आपण अजून अपरिपक्वच
By Admin | Updated: April 17, 2015 23:44 IST2015-04-17T23:44:45+5:302015-04-17T23:44:45+5:30
देशाच्या पंतप्रधानपदावर असलेल्या जबाबदार नेत्याने विदेशात जाऊन स्वदेशी राजकारणाची बदनामी करणारी भाषणे द्यावी काय, हा प्रश्न कायद्याचा नसला तरी आंतरराष्ट्रीय संकेतांचा आहे.

आपण अजून अपरिपक्वच
देशाच्या पंतप्रधानपदावर असलेल्या जबाबदार नेत्याने विदेशात जाऊन स्वदेशी राजकारणाची बदनामी करणारी भाषणे द्यावी काय, हा प्रश्न कायद्याचा नसला तरी आंतरराष्ट्रीय संकेतांचा आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा, इंग्लंडचे पंतप्रधान कॅमेरून किंवा जर्मनीच्या चॅन्सेलर (पंतप्रधान) अँजेला मेर्केल या नेत्यांनाही त्यांच्या देशातील विरोधी राजकारणाला तोंड द्यावे लागले आहे. आपल्या राजकीय विरोधकांना पराभूत करूनच त्यांनी त्यांची सत्तास्थाने मिळविली आहेत. मात्र एकवार सत्तास्थान मिळविले की ते मिळविणारा नेता त्याच्या पक्षाचाच केवळ उरत नाही. तो साऱ्या देशाचा नेता होतो. देशांतर्गत राजकारणात बोलताना तो पक्षीय राहू शकत असला तरी परदेशात गेल्यानंतर त्याला आपली प्रतिमा राष्ट्रीयच राखावी लागते. आपल्या देशाचे एकात्म राजकीय स्वरूपच त्याला जगासमोर उभे करावे लागते. भारतात आलेल्या ओबामांनी त्यांच्या येथील भाषणात त्यांच्या विरोधी पक्षांविषयी किंवा त्यांच्या जुन्या सरकारांविषयी कधी टीकेचे उद््गार काढले नाहीत. कॅमेरून, मेर्केल किंवा फ्रान्सचे होलेंडेही त्यांच्या स्वदेशी विरोधकांविषयी विदेशात कधी अपशब्द काढत नाहीत. फार कशाला आपल्या यापूर्वीच्या पंतप्रधानांनीही तसे केल्याचे कधी दिसले नाही. कारण उघड आहे. लोकशाहीत सरकारे बदलतात. आजचे सत्ताधारी उद्याचे विरोधक होतात आणि कालचे विरोधक आज सत्ताधारी होऊ शकतात. देश व देशाचे हित या गोष्टी मात्र कायम राहतात. त्याचमुळे विदेशातील व्यासपीठांवरदेखील आपल्या स्वदेशी विरोधकांविषयी आदराने बोलणे समंजस नेत्यांकडून अपेक्षित असते. चर्चिल आणि अॅटली हे दोन ब्रिटिश नेते देशात असताना परस्परांवर टोकाची टीका करीत. मात्र परदेशात गेल्यानंतर ते एकमेकांविषयी अतिशय आदराने व कौतुकानेच बोलताना दिसत. या स्थितीत फ्रान्स, जर्मनी व कॅनडात नरेंद्र मोदींनी केलेली भाषणे तपासून पाहण्याजोगी आहेत. ‘पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी घाण करून ठेवली. आम्ही ती साफ करीत आहोत. स्कॅम इंडिया ही देशाची प्रतिमा बदलून ती स्कील इंडिया बनवीत आहोत’ असे वक्तव्य मोदी यांनी त्यांच्या विदेशदौऱ्यात जाहीरपणे केले आहे. मोदींच्या सरकारपूर्वी भारतावर काँग्रेसच्या डॉ. मनमोहनसिंग सरकारचे राज्य होते. त्याआधी त्यावर भाजपाच्या अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार अधिकारारूढ होते. पं. नेहरुंपासून आतापर्यंत १४ पंतप्रधानांनी देशाच्या राजकारणाची धुरा वाहिली. त्याचे आर्थिक आणि औद्योगिकच नव्हे तर आण्विक क्षेत्रातील महत्त्व वाढविले. मोदींचे म्हणणे खरे मानले तर त्या साऱ्यांनी देशात नुसती घाणच करून ठेवली आणि एकट्या मोदींवर ती साफ करण्याचे उत्तरदायित्व आज येऊन पडले. पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर याच मोदींनी त्यांच्या सर्व पूर्वसुरींनी केलेल्या चांगल्या कामाचा यथोचित गौरव केला होता, हे येथे आठवायचे. मोदींचे सरकार देशात सत्तारूढ झाले तेव्हा सारा देश नवा झाला नाही. तो पूर्वी होता आणि विकसितही होत होता. मोदींच्या नंतरही तो राहील आणि विकसितच होत राहील. मात्र याचे भान न राखणारे पुढारी ‘बाकी सारे वाईट आणि मीच एकटा काय तो चांगला’ असे सांगत फिरतात. दु:ख याचे की ते हे विदेशी व्यासपीठांवर आणि विदेशी नेत्यांच्या उपस्थितीत बोलतात. असे बोलणाऱ्या नेत्यांची किंमत ऐकणारे ओळखतात आणि त्याच वेळी ते त्याच्या कुवतीची परीक्षाही करीत असतात. असली वक्तव्ये करून नरेंद्र मोदींनी भारताची एकात्मता जगासमोर मांडली की त्याच्यातील राजकीय दुहीचे चित्र जगासमोर उभे केले? मोदी हे भाजपाचे पंतप्रधान आहेत की भारताचे? पक्षाचा अभिनिवेश आणि वेश कुठे मिरवावा आणि कुठे टाकावा याविषयीचे भान त्यांच्यासारख्या उच्चपदस्थाने राखायचे नाही तर कोणी राखायचे? इंग्लंड, अमेरिका, कॅनडा किंवा फ्रान्स यासारख्या देशाच्या एखाद्या नेत्याने विदेशात जाऊन आपल्या स्वदेशी विरोधकांची अशी निंदा केली असती तर त्या देशातील प्रसिद्धीमाध्यमांनी आणि जनतेनेही त्यांना असभ्य ठरवून त्यांची निर्भर्त्सना केली असती. मोदींचे सुदैव हे की त्यांच्या भोवतीच्या व्यवस्थेने त्यांना विदेशी पत्रकारांपासून दूर ठेवण्याची काळजी घेतली. अन्यथा त्यांना त्यांच्या या संकेतभंगाविषयीची विचारणा तेथेच झाली असती. पुढे जाऊन तुमच्या पक्षाच्या सत्ताकाळात तुमच्या देशातील अल्पसंख्य स्वत:ला सुरक्षित समजतात काय, असा अडचणीचा प्रश्नही त्यांना विचारला असता. देशात उभ्या केल्या जाणाऱ्या धार्मिक दुभंगाविषयीही त्यांनी मोदींची उलटतपासणी केली असती. प्रश्न एकट्या नरेंद्र मोदींचा नाही. त्यांच्या वक्तव्यामुळे विदेशातील बड्या नेत्यांतच नव्हे तर सामान्य जनतेत निर्माण होणाऱ्या भारताच्या राजकीय प्रतिमेचा आहे. अशी वक्तव्ये करणारे नेतृत्व आपल्यासोबतच आपल्या देशाच्या राजकारणाच्या अपरिपक्वतेचीच जाहिरात करीत असते. अशा नेत्यांना आवरणारे कुणी नसणे आणि आपल्या व्याख्यानपटुत्वावर त्यांचे प्रसन्न असणे हीच अशावेळी चिंतेची बाब होते. मोदींच्या या वक्तव्याची भारतीय माध्यमांनीही घ्यावी तशी दखल घेतलेली न दिसणे ही त्यांच्याही दुबळेपणाची व अपरिक्वतेची साक्ष ठरणारी बाब आहे.