वाह वाह शाहजी !
By Admin | Updated: November 1, 2015 23:38 IST2015-11-01T23:38:00+5:302015-11-01T23:38:00+5:30
अमित शाह हे मोदींच्या कृपेने भाजपाच्या अध्यक्षपदी विराजमान झालेले गृहस्थ आहेत. राजकारणात व त्यातल्या सर्व तऱ्हेच्या कारवायात ते तरबेज आणि कुशल असल्याचे त्यांचा गुजरातमधील इतिहास सांगतो.

वाह वाह शाहजी !
अमित शाह हे मोदींच्या कृपेने भाजपाच्या अध्यक्षपदी विराजमान झालेले गृहस्थ आहेत. राजकारणात व त्यातल्या सर्व तऱ्हेच्या कारवायात ते तरबेज आणि कुशल असल्याचे त्यांचा गुजरातमधील इतिहास सांगतो. मोदींच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात ते त्या राज्याच्या गृहखात्याच्या राज्यमंत्रिपदावर होते. २००२ मध्ये गुजरातेत ज्या मुस्लीमविरोधी दंगली झाल्या त्यात ते गळ्याएवढे अडकल्याचे त्यांच्यावर न्यायालयात दाखल झालेल्या खटल्यांमधून निष्पन्न झाले. दंगली होतील तेव्हा तुम्ही तिकडे दुर्लक्ष करा आणि मुस्लिमांच्या तक्रारींची दखल घेऊ नका असे आदेशच त्या काळात त्यांनी तेथील पोलिसांना दिल्याचेही न्यायालयात उघड झाले. खून, खंडणीखोरी व अपहरण यांसारखे अनेक गुन्हे त्यांच्यावर तेव्हा दाखल झाले आणि त्यातून उद््भवलेले खटले तेथे अजून चालू आहेत. मात्र एवढे सारे करूनही (वा तसे आरोप झाल्यानंतरही) अमित शाह नरेंद्र मोदींच्या जवळ जमून राहिले याचे कारण त्यांची निवडणूक लढविण्याच्या तंत्रातली क्षमता हे होते. तीन वेळा गुजरात जिंकल्यानंतर २०१४ मध्ये देशात झालेल्या लोकसभेच्या निवडणुकाही भाजपाने त्यांच्या तंत्राने जिंकल्या. त्यातून त्यांना देशाचे निवडणूक तंत्रज्ञ म्हटले जाऊ लागले. पुढल्या काळात गोवा, महाराष्ट्र, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील निवडणुकातील विजयांनी त्यांच्या त्या कीर्तीला चार चांगली पिसेही लावली. नंतर दिल्लीत झालेल्या दोन निवडणुकांत त्यांचा पक्ष ओळीने पराभूत झाल्यामुळे त्यांची ती प्रतिमा धूमील होऊन काळवंडली. ती पुन्हा एकवार दुरुस्त व तेजाळ करण्याची संधी त्यांना बिहारच्या निवडणुकीने मिळवून दिली आहे आणि ती जिंकण्यासाठी त्यांनी सर्व तऱ्हेचे चांगले व वाईट आणि खरे व खोटे मार्ग अवलंबिले आहेत. पक्षाचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार दडवून ठेवणे, मोदींचेच नाव साऱ्या निवडणुकीत चालविणे, भाजपाच्या विरोधात मत देणारे सारे पाकिस्तानचे मित्र ठरतील असे सुचविणे, गिरिराज सिंह या आपल्या पक्षाच्या खासदाराकडून बिहारमध्ये गोमांस भक्षक व गोवंश रक्षक असे दोन पक्ष असल्याचा विषारी प्रचार करणे ही सारी या अमित शाह यांचीच क्लृप्ती. विचारवंत वा गंभीर स्वरूपाचे राजकीय नेते असा लौकिक त्यांना पूर्वी नव्हता आणि आजवरही त्यांना तो मिळविता आला नाही. मोदींची मेहरबानी ही एक आणि निवडणूक तंत्रात कितीही खोलवर उतरण्याची क्षमता ही त्यांच्या जमेची दुसरी बाजू आहे. बिहारच्या निवडणुकीने आता पुरता रंग घेतला आहे आणि तिच्या निकालाविषयी सारेच साशंक आहेत. या काळात अमित शाह यांना सुचलेली एक प्रचारी युक्ती त्यांच्या आजवरच्या इतिहासाला साजेशी व निवडणूक तंत्रज्ञ या त्यांच्या कीर्तीत भर घालणारी आहे. ‘बिहारच्या निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला तर त्याचा सर्वाधिक आनंद पाकिस्तानला होईल आणि तो देश आपला आनंद फटाके उडवून साजरा करील’ हे त्यांचे बिहारमधील एका प्रचारसभेतले वक्तव्य त्यांच्या खाली उतरण्याच्या क्षमतेवर प्रकाश टाकणारे आहे. ते उच्चारताना त्यांनी नितीशकुमार आणि लालूप्रसाद यादव हे भारतातील कोणत्याही एका पक्षाचे उमेदवार नसून पाकिस्तानातील राजकीय पक्षांनी येथे आणलेले उमेदवार आहेत असे सांगून टाकले आहे. नितीशकुमारांचा विजय पाकिस्तानचा, तर अमित शाहचा विजय भारताचा असाही त्यांच्या वक्तव्याचा एक अर्थ आहे. ‘आम्हाला विरोध करतील त्यांनी सरळ पाकिस्तानात चालते व्हावे’ अशी वक्तव्ये त्यांच्या पक्षातील गिरिराज सिंह, निरांजना, प्राची किंवा महेश शर्मा या मंत्र्यांनी याआधी केलीही आहेत. या देशात ‘रामजादे’ आणि ‘हरामजादे’ असे दोन प्रकारचे लोक राहतात असेही त्यांनी म्हटले आहे. आपल्या पक्षस्वार्थासाठी देशाच्या लोकसंख्येचे राजकीय व धार्मिक विभाजन करण्याचा हा प्रयत्न आहे. आजवर पक्षातल्या चिल्लरांनी तो केला. आता अमित शाहसारखी ठोक माणसे तो करताना दिसत आहेत. देशद्रोही ही जगातली सर्वात वाईट शिवी आहे आणि ती आपल्या राजकीय विरोधकांना देणे याएवढा गंभीर अपराध दुसरा नाही. अमित शाह व त्यांचे चेले हा अपराध करीत असतील तर देशातले सरकार त्यांना आवर घालणार नाही हे उघड आहे. एक तर ते सरकार त्यांचेच आहे आणि त्या सरकारजवळ तसे करण्याएवढी राजकीय क्षमता नसल्याचे गेल्या वर्षभरात सिद्धही झाले आहे. देशाच्या एकात्मतेसाठी व राजकारणाच्या शुद्धीसाठी असा आवर घालायला आता जनतेनेच समोर आले पाहिजे. नितीशकुमार हे वाजपेयी मंत्रिमंडळात काम केलेले, तर लालूप्रसाद दीर्घकाळ बिहारचे मुख्यमंत्री व केंद्रात रेल्वेमंत्री म्हणून काम केलेले नेते आहेत. त्यांचा विजय पाकिस्तानात विजयोत्सव म्हणून फटाक्यांनी साजरा होईल असे म्हणणाऱ्या पुढाऱ्यांची राजकीयच नव्हे तर बौद्धिक क्षमताही तपासून पाहिली पाहिजे. टीका करणे हा लोकशाहीने राजकीय पक्षांना दिलेला अधिकार आहे. मात्र ही टीका देश व समाज यांच्यात दुही उत्पन्न करणारी नसावी आणि कोणत्याही व्यक्तीवर देशद्रोहासारखा गंभीर आरोप करणारी नसावी हे तीत अपेक्षित आहे. ती करणारी माणसे लोकशाही व्यवस्थेत काम करण्याच्या योग्यतेची असतात काय याचाच विचार आता गंभीरपणे झाला पाहिजे.