हवामान बदलाच्या नांदीला मिळतोय युवा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 01:56 AM2019-03-25T01:56:05+5:302019-03-25T01:56:16+5:30

आपल्या देशात सध्या निवडणुकांचे पडघम वाजताहेत आणि एकूणच शैक्षणिक क्षेत्रात परीक्षा सुरू आहेत. किमानपक्षी तसं वातावरण तरी आहे. मात्र याचवेळी जगामधील बऱ्याच शालेय विद्यार्थ्यांचं मात्र एक वेगळ्या प्रकारचं आंदोलन सुरू आहे.

Youth Response to the Spotlight of Climate Change | हवामान बदलाच्या नांदीला मिळतोय युवा प्रतिसाद

हवामान बदलाच्या नांदीला मिळतोय युवा प्रतिसाद

Next


-  शैलेश माळोदे (विज्ञान लेखक)

आपल्या देशात सध्या निवडणुकांचे पडघम वाजताहेत आणि एकूणच शैक्षणिक क्षेत्रात परीक्षा सुरू आहेत. किमानपक्षी तसं वातावरण तरी आहे. मात्र याचवेळी जगामधील बऱ्याच शालेय विद्यार्थ्यांचं मात्र एक वेगळ्या प्रकारचं आंदोलन सुरू आहे. १५ मार्च २०१९ च्या शुक्रवारपासून बहुतांश विकसित आणि बऱ्याच विकसनशील देशांतल्या विद्यार्थ्यांनी जगातल्या नेत्यांनी ‘हवामान बदलाच्या’ संकटावर ठोस कृती करावी म्हणून शाळेतून बाहेर पडून आपापल्या देशांतील संसदेपुढे धरणं धरून आंदोलन सुरू केलंय. सरकारांनी केवळ चर्चेची गुºहाळं चालवून आणि कुरघोडीचं राजकारण न करता ठोस निर्णय घेऊन या सर्व लोकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्यवाही करावी म्हणून दर शुक्रवारी हे आंदोलन स्वयंस्फूर्तीने विद्यार्थ्यांनी सुरू केलंय.
जानेवारी २०१९ पासून व्हनेसा नकाते नावाच्या एका २२ वर्षीय तरुणीनं बºयाचदा एकटीने, काही वेळा मित्र आणि भावंडांच्या मदतीनं युगांडाची राजधानी कंपालामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दर शुक्रवारी आंदोलन करण्यास सुरुवात केली. त्याकरिता ती कारच्या बॅटरीज विकण्याच्या कामावरदेखील शुक्रवारी उशिरा जात असे. कधी ती एखाद्या मॉलसमोर उभी राहून तर कधी संसदेजवळ ती धरणं धरत असे. तिचं उद्दिष्ट एकच ते म्हणजे ‘हवामान बदलाकडे’ लक्ष वेधून तिच्या सरकारला कृती करण्याचं आवाहन करणं.
१५ मार्चपासून मात्र नकाते एकटी नसून जगभरातील १७०० शहरांतील (१०० देशांमधील) हजारो तरुण-तरुणी प्रौढांना हवामान बदलास तोंड देण्यासाठी ठोस काही करण्याची मागणी करताहेत. नेपाळपासून ते राबुटूसारख्या छोट्या देशांपर्यंतचे विद्यार्थी नीती निर्धारक आणि बड्या बहुराष्टÑीय कंपन्यांच्या सीईओंना जागृत करण्यासाठी जोरदारपणे प्रयत्न करताहेत. भारतात सध्या निवडणुका आहेतच तेव्हा याबाबत जागरूकता निर्माण करण्याची एक संधी असून राजकीय पक्षांपुढे आपल्या विचारांना ठेवता येणं शक्य आहे. मात्र त्याचवेळी शाळांमध्ये परीक्षा आणि नंतरच्या सुट्ट्या असल्यामुळे हवामान बदलाचा मोठा धोका असलेल्या भारतासारख्या देशात याविषयी काहीशी सुस्त परिस्थिती आहे.
तरुण आळशी असतात अशी धारणा जगातील या आंदोलनामुळे चुकीची असल्याचं दिसून येतंय. त्याचबरोबर सरकारांनी पुढील पिढ्यांवरील वाईट प्रभावांना दूर करण्यासाठी प्राधान्यक्रम देणं आता गरजेचं ठरतंय. सामाजिक माध्यमांमुळे अधिकाधिक तरुण याबाबत जागृत होत आहेत. त्यांनी आपल्या शाळा-कॉलेजामधून बाहेर पडून असं आंदोलन करण्यास काही राजकारण्यांचा (ब्रिटिश पंतप्रधान थेरेसा मे यांच्यासहित) विरोध असला तरी जगभरातील शास्त्रज्ञांनी मात्र आंदोलनास पाठिंबा दिलाय. हवामान आंदोलनाची कल्पना खूपच भारी आणि नावीन्यपूर्ण आहे, यात वाद नाही. अवघ्या काही महिन्यांमध्ये या ‘ग्रासरुट्स’वरील आंदोलनाने एका सार्वत्रिक आंदोलनाचं रूप धारण करण्यास सुरुवात केलीय. नकातेसारख्या अनेक आंदोलकांना ग्रेटा थुनबर्ग या स्विडीश किशोरी (टीनएजर) पासून प्रेरणा लाभलीय. तिने आॅगस्ट २०१८ पासून नियमितपणे वर्गातून बाहेर पडून स्विडीश संसदेसमोर स्टॉकहोमला स्कूल स्ट्राइक फॉर क्लायमेट या अर्थाचा नामफलक घेऊन बसण्यास सुरुवात केली होती.
थुनबर्गचं उदाहरण लक्षात घेऊन बेल्जियम ते आॅस्ट्रेलियामध्ये हजारांनी गेल्या काही महिन्यांत अशी आंदोलनं केली आहेत. मात्र १५ मार्चच्या घटनेनंतर तरुण आंदोलकांनी त्यांच्या देशात हॅशटॅग tridays for future आणि yuth strike 4 climate  याद्वारे सामाजिक माध्यमांवर धूम उडवून दिलीय. थुनबर्ग या तरुणांच्या आंदोलनाची फिगरहेड बनलीय. मोठ्यांच्या हवामान बदलाविषयीच्या बेफिकिरीमुळे त्याच्या विरोधात प्रतीक म्हणून तिला जगभर प्रसिद्धी लाभलीय. कॅटोवाइस (पीलंड) मधील संयुक्त राष्टÑांच्या हवामान परिषदेत केलेल्या भाषणात ती म्हणते, ‘‘तुम्ही म्हणता की तुम्ही तुमच्या मुलांवर इतर कशापेक्षाही अधिक प्रेम करता आणि तरीही त्यांच्या डोळ्यादेखत तुम्ही त्यांचं भविष्य चोरून घेत आहात.’’
सोपा पर्याय शोधणं हे राजकारण्यांचं नेहमीचं धोरण असतं. त्यामुळे भारतात सध्या निवडणुका होऊ घातल्यामुळे भविष्याचे वारे कुणीकडे वाहताहेत हे लक्षात घेऊन उपभोगात मश्गूल नागरिकांना या तरुणांच्या देशाच्या भविष्याकडे डोळे उघडून बघणं भागच आहे. अन्यथा सामाजिक असंतोष आणि युवाशक्ती हे एक विध्वसंक समीकरण ठरू शकतं.

Web Title: Youth Response to the Spotlight of Climate Change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :weatherहवामान