ते शिक्षणाच्या जोरावरच. त्यांना दिलेले नुसते शिक्षण नव्हते, तर ते गुणवत्तापूर्ण शिक्षण होते. आज जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची भाषा करणाऱ्यांनी हे गुणवत्तापूर्ण शिक्षण हे शिवधनुष्य पेलल्यास युवावर्गाच्या प्रगतीला काही अर्थपूर्ण आयाम निश्चितपणे लाभतील, यामध्ये शंका असण्याचे कारण नाही.

Web Title: The need for quality with higher education facilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.