अमेरिकेत रणधुमाळी : बायडन बाजी मारणार की पुन्हा ट्रम्प येणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2020 03:40 AM2020-10-28T03:40:40+5:302020-10-28T07:01:19+5:30

US President Election : यंदाच्या निवडणुकीत वंशद्वेष, रोजगार आणि कोविड हे प्रश्न चर्चेत आहेत. अमेरिका विभागलेली आहे गोरे व गोरेतर अशा गटांमध्ये. गोऱ्यांमधले कमी शिकलेले, कर्मठ लोक ट्रम्प यांच्याबरोबर आहेत. गोरेतर आणि गोऱ्यांतली लिबरल मंडळी बायडन यांच्याबरोबर आहेत.

Will Biden win or will Donald Trump come again? | अमेरिकेत रणधुमाळी : बायडन बाजी मारणार की पुन्हा ट्रम्प येणार?

अमेरिकेत रणधुमाळी : बायडन बाजी मारणार की पुन्हा ट्रम्प येणार?

Next

- निळू दामले
(ज्येष्ठ पत्रकार) 

अमेरिकेत प्रत्यक्ष मतदान अवघ्या आठवडाभरावर आल्यानं प्रचाराची रणधुमाळी जोरात आहे. शेवटल्या आठवड्यात डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडन हे दोन्ही उमेदवार आठ दहा स्विंग राज्यांवर लक्ष केंद्रित करत आहेत. अमेरिकन मतदाराचा कल कुठं आहे हे सामान्यत: परंपरेनं ठरलेलं असतं. मोठी शहरं, शिकले-सवरलेले लोक, बहुवांशिक माणसं  जिथं असतात तिथं मतं डेमॉक्रॅट्सना जातात.

जिथं शेतीवर आधारलेली जनता जास्त आहे, जिथं गोरे जास्त आहेत अशा विरळ लोकसंख्येच्या राज्यांत रिपब्लिकन पक्षाला मतं मिळतात. अशा रीतीनं राज्यांची विभागणी आधीच झाल्यात जमा असते; पण काही राज्यांमध्ये रिपब्लिकन आणि डेमॉक्रॅट्स यांच्यातला मतांचा फरक कमी असतो. म्हणजे ०.२ टक्के ते चारेक टक्के  इतक्या छोट्या  मताधिक्यानं तिथं उमेदवार निवडून येतो. ही राज्यं जो जिंकतो तो साधारणपणे प्रेसिडेंट होतो, असा अनुभव आहे. हीच ती ‘स्विंग स्टेट्स’, कारण तिथं होणाऱ्या मतदानानुसार निकाल फिरतो.  या साताठ राज्यांत दोन्ही उमेदवार आता आपली ताकद खर्च करत आहेत.
अमेरिकेची एक गंमत आहे. तिथं नागरिक आपण डेमॉक्रॅटिक किंवा रिपब्लिकन पक्षाचे मतदार आहोत असं रजिस्टर करतात. तसंच आपण स्वतंत्र आहोत, कोणत्याही पक्षाला बांधलेले नाहीत, असंही नागरिक रजिस्टर करून सांगतात. त्यामुळं मतदारसंघात पक्की किती मतं मिळणार हे उमेदवाराला माहीत असतं. अशा स्थितीत स्वतंत्र असलेले मतदार आपल्या बाजूला खेचणं आणि प्रतिस्पर्धी पक्षातले मतदार फोडणं यावर शेवटल्या दिवसात उमेदवार भर देत असतात. 


यंदाच्या निवडणुकीत वंशद्वेष, रोजगार आणि कोविड हे प्रश्न चर्चेत आहेत. अमेरिका विभागलेली आहे गोरे व गोरेतर अशा गटांमध्ये. गोऱ्यांमधले कमी शिकलेले, कर्मठ लोक ट्रम्प यांच्याबरोबर आहेत. गोरेतर आणि गोऱ्यांतली लिबरल मंडळी बायडन यांच्याबरोबर आहेत. गेल्या चार वर्षात घडलेल्या काळ्यांवरील अन्यायाच्या घटनांमुळे वरील विभागणी आता पक्की झाली आहे. कोणत्याही बाजूची मतं दुसऱ्या बाजूला सरकण्याची शक्यता नाही.
कोविडबाबत ट्रम्प यांचं वागणं अगदीच आचरट आहे. डॉ. फाऊची इत्यादी वैज्ञानिक इडियट आहेत, त्यांच्याकडं लक्ष देऊ नका, कोविड हे डेमॉक्रॅटिक पक्षानं निर्माण केलेलं भूत आहे, असं ट्रम्प म्हणत आले आहेत. दोन लाखापेक्षा जास्त माणसं कोविडनं मेलेली असताना ट्रम्प यांच्याबद्दल लोकांना अविश्वास आणि राग निर्माण झाला आहे. या बेजबाबदार भूमिकेमुळे मतदार त्यांच्यावर नाराज आहेत. मोजके मूर्ख आणि आचरट पाठीराखे सोडता कोणीही याबाबतीत त्यांच्या मागं नाही. रोजगार हा एकच मुद्दा आहे जो काही प्रमाणात ट्रम्प यांच्या मदतीला येऊ शकतो. 

ओबामा यांच्या काळात रोजगाराचा वेग काहीसा मंदावला होता. चीन, कॅनडा, मेक्सिको इत्यादी देशांबरोबर आधीच्या कारकिर्दीत झालेल्या आर्थिक-व्यापारी करारामुळे अमेरिकेतला रोजगार कमी झाला होता. ट्रम्प यांनी चीन व इतर देशांतून येणाऱ्या मालावर जकाती लादून अमेरिकेतले बंद पडलेला उद्योग पुन्हा सुरू करण्याचं आश्वासन दिलं. पण त्यांच्या चार वर्षाच्या कारकिर्दीत ते आश्वासन पूर्ण झालं नाही.

२०१६च्या निवडणुकीच्या वेळी पेनसिल्वानिया, विस्कॉन्सिन, ओहायो, इंडियाना, मिशिगन इत्यादी राज्यात गोरे कामगार बेकार झाले होते. अमेरिका फर्स्ट या धोरणामुळं ते रोजगार परत येतील, अशी आशा  गोऱ्या कामगारांना आणि काही प्रमाणात गोरेतर कामगारांनाही होती. परंतु ट्रम्प गडगडले, बरसले नाहीत, तरीही रोजगाराच्या बाबतीत अजून काही लोकांना वेडी आशा शिल्लक आहे. त्याच मुद्द्यावर अपक्ष आणि काही डेमॉक्रॅटची मतं ट्रम्प यांना मिळू शकतील. तेवढा एकच मुद्दा ट्रम्प यांच्या बाजूचा आहे.

वर्णद्वेष आणि कोविड हे दोन मुद्दे प्रभावी ठरले तर बायडन जिंकतील, रोजगार हा मुद्दा प्रभावी ठरला दर ट्रम्प  निसटत्या बहुमतानं निवडून येऊ शकतात. आजवर झालेल्या विश्वासार्ह पहाण्या, जाणकार बायडन जिंकतील असं सांगतात. त्यामुळंच हताश झालेले ट्रम्प निवडणूक झाल्यानंतर मला देश सोडून जावा लागेल असं बोलू लागले आहेत. 

२०१६ साली प्रतिस्पर्धी हिलरी क्लिंटन यांच्यापेक्षा २५ लाख मतं कमी मिळाली असूनही ट्रम्प अध्यक्ष झाले, इलेक्टोरल मतं या एका विक्षिप्त आणि कालबाह्य तरतुदीमुळं. त्याच तरतुदीमुळं ते याही वेळी निवडून येऊ शकतात, असं काही जाणकारांचं मत आहे. आज अमेरिका विभागलेली आहे. देश श्रीमंत आहे; पण बहुसंख्य माणसं गरीब आहेत. देशाचं उत्पन्न खूप आहे; पण ते मूठभर लोकांच्या खिशात गेलेलं आहे, पोतंभर जनता खात्री नसलेलं जीवन जगत आहे. यावर काही आर्थिक उपाययोजना आवश्यक आहे. 

अर्थशास्राचे अभ्यासक अनेक उपाय सुचवत आहेत. पण राजकीय नेते मात्र वर्तमानातल्या प्रश्नाला भूतकाळातली उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. बायडन किंवा ट्रम्प  यांच्या प्रचारात  अमेरिकेतली विषमता आणि बहुसंख्य समाजाची दुस्थिती यावर उपाय सुचवलेला दिसत नाही हे या निवडणुकीचं एक ठळक वैशिष्ट्य मानावं लागेल.

Web Title: Will Biden win or will Donald Trump come again?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.