यंदाचं वरीस लय भारी ठरेल वन्यजीवांच्या वाढीसाठी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2020 05:26 AM2020-01-02T05:26:10+5:302020-01-02T05:33:54+5:30

यावर्षी पाऊस भरपूर झाल्याने सगळीकडे हिरवेगार गालिचे पसरले आहेत. पाणवठे वाढले आहेत. आता गरज आहे फक्त माणसाच्या शहाणपणाची. वृक्षांचे संवर्धन करण्याची.

this year will be helpful in increasing wild life because of good rainfall | यंदाचं वरीस लय भारी ठरेल वन्यजीवांच्या वाढीसाठी

यंदाचं वरीस लय भारी ठरेल वन्यजीवांच्या वाढीसाठी

Next

- डॉ. महेश गायकवाड, पर्यावरणतज्ज्ञ

यावर्षी पाऊस भरपूर झाल्याने सगळीकडे हिरवेगार गालिचे पसरले आहेत. पाणवठे वाढले आहेत. आता गरज आहे फक्त माणसाच्या शहाणपणाची. वृक्षांचे संवर्धन करण्याची. आता जर आपण निसर्गरक्षण केले तर जैवविविधता वाढेल. स्थानिक वृक्षसंपदा झपाट्याने वाढते आहे. गाव व शहराभोवती जंगले निर्माण झाली आहेत. काही ठिकाणी मात्र अशा चांगल्या वाढलेल्या गवतावर तणनाशक मारून ती पुन्हा उजाड करण्याचे काम काही अज्ञानी करतात. हे वेळीच थांबले पाहिजे. कारण निसर्गाने जे निर्माण केलेले आहे, ते नष्ट करण्याचा मानवाला अधिकार नाही.



आज कुठेही फेरफटका मारला तर सगळीकडे रानातून खळखळ असा पाण्याचा मंजुळ आवाज येतो. अशा छोट्या-मोठ्या झऱ्यांतील पाण्याच्या आवाजाने मन प्रसन्न होत आहे, अगदी रानभर सगळीकडे अजूनही पाणी वाहत आहे. ज्या भागात गवत जास्त आहे, त्या भागात तर आजही शेतातून पाणी वाहत आहे. ज्या रानाला गवताने वेढले आहे, त्या रानात सहजपणे पाणपक्षी पोहताना दिसून येत आहेत, यात रानबदके, बगळे, चिखल्या, धोबी, चमचे, करकोचे, पानकोंबड्या, वकील, टिटवी असे नानाविध पक्षी पाहावयास मिळतात. सगळीकडे राने शेवाळली आहेत, त्यामुळे विविध पक्ष्यांचे खाद्य रानात तयार झाले आहे, उथळ पाण्यात तर अगदी लवकरच शेवाळ तयार होते. परिणामी पक्ष्यांसाठी अशी राने म्हणजे मेजवानीच असते. पाणथळ जागा म्हणजे बेडकांचे माहेरघरच, या ठिकाणी रात्रभर नर बेडूक मादी बेडकाला मोठमोठ्याने आवाज काढीत मिलनासाठी बोलावत असतो, परिणामी हजारो बेडूक निर्माण झाले आहेत. यांच्यामुळे पाणदिवड किंवा विरुळा जातीचा पाणसाप दिसायला लागला आहे, कारण गेल्या १० ते १२ वर्षांत जमिनीवर अशी पाणथळ दिसतच नव्हती, त्यामुळे पाणसापसुद्धा दुर्मीळ होत गेले. आता मात्र सहज माळरान परिसरात जिथे डबकी साठली आहेत तिथे बेडूक, पाणसाप दिसायला सुरुवात झाली आहे.



सर्वांसाठी माळरानांतील उथळ पाणथळांमुळे परदेशी पक्षीही आकर्षित होतात आणि मग जुन्या पाणवठ्यावर जाण्यापेक्षा नवीन अतिउथळ भागातील पाणथळी भेट देतात. अशा पाणथळांच्या ठिकाणी पाणपक्ष्यांचे खाद्य शेवाळ, लहान कीटक जास्त तयार होते. खरे तर यात उजनी जलाशय, माणमधील राजेवाडी तलाव असून यावर्षी मात्र अशा अनेक मोजक्या तलावांवर पक्षी जाताना दिसत नाहीत. याला प्रमुख दोन कारणे आहेत, यात उजनी, राजेवाडीसारखे तलाव आजही १०० टक्के भरलेले आहेत. त्यामुळे पक्ष्यांना खायला शेवाळ किंवा गाळातील पाणकीटक खाण्यास मिळत नाहीत, म्हणून त्यांनी आपली मोहीम माळरानातील विविध छोट्या पाणथळ जागांकडे आखल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. खरे तर ही बाब अतिशय आनंददायक असून, यामुळे खाण्यासाठी पक्ष्यांमध्ये अजिबात स्पर्धा निर्माण होत नाही. मोठ्या प्रमाणात खायला मिळत असल्यामुळे प्रजननसुद्धा मोठ्या प्रमाणावर होऊन, संख्यात्मक वाढ होण्यासाठी उपयुक्त अशी आशादायक परिस्थिती निर्माण झाली आहे.



यामुळे यंदा निवडक पाणवठ्यांवर पक्ष्यांची गर्दी होणार नाही, त्यामुळे पक्षीनिरीक्षकांना नवनवीन ठिकाणे शोधावी लागतील आणि परिणामी ठरावीक ठिकाणी पक्षी आणि मानव संघर्षसुद्धा कमी होण्याची संधी निसर्गाने उपलब्ध करून दिलेली आहे.

आज तरी किमान सगळीकडे गवताने रान माखलेले असून, यात असंख्य कीटकांचे मिलन सुरू आहे. त्यामुळे ज्या जगात कीटकांची दुनिया भारी तिथे जैवविविधता जास्त वेगाने वाढते. आता फक्त गरज आहे लोकशिक्षणाच्या माध्यमातून पर्यावरण साक्षरता वाढविण्याची. नाही तर, आता नाहीतर पुन्हा कधीच नाही. कारण यापुढील काळात पर्जन्यमान समान पद्धतीने होईल असे वाटत नाही. त्यामुळे पडलेला पाऊस जास्तीत जास्त साठवून ठेवणे नितांत गरजेचे आहे. यासाठी सर्वात मोठा पर्याय म्हणजे हिरवाई.



आता आपल्याला फेबुवारी-मार्चमध्ये आग नियंत्रण रेषा आखणे बंधनकारक करणे गरजेचे आहे. यामुळे आपल्या भागातील जैवविविधता सुधारण्यास मदत होईल. साधारणपणे गेली १० ते १२ वर्षे दुष्काळाची झळा माणसाबरोबर सर्वच जीव सहन करत आहेत. अगदी जगातील ८०० कोटी लोकांची स्वप्ने विविध आहेत. मात्र पृथ्वी एकच आहे. म्हणून पाणी हा सर्वांच्या स्वप्नातील केंद्रबिदू मानला तरच पाणीसंवर्धन होईल आणि पाणीसंवर्धन करायचे असल्यास आपण फक्त पृथ्वीला हिरवाईचा शालू घालणे नितांत गरजेचे आहे.

Web Title: this year will be helpful in increasing wild life because of good rainfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.