शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा, दिवाळीत करा बंपर वस्तू खरेदी; जीएसटी लागणार कमी
2
आंदोलनाचा व्यापाराला १०० कोटींचा फटका, रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचा दावा 
3
आंदोलनामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई कोण देणार? प्रतिज्ञापत्र सादर करा, उच्च न्यायालयाचे निर्देश
4
पाकिस्तानी क्रिकेटरवर लैंगिक अत्याचाराचा आरोप, पोलिसांनी मैदानातून उचललं, कोर्टानेदिला निकाल
5
जीआर नव्हे, ही तर माहिती पुस्तिका, मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांची टीका
6
शाब्बास..! मुंबई पोलिस, महापालिका, तुम्ही संयम शिकवला !
7
ओबीसींमध्ये जीआरवरून तीव्र संताप, जीआरविरोधात कोर्टात जायची तयारी
8
मध्यरात्रीनंतर सोलार एक्सप्लोजिव्हमधील स्फोटांनी हादरले बाजारगाव, एकाचा मृत्यू : १६ कामगार जखमी, चौघे अत्यवस्थ
9
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
10
आजचे राशीभविष्य - ४ सप्टेंबर २०२५, आज यश, कीर्ती व आनंद लाभेल, नोकरीत सहकारी चांगले सहकार्य करतील
11
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
12
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
13
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
14
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
15
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
16
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
17
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
18
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
19
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
20
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...

स्मृती सोबतीला असा तुझा हा प्रवास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2015 03:14 IST

जन्माला आलेला प्रत्येक जीव एक ना एक दिवस जातो, हे त्रिकालाबाधीत सत्य असले तरी या भूतलावर काही पाखरे अशी असतात की जी जाताना आपल्या कर्तृत्वाच्या खुणा स्मृतीच्या

जन्माला आलेला प्रत्येक जीव एक ना एक दिवस जातो, हे त्रिकालाबाधीत सत्य असले तरी या भूतलावर काही पाखरे अशी असतात की जी जाताना आपल्या कर्तृत्वाच्या खुणा स्मृतीच्या रूपाने ठेऊन जातात. ज्येष्ठ कवी महाराष्ट्र भूषण मंगेश पाडगावकर त्यापैकीच एक. ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ असा जगण्याचा आंतरिक मौलिक सल्ला देणारे आणि ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे काय असते, तुमचे आणि आमचे सेम असते’ इतक्या सहजसुलभ शब्दात प्रेममाहात्म्य सांगणाऱ्या काव्यविश्वातील अखंड लखलखणाऱ्या या ताऱ्याने बुधवारी सकाळी वयाच्या ८६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आणि अवघ्या काव्यरसिकांना शोकसागरात बुडवून हा आनंदयात्री अनंताच्या प्रवासाला निघून गेला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ल्याच्या कसदार भुईतून उगवलेला हा प्रतिभासंपन्न कवी वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षीच कवितेच्या प्रेमात पडला होता. मराठी व संस्कृत या दोन विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी काही काळ मुंबईच्या रूईया महाविद्यालयात अध्यापनाचेही काम केले. पण त्यात फार काळ न रमता त्यांनी काव्यसंसार फुलवण्यावरच लक्ष केंद्रीत केले. साहित्याच्या माध्यमातून लोकाना ब्रह्मज्ञान शिकविणाऱ्या अनेक साहित्यिकांच्या तळाशी पावलोपावली आपल्याला विरोधाभासाचा काळोख दिसून येतो, मात्र पाडगावकर त्यास अपवाद होते. त्यांचे लिहिणे ,बोलणे, वागणे, जगणे यात काहीही भेद नव्हता. इतकी पारदर्शकता, नितळता आणि शब्दाशी इमान राखण्याची अस्सलता त्यांच्यात ठासून भरलेली होती. कविश्रेष्ठ बा. भ. बोरकर आणि कविकुलगुरू कुसुमाग्रजांच्या काव्याच्या प्रभावाखाली सुरू झालेला त्यांचा प्रवास दिवसेंदिवस बहरतच गेला. बोरकर-कुसुमाग्रजांच्या काव्यशैलीचे अनुकरण न करता पाडगावकरांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आणि तीच काव्यरसिकांना खऱ्या अर्थाने भावली. ‘सलाम’ आणि ‘प्रेम म्हणजे...’ या दोन कविता त्यांच्या तोंडून ऐकणे म्हणजे रसिकांना एक पर्वणीच वाटायची. बालकविता, भावगीते, प्रेमकविता, निसर्ग कविता व चिंतनशील कविता अशा भावविभोर व सर्वस्पर्शी कविता लिहिताना या कवीने आयुष्यभर मिश्किलपणा कसा जपला हे कोडे भल्याभल्यांना आजवर उलगडलेले नाही. ‘कुठे शोधिसी रामेश्वर’ हे भावगीत असो की ‘शुक्रतारा, मंद वारा’, ‘मान वेळावूनी धुंद बोलू नको’, ‘दिवस तुझे हे फुलायचे’, ‘दिल्या घेतल्या वचनांची’ ही प्रेमगीते असो वा ‘सांग सांग भोलानाथ’ हे बडबडगीत असो ही अजरामर आणि सर्वमुखी फेर धरणारी गीते म्हणजे पाडगावकरांनी महाराष्ट्राला दिलेली देनंच म्हणावी लागेल. ‘धारानृत्य’ हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह पण त्यांना खरी ओळख, मान-सन्मान दिला तो ‘जिप्सी’ आणि ‘सलाम’ या काव्यसंग्रहांनी. ‘सलाम’ला १९८० साली साहित्य अकादमीने पुरस्काराच्या माध्यमातून ‘सलाम’ ठोकला आणि हा कवी लाखो चाहत्यांच्या हृदयसिंहासनावर कायमचा आरूढ झाला. अनेक मान-सन्मान त्यांच्या वाट्याला आले तरी ती विशेषणे ‘मंगेश पाडगावकर’ या दोन शब्दांपुढे थिटी वाटावीत इतके रसिकप्रेम त्यांना लाभलेले होते. त्यानंतरच्या काळात पाडगावकरांनी ‘निंबोणीच्या झाडामागे’, ‘छोरी’, ‘शर्मिष्ठा’, ‘विदूषक’, ‘भोलानाथ’, ‘भटके पक्षी’ यासह ३२ हून अधिक काव्यसंग्रह, वात्रटिका, मीराबार्इंच्या भजनांचा आणि कबीरांच्या दोह्यांचा अनुवाद तर केलाच शिवाय ‘वादळ’ आणि ‘ज्युलिअस सीझर’ या नाटकांचे लेखनही केले. काव्यवाचनाचा प्रकार फारसा रूढ नसतानाच्या १९६० ते ७० च्या दशकात कविता जनसामान्यांपर्यंत पोहचावी आणि साहित्यिक केवळ साहित्यसंमेलनातच भेटतात हा समज खोडून काढण्यासाठी विंदा करंदीकर, वसंत बापट व पाडगावकर या त्रयीने कविता सादरीकरणाचे अनोखे असंख्य प्रयोग महाराष्ट्रभर केले. गावोगावी कवितेला प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र भूषण’ सन्मानाने त्यांना अलंकृत केले तरी या कवीचे पाय अखेरपर्यंत मातीचेच राहिले. अहंकाराचा वारा अंगाला स्पर्शू न देणारा हा कवी आयुष्यभर काव्यरसिकांच्या ऋणात राहणेच पसंत करीत राहिला. केवळ तुमच्यामुळेच माझ्या कवितांना आणि मलाही अस्तित्व आहे अशी प्रांजळ कबुली देताना ‘इतकं दिलंत तुम्ही मला, खरं सांगतो माणूस केलंत तुम्ही मला’ असे सांगायला हा कवी कधी विसरला नाही. महाराष्ट्र भूषण ‘पुल’नी जसे महाराष्ट्राला हसणे शिकवले तसे पाडगावकरांनी महाराष्ट्राला प्रेम करायला शिकवले. ज्याच्या स्मृती अनंत काळपर्यंत जपाव्यात इतका ‘पाडगावकर पर्वा’चा प्रवास सुंदर राहिला. समस्त मराठीजनांच्या हाती कवितेचे अक्षरलेणं देऊन झाल्यानंतर आजही रसिकांना हवेहवेसे वाटत असतानाच ते एकाएकी निघून गेले. त्यामुळे पाडगावकर आता तुम्हीच सांगा, काव्यरसिकांनी कसं जगायचं...कण्हत कण्हत की तुमचं गाणं म्हणत?