भारद्वाजांना फुटलेले शहाणपण
By Admin | Updated: March 27, 2015 23:23 IST2015-03-27T23:23:28+5:302015-03-27T23:23:28+5:30
राजकारणी माणसांच्या सोबतीने प्रसिद्धीमाध्यमांच्या, विचारवंतांच्या आणि न्यायासनांच्याही निष्ठा बदललेल्या दिसणे हे मात्र एकट्या भारतीय लोकशाहीचे वैशिष्ट्य आहे.

भारद्वाजांना फुटलेले शहाणपण
सत्ता गेली, पद गेले आणि रिकामपण वाट्याला आले की काहींना एक वेगळेच शहाणपण फुटू लागते. २०१४च्या निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमधील अनेक जुन्या निष्ठावंत पुढाऱ्यांना अशी पालवी फुटल्याचे व आपल्याच पक्षाच्या नेतृत्वात काही उणिवा असल्याचे त्यांना समजू लागल्याचे आपण पाहिलेही आहे. अशा राजकारणी माणसांच्या सोबतीने प्रसिद्धीमाध्यमांच्या, विचारवंतांच्या आणि न्यायासनांच्याही निष्ठा बदललेल्या दिसणे हे मात्र एकट्या भारतीय लोकशाहीचे वैशिष्ट्य आहे. परवापर्यंत काँग्रेस आणि सोनिया गांधी यांच्या आरत्या करणारी अनेक निष्ठावान माणसे गेल्या वर्षभरात त्यांचे उणेपण सांगताना आणि आपण पूर्वीही हे सारे जाणून होतो असे म्हणताना पाहिली की आपल्या लोकशाहीचे हे वैशिष्ट्य आणखीच ठळक झालेले दिसते. डॉ. मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात कायदा मंत्र्याच्या पदावर राहिलेले एच.आर. भारद्वाज नावाचे मंत्री हा याच प्रकारातला ताजा नमुना आहे. ‘सोनिया गांधींना खुशमस्कऱ्यांनी घेरले आहे’ हा त्यांना परवा झालेला साक्षात्कार आहे. डॉ. सिंग यांच्या सरकारने अनेक चुकीचे निर्णय (भारद्वाज हे त्याच सरकारात असताना) घेतले आणि त्या निर्णयांची जबाबदारी सोनिया गांधींवरही होती, असे सांगून ‘आता ती जबाबदारी घ्यायला त्या नकार देत आहेत’ असे या भारद्वाजांचे म्हणणे आहे. पुढे जाऊन ‘सोनिया गांधी आपले अधिकारक्षेत्र कोणासोबतही वाटून घ्यायला तयार नसतात व सारे अधिकार त्या स्वत:च वापरत असतात’ असे त्यांचे म्हणणे आहे. निवडणुकीतील पराभवानंतर परवापर्यंत गप्प राहिलेल्या भारद्वाजांना आता आलेली ही बुद्धी आहे. हे गृहस्थ फार वर्षांपासून काँग्रेसचेच नव्हे तर नेहरू व गांधी यांच्या नेतृत्वाचेही श्रद्धाशील प्रशंसक राहिले आहेत. त्या बळावर त्यांनी दीर्घकाळ सत्ता व मंत्रिपदे अनुभवली आहेत. त्या काळात त्यांना गांधी कुटुंबाचे काँग्रेसवरील वर्चस्व कधी जाचक वाटले नाही आणि त्याविषयीची वाच्यताही त्यांनी कधी केली नाही. आता सत्तापद गेल्यानंतर त्यांना आपली ती दैवते मुळातच सदोष होती आणि आपण त्यांचे तसे असणे परवापर्यंत मुकाटपणे सहन केले हे जाणवले आहे. भारद्वाजांसारखी माणसे असे बोलताना पाहिली की तो साऱ्यांची करमणूक करणारा प्रकार होतो. त्यांच्या जुन्या श्रद्धास्थानांना त्यामुळे धक्का बसत नाही आणि परवापर्यंत त्यांनी ज्यांना विरोध केला त्यांना त्यातून मनोरंजनाखेरीज दुसरा कोणताही लाभ होत नाही. भारद्वाज यांनी सोनिया गांधींसोबतच माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनाही आपल्या टीकेचे लक्ष्य बनविले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध लादणारे ६६ अ हे कलम जुन्या सरकारच्या काळात लावले गेले. सर्वोच्च न्यायालयाने हे कलमच आता घटनाबाह्य ठरविले आहे. पी. चिदंबरम हे सर्वोच्च न्यायालयात एकेकाळी वकिली केलेले ज्येष्ठ विधिज्ञ आहेत. त्यांनी न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत करताना कायद्यातील संबंधित तरतुदीचा मसुदा चुकीच्या पद्धतीने तयार केला गेला, असे परवा बोलून दाखविले त्यावर भारद्वाज यांचे सांगणे, चिदंबरम हे ढोंगी असून मंत्री असताना त्यांनी या कलमाला पाठिंबा दिला होता, असे आहे. चिदंबरम यांच्यासोबत मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात स्वत: बसले असताना जी गोष्ट भारद्वाज या कायदा मंत्र्याला जाणवली नाही ती आज त्यांना खुपू लागली असल्याचे सांगणारे हे वास्तव आहे. भारद्वाज यांच्या वक्तव्यावर काँग्रेस पक्षाने अद्याप आपली प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. मात्र ती काय असेल याचा अंदाज कोणालाही बांधता येण्याजोगा आहे. असे वक्तव्य करण्याआधी या सद््गृहस्थाचे भाजपाच्या पुढाऱ्यांशी काही संधान जुळले आहे काय हे कळले नसले तरी तसाही अंदाज एखाद्याला बांधता येईल. माणसे सत्तेसाठी केवढी लाचार होतात आणि सत्ता जाताच कशी सडकछाप होतात याचा याहून मोठा नमुना दुसरा आढळणार नाही. सामान्यपणे इंग्लंड व अमेरिकेत दर पाच व आठ वर्षांनी सत्तांतर होत असते. सत्तेवरचा पक्ष जाऊन विरोधातला पक्ष सत्तेवर आलेला तेथे दिसत असतो. मात्र त्या देशांचे पुढारी अशा सत्तांतरानंतर निष्ठांतर केलेले कधी दिसत नाहीत. ज्यांनी तसे केले त्यांना त्या देशांच्या राजकारणात फारसे स्थानही कधी उरले नाही. भारद्वाज यांची अग्रलेखातून दखल घ्यावी एवढे ते मोठे नाहीत. मात्र अशी माणसे राजकारणात ज्या अनिष्ट परंपरा निर्माण वा मजबूत करतात त्यांची दखल घेणे भाग असते. जुन्या सरकारात राहिलेल्या ज्या लोकांना नव्या सरकारनेही पदे दिली त्यांचीही नावे अशावेळी आठवणे आवश्यक होते. मनमोहन सिंग यांचे सरकार सत्ता गमावणार याचा अंदाज येताच प्रशासनातल्या व न्यायासनातल्या अनेकांनी त्यावर टीका सुरू केल्याचे आपण पाहिले आहे. अशी टीका करणाऱ्यांत लष्करातील अनेक बड्या अधिकाऱ्यांचाही समावेश राहिला आहे. ही माणसे २०१४च्या निवडणुकीनंतर राज्यपालपदावर किंवा मंत्रिपदावर गेल्याचे आपण आज पाहत आहोत. त्यातल्या अनेकांच्या वाट्याला खासदारकी आणि आमदारकी आली आहे. दु:ख याचे की असे निष्ठांतर करणाऱ्यांत सव्वाशे वर्षांची दीर्घ व उज्ज्वल परंपरा असलेल्या काँग्रेस पक्षाच्याच पुढाऱ्यांची संख्या मोठी आहे. ज्यांच्या वाट्याला सत्ता कधी आली नाही आणि येण्याची शक्यता नाही त्या पक्षांशी एकनिष्ठ राहणाऱ्यांचेच अशावेळी कौतुक वाटू लागते.