शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

आपले मत खरेच ‘आपले’ राहील का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2024 10:29 IST

अपप्रचाराचा विषाणू इंटरनेटवरील माहिती प्रवाहात घुसवून आशा आणि भयप्रेरणांना गोंजारून एकेका व्यक्तीला लक्ष्य करणे, आता सहज शक्य आहे. 

विश्राम ढोले, माध्यम, तंत्रज्ञान आणि संस्कृती या विषयांचे अभ्यासक -

‘शोले’तल्या धरमपाजीचा संतप्त डायलॉग तुम्हाला आठवत असेल- ‘एक-एक को चुन चुन के मारूंगा.’ चित्रपटातील डायलॉग म्हणून तो ठीक आहे; पण प्रत्यक्षात एकेका व्यक्तीला तिच्या गुणधर्मानुसार लक्ष्य करून आपले उद्दिष्ट साध्य करणे इतके सोपे नसते. युद्ध, मार्केटिंग आणि प्रचार या तीनही अतिशय लक्ष्यकेंद्री म्हणजे टार्गेट ओरिएंटेड व्यवस्था; पण त्यांनाही एकेका व्यक्तीला लक्ष्य करणे सोपे नसते आणि परवडणारेही नसते. अशा कामांमध्ये काहीतरी सामायिक, सरासरी गुणधर्म असणाऱ्या व्यक्तींच्या समूहाला टार्गेट केले जाते; पण सामूहिक सरासरीच्या या पद्धतीमुळे विशेषतः मार्केटिंग आणि प्रचाराच्या प्रभावावर मर्यादा पडतात.

पण ‘विदा’, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि समाजमाध्यमांचा वापर करून प्रचारमोहिमांमधील या मर्यादेवरही कशी मात करता येते, याचे उदाहरण २०१६ च्या ब्रेक्झिट आणि अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पाहायला मिळाले. ‘केंब्रिज अनालिटिका’ या कंपनीने फेसबुकवरून लाखो लोकांची वैयक्तिक माहिती गुपचूपपणे आपल्याकडे वळती केली. ही ‘विदा’, मानसशास्त्रीय चाचण्या आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा वापर करून त्या लोकांची मानसिक-राजकीय व्यक्तिरेखा अगदी वैयक्तिक पातळीवर जाणून घेतली. आणि या व्यक्तिरेखेच्या अनुरूप त्यांच्यापर्यंत राजकीय संदेश पाठविण्याचा सपाटा लावला. (लेखांक चार : लोकमत, १८ मे). त्याचे परिणाम दोन्ही ठिकाणी दिसले.

राजकीय प्रचारमोहिमांच्या इतिहासात हे अभूतपूर्व तर होतेच; पण अनैतिकही होते. कारण  ज्यांना लक्ष्य करण्यात आले त्यांना या सगळ्याचा मागमूस लागणार नाही अशी एक गुंतागुंतीची व्यवस्था त्यात करण्यात आली होती. मानसशास्त्रीय चाचण्यांचे आमिष दाखवून चोरलेल्या ‘विदा’च्या आधारे लाखो लोकांच्या राजकीय मतांच्या कुंडल्या मांडून त्या ब्रेक्झिट समर्थक आणि ट्रम्प यांना विकण्यात आल्या होत्या. ‘केंब्रिज अनालिटिका’मध्ये काम करणाऱ्या एका जागरूक हाकाऱ्याने (व्हिसलब्लोअर) या भानगडी माध्यमांकडे उघड केल्या. त्यातून एकच गदारोळ झाला. पुढे अमेरिका आणि ब्रिटनमध्ये त्यावरून ‘केंब्रिज अनालिटिका’, ‘फेसबुक’ आणि या प्रकरणात गुंतलेल्या इतर काही कंपन्यांची चौकशी, खटले झाले. मुख्य दोषी कंपनी ‘केंब्रिज अनालिटिका’ बंद करावी लागली. बदनामी झाल्यावर ‘फेसबुक’ला   ‘विदा’विषयक धोरणांमध्ये बदल करावे लागले. कोर्टकचेऱ्या, दंड ताशेरे झाले.  दी ग्रेट हॅक (२०१९) या माहितीपटात या सगळ्या प्रकरणाचा उत्तम तपशील देण्यात आला आहे.

विदाचोरी हा तर या प्रकरणातील सर्वांत मोठा गुन्हा. त्याबद्दल  कायदे अस्तित्वात आहेत; पण निवडणुका आणि लोकशाहीच्या दृष्टीने ‘केंब्रिज अनालिटिका’ प्रकरणाचे आव्हान फक्त विदाचोरीपुरते मर्यादित नाही.   ‘केंब्रिज अनालिटिका’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनेक्झांडर निक्स आणि इतर दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर २०१८ मध्ये एक स्टिंग ऑपरेशन करण्यात आले होते. त्यात त्यांनी निवडणुकांवर प्रभाव टाकू शकतील अशा अनेक खोट्या आणि अनैतिक गोष्टी कशा करता येतील याची यादीच दिली होती. “भय आणि आशा या खोलवरच्या मानवी प्रेरणा आहेत. एखाद्या माहितीवर विश्वास ठेवायचा की नाही किंवा एखादी कृती करायची की नाही, हे याच दोन  प्रेरणांमधून ठरते. या मानवी प्रेरणांच्या  विहिरीचा तळ गाठणे, मानवी भय, चिंता समजून घेणे हे कंपनी म्हणून आमचे उद्दिष्ट आहे. कारण शेवटी निवडणुका सत्यावर नाही, तर भावनेवर जिंकल्या जातात,” असेही त्यातील एक अधिकारी या स्टिंग ऑपरेशनमध्ये म्हणाला होता. 

- हे काही नवे नाही. राजकीय प्रपोगंडामध्ये हे नेहमीच केले जाते; पण प्रपोगंडा सामूहिक पातळीवर केला जातो. तो उघड दिसू शकतो; पण ‘केंब्रिज अनालिटिका’च्या अधिकाऱ्यांना भान होते. “रक्तप्रवाहात विषाणू घुसवावा तसा खोटी आणि बदनामीकारक माहितीचा विषाणू इंटरनेटवरील माहितीप्रवाहातही घुसविता येईल. एकदा तो घुसला की मग तो त्याच्या गतीने वाढत जातो. अधूनमधून त्याला फक्त धक्का देत जायचे; पण हे प्रपोगंडा वाटणार नाही, याची काळजी घ्यावी लागते. कारण हा प्रपोगंडा आहे, हे कळले की, त्याची परिणामकारकता संपते. म्हणूनच हे सारे खूप शांतपणे, सुप्तपणे करावे लागते.” 

- ‘केंब्रिज अनालिटिका’च्या अधिकाऱ्याने केलेल्या या विधानातून या साऱ्या प्रकारातील गंभीर धोका स्पष्ट होतो. अपप्रचाराचा विषाणू इंटरनेटवरील माहिती प्रवाहात घुसवून, आशा आणि भयप्रेरणांना गोंजारून एकेका व्यक्तीला एकाच वेळी एकेकट्याने लक्ष्य करणे हा धोका खोलवरचा आणि गंभीर आहे. एरवी हे साध्य करणे अवघड होते; पण डिजिटल विश्वात अफाट आणि अस्ताव्यस्त पडलेली आपली विदा, ती मिळविण्याचे वैध-अवैध तंत्र, अधिकाधिक अचूक होत चाललेल्या मानसशास्त्रीय चाचण्या आणि या सर्वांवर प्रक्रिया करू शकणारी कृत्रिम बुद्धिमत्ता यामुळे हे काम आता तितके अवघड राहिलेले नाही. एरवी खोट्याच्या विषाणूविरुद्ध लढण्याचे बळही समूहशक्तीतून मिळू शकते; पण इथे लक्ष्य  एकेकट्या व्यक्ती आहेत. म्हणून त्याविरुद्ध लढणे अवघड बनते. एका अर्थाने  आपले मत बनविण्याची व्यक्तीच्या क्षमतेला दिलेले हे आव्हान आहे. अशा परिस्थितीत आपले मत खरेच आपले राहील का? हा महत्त्वाचा प्रश्न त्यातून निर्माण होतो. ‘केंब्रिज अनालिटिका’ कंपनी  बंद पडली तरी हा प्रश्न मात्र इतक्या सहजी संपण्यासारखा नाही.vishramdhole@gmail.com

 

टॅग्स :Votingमतदानdemocracyलोकशाही