इंद्रधनुष्य पेलताना...
By Admin | Updated: July 10, 2016 03:48 IST2016-07-10T03:48:52+5:302016-07-10T03:48:52+5:30
‘भगवान आबाजी पालव’ हा डायलॉग 'एक अलबेला' शूटच्या वेळी उच्चारला आणि मला मी घेतलेल्या मोठ्या जबाबदारीची जाणीव झाली.

इंद्रधनुष्य पेलताना...
- मंगेश देसाई
‘भगवान आबाजी पालव’ हा डायलॉग 'एक अलबेला' शूटच्या वेळी उच्चारला आणि मला मी घेतलेल्या मोठ्या जबाबदारीची जाणीव झाली.
मी‘भगवान आबाजी पालव’ हा डायलॉग शूटच्या वेळी उच्चारला आणि मला मी घेतलेल्या जबाबदारीची जाणीव झाली. मी फार मोठे ‘इंद्रधनुष्य’ हातात घेतले आहे, याची जाणीव झाली आणि ते मला पेलवले नाही तर काय काय होऊ शकते, याचीही जाणीव झाली. मला कधीच वाटले नव्हते, मी ‘भगवानदादा’ व्यक्तीचित्रण करेन. कारण त्यांच्यात आणि माझ्यात मला कधीच साम्य नाही दिसले, पण शेखर सरतांडेल सर यांना माझ्यात कुठेतरी ‘भगवानदादा’ लपलेले दिसले आणि विद्याधर भट्टे यांनी ते शोधून बाहेर काढले, पण ज्या माणसाबद्दल सोशल मीडियावर फारशी माहिती उपलब्ध नाही, ज्याच्याबद्दल फारसे लिखाण नाही, ज्यांच्या भूतकाळातल्या फिल्मस उपलब्ध नाहीत, त्या ‘नटाचे’ व्यक्तिमत्त्व चित्रण मला उभे करायचे होते आणि तेच फार आव्हानात्मक होते. कारण ज्यांनी भगवानदादांना तरुण वयात बघितले होते, ते आता जिवंत नाहीत आणि जे आहेत, त्यांनी दादांना म्हातारपणात बघितले आहे. माझी जबाबदारी हीच होती की, तरुण भगवानदादा आणि वृद्ध भगवानदादा यांच्यात समानता दिसली पाहिजे.
अभ्यासासाठी ‘अलबेला’ हा एकच सिनेमा होता, त्या शिवाय काहीच नाही. मी २२ ते २५ वेळा तो बघितला. तो बघत असताना माझ्या आतापर्यंतच्या अनुभवाची मला साथ मिळाली. एक गोष्ट लक्षात आली होती की, कुठलाही कलाकार जेव्हा एखादी भूमिका करतो, तेव्हा तो १00 टक्के त्या भूमिकेत शिरू शकत नाही, त्याच्या वैयक्तिक जीवनातले हावभाव, बोलणे, चालणे त्या भूमिकेत थोड्या-फार प्रमाणात दिसतेच. अर्थात, ते कमीत कमी दिसू देणे हे नटाच्या अनुभवावर आणि हुशारीवर अवलंबून आहे. भगवानदादा खूप नॅचरल अभिनेते होते, पण चित्रपटात ते मेलोड्रामा करायचे. कदाचित, मेलोड्रामा ही काळाची गरज असावी. याचाच अर्थ, मी असा लावला की, दादा सिनेमामध्ये जसे मेलोड्रेमिक वागतात, तसे वैयक्तिक आयुष्यात वागत असावेत. या निष्कर्षाच्या आधारे मी ‘भगवानदादा’ व्यक्तिचित्रण उभे करायला सुरुवात केली आणि जसजसे शूटिंग पुढे सरकत गेले, तसतसे ‘दादा’ माझ्यात अवतरत गेले. मी जेव्हा पहिल्यांदा मला भगवानदादांच्या रूपात बघितले, तेव्हा मला १९९६ साली भेटलेल्या दादांच्या डोळ्यातले भाव काय सांगून गेले होते ते लक्षात आले, पण त्या डोळ्यातल्या भावना ओळखण्यासाठी मला १८ वर्षे लागली होती. ते माझ्याकडे कसे बघत होते, ते सांगेनच मी तुम्हाला, पण एक मात्र कबूल करतो, मी भगवानदादा साकारताना खऱ्या ‘दादांचा’ आत्मा माझ्या आजूबाजूला उपस्थित होता हे नक्की.
(लेखक प्रसिद्ध अभिनेते आहेत.)