अजि सोनियाचा दिनु

By Admin | Updated: June 3, 2015 23:31 IST2015-06-03T23:31:33+5:302015-06-03T23:31:33+5:30

आजचा दिवस सोन्याचा म्हणजे मौलिक आहे, ज्याची तुलना दुसऱ्या कोणत्याही उपमेने होऊ शकणार नाही असा, हे ज्ञानेश्वर आपल्याला सांगत आहेत

Yes Sonia's day | अजि सोनियाचा दिनु

अजि सोनियाचा दिनु

प्रल्हाद जाधव

आजचा दिवस सोन्याचा म्हणजे मौलिक आहे, ज्याची तुलना दुसऱ्या कोणत्याही उपमेने होऊ शकणार नाही असा, हे ज्ञानेश्वर आपल्याला सांगत आहेत. ते आजच्या दिवसाविषयी बोलत आहेत. कालचा दिवस किंवा उद्याचा दिवस असे न म्हणता आजचा दिवस त्यांनी निवडला आहे. दिवसाला चोवीस तास असतात. त्यापैकी बारा तास रात्रीचे. उरलेल्या बारा तासात आपण जेमतेम आठ तास काम करणार. म्हणजे किती कमी वेळ आपल्या हातात आहे, हे लक्षात यावे. माणसाचा जन्म एकदाच मिळतो हे आता सर्वांना माहीत आहे. त्याचे जगणे क्षणभंगुर आहे, हेही सर्वांना माहीत आहे. कोणत्याही क्षणी त्याला मृत्यू गाठू शकतो. अशा स्थितीत हाती असलेला वेळ कशासाठी आणि कसा वापरायचा याचे प्राथम्य प्रत्येकानेच सकाळी उठल्या उठल्या लगेच ठरवले पाहिजे. आजचा दिवस हा जणू आयुष्यातील शेवटचा दिवस आहे असे समजून जगले तर काय होईल? तर अर्थातच त्याला सोन्याचे मोल येईल. तो सार्थकी लागेल. ‘अजि सोनियाचा दिनु’ असे ज्ञानेश्वरांनी का म्हटले आहे ते खऱ्या अर्थाने लक्षात येईल.
आज मी मला नेमून दिलेले काम उत्तमरीत्या पार पाडीन, कुणावर चिडणार नाही, कुणाला कमी लेखणार नाही, भांडण करणार नाही, कुणाचा मत्सर करणार नाही, अहंभाव बाळगणार नाही, बडेजाव मिरवणार नाही, गरजूंना मदत करीन, दु:खितांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न करीन, करीत असलेली गोष्ट छोटी की मोठी याचा विचार न करता ती मनापासून करीेन, साऱ्या जीवांशी-चराचराशी मी बंधुभावाने जोडला गेलो आहे हे लक्षात घेऊन प्रत्येक क्षणाचे सोने करण्याचा प्रयत्न करीन.
मोठी माणसे आपल्याला नेहमी सांगतात की कामात लक्ष द्या. याचा अर्थ चित्त अन्यत्र भटकू न देता वर्तमानात रहा. अभ्यासात लक्ष द्या, असे मुलांना सांगितले जाते, याचा अर्थ त्यांनीही केवळ कल्पनेच्या विश्वात भराऱ्या न मारता वर्तमानात राहून अभ्यास केला पाहिजे. असे लक्ष दिल्यानेच कामाचे उत्तम परिणाम लाभतील. अभ्यासाचे उत्तम फळ मिळेल. भूतकाळातील परिस्थिती आपण बदलू शकत नाही आणि भविष्यकाळात काय घडेल यावर आपले नियंत्रण असू शकत नाही. म्हणून आजचा हा दिवस, या क्षणीचे वर्तमान सोन्याच्या मोलाचे आहे असे ज्ञानेश्वर सांगत आहेत. ते केवळ एवढ्यावरच थांबत नाहीत तर पुढील ओळीत ‘वर्षे अमृताचा घनू’ असे म्हणत आहेत. ज्याला वर्तमान क्षणातील सोन्याची किंमत कळते त्यांच्यावर अमृताचा मेघवर्षाव सतत होत राहील. त्यासाठी कोणत्याही वेगळ्या ऋतुुचक्राची वाट पाहण्याची आवश्यकता नाही.

Web Title: Yes Sonia's day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.