इसिसविरोधी मोसुलची लढाई निर्णायक ठरेल?

By Admin | Updated: October 26, 2016 05:12 IST2016-10-26T05:12:06+5:302016-10-26T05:12:06+5:30

जगाला दहशतवादाचे आजवरचे सर्वात भीषण आणि हिंसक स्वरूप दाखवणाऱ्या इसिसच्या विरोधातली कारवाई आता एका महत्वाच्या टप्प्यात आल्यासारखे दिसते आहे.

Will this battle of Mosul be decisive? | इसिसविरोधी मोसुलची लढाई निर्णायक ठरेल?

इसिसविरोधी मोसुलची लढाई निर्णायक ठरेल?

- प्रा. दिलीप फडके
(ज्येष्ठ विश्लेषक)

जगाला दहशतवादाचे आजवरचे सर्वात भीषण आणि हिंसक स्वरूप दाखवणाऱ्या इसिसच्या विरोधातली कारवाई आता एका महत्वाच्या टप्प्यात आल्यासारखे दिसते आहे. इसिसच्या तावडीतून ऐतिहासिक शहर असलेल्या मोसुलची सुटका करण्यासाठी अमेरिकेच्या नेतृत्वाखालील महालष्करी कारवाई मोसुलच्या वेशीवर पोहोचली आहे. इसिसचे पाचएक हजार दहशतवादी अजूनही मोसुलमध्ये आहेत. तसेच जवळपास दहा लाख लोकही अजून त्या शहरात आहेत. त्यामुळे ही लढाई वाटते तितकी सोपी नाही. अर्थात मोसुलला दहशतवाद्यांच्या विळख्यातून बाहेर काढल्यास तो इसिसचा मोठा पाडाव ठरेल, असे मत अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. आघाडीचे सैन्य शहराच्या दिशेने घुसण्याचा प्रयत्न करीत असतानाच इसिसचे सशस्त्र अतिरेकीही हल्ल्याचा प्रतिकार करीत मोसुलवरचा आपला ताबा टिकवण्याचा प्रयत्न करीत आहेत.
‘सीएनएन’ने या लढाईचे व्यापक वार्तांकन केले आहे. यावेळी इराकी सैन्यात खूप एकोपा पाहायला मिळतो, असे हे वृत्त सांगते. इतर फौजांप्रमाणेच कुर्दीर् सैन्याचा पाठिंबाही मिळत असल्याने या वेळची इसिसविरोधी आघाडी अधिक प्रभावी आणि परिणामकारक ठरण्याची शक्यता आहे. पण मोसुलचा पाडाव झाला म्हणजे ही लढाई संपणारी नाही हेदेखील लक्षात घ्यावे लागणार आहे. इसिसचे अतिरेकी जवळपासच्या नागरिकांची (महिला आणि लहान मुलांसह) ढाल म्हणून वापर करायचा प्रयत्न करीत आहेत. जगातली बहुतेक महत्वाची प्रसारमाध्यमे याच विषयावर चर्चा करीत आहेत.
‘न्यूयॉर्क टाईम्स’मध्ये ‘ताहीर इन्स्टिट्यूट फॉर मिडल इस्ट पॉलिसी’चे फेलो आणि ‘इसिस:दहशतीच्या फौजेच्या अंतरंगात’ या अतिशय महत्वाच्या पुस्तकाचे लेखक हसन हसन यांचा एक लेख प्रकाशित झाला आहे. त्यात ते म्हणतात, इसिसच्या दृष्टीने मोसुलला एक वेगळे महत्व आहे. याच ठिकाणी अबू बकर बगदादीने स्वत:ला खलिफा म्हणून जाहीर केले आहे. त्यामुळे मोसुलचा पाडाव ही एक महत्वाची गोष्ट असली तरी मोसुल पडले म्हणजे इसिस पूर्णपणे संपली असे मानता येणार नाही. या पूर्वीच्या घटनांमध्येदेखील हे दिसले आहे की जरी पराभव झाल्यासारखे वाटले तरी त्या पराभवातूनसुद्धा इसिस पुन्हा उभी राहते. मोसुल पडले तरी शेजारच्या वाळवंटातून इसिस आपल्या कारवाया सुरु ठेवेल. यावेळी तिचे पुनरुज्जीवन होण्यासाठी अधिक अनुकूल वातावरण आहे. इराकमध्ये नाव घ्यावे असा सुन्नी गट किंवा नेता अस्तित्वात राहिलेला नाही. तसेच इराकमध्ये मोठ्या प्रमाणावर अंतर्गत दुफळीचे वातावरण आहे. सिरीयामधल्या घडामोडीदेखील परिस्थितीचा गुंता वाढवणाऱ्याच आहेत. त्याचा फायदा उठवत वाळवंटात पुन्हा उभे राहणे इसिसला सहजशक्य आहे आणि तशा प्रकारच्या धमक्या देणाऱ्या चित्रफिती इसिस प्रसृत करीत आहे. इराकमधल्या सुन्नीपंथीय गटाच्या बाबतीतली सध्या निर्माण झालेली पोकळी भरली जात नाही तोपर्यंत इसिसविरोधी लढाईला यश मिळणे अवघड आहे.
किरकुकमध्ये जवळपास तीनशे आत्मघातकी अतिरेकी घुसवण्यात आले आहेत आणि त्यांचा वापर करून मोसुलवर होणाऱ्या हल्ल्याचा मुकाबला करण्याचा इसिसचा इरादा असल्याचे इंटरनेटवरच्या ‘इराकी न्यूज’ या इराकमधल्या इंग्रजी भाषिक वेबवृत्तपत्राने म्हटले आहे. त्यात अशीही माहिती मिळते की मोसुलच्या वेशीवरच्या गावांमधल्या लोकांना लुबाडून त्यांना तिथून हुसकून लावण्याचा व स्वसंरक्षणासाठी त्यांचा मानवी ढाल म्हणून वापर करण्याचा इसिसचा प्रयत्न आहे.
‘अल अरबीया’त अब्दुल रहेमान अल रशीद या पत्रकाराचा लेख प्रकाशित झाला आहे. दोन वर्षापूर्वी मोसुलचा ताबा इसिसकडे गेल्यावर त्याचे जे परिणाम झाले, त्यांची चर्चा करीत रशीद यांनी इराकमधल्या सध्याच्या परिस्थितीमध्ये मोसुल अमेरिकेच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या फौजांना पुन्हा जिंकता आले तरी इराकमधील एकांगी आणि असहिष्णु राजवटीत जोपर्यंत सुधारणा होत नाही तोपर्यंत तिथे खऱ्या अर्थाने लोकांच्या भल्याचा विचार करणारी राजवट येऊ शकणार नाही, असे बजावत केवळ मोसुलवर ताबा मिळाला म्हणजे इसिसवर विजय मिळाला असे मानता येणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे. ‘गार्डियन’मध्ये सिमोन तिस्डेल यांचा एक लेख वाचायला मिळतोे. त्यात इराकमधल्या इसिसच्या समस्येला असलेल्या शिया-सुन्नी झगड्याच्या पार्श्वभूमीचा विचार त्यांनी केला आहे. मोसुलवरच्या लढाईत शेजारचा तुर्कस्तानदेखील आता सामील होतो आहे. तुर्कस्तानचा हा दावा इराकला मान्य नाही. शियाबहुल इराक आणि सुन्नीबहुल तुर्कस्तान यांच्यातल्या तणावाचा परिणाम इसिसविरोधी लढाईवरदेखील होत असल्याचे त्यांचे अनुमान आहे. मोसुलमध्ये तेलाचे मोठे साठे आहेत आणि त्यावर ताबा मिळवणे महत्वाचे ठरणार आहे. तसेच सिरीयामध्ये रशियाचे हितसंबंध गुंतलेले असल्याने मोसुलची लढाई साधी सरळ राहिलेली नाही, हे त्यांच्या विश्लेषणावरून लक्षात येते. ‘इकॉनॉमिस्ट’मध्ये ‘मोसुलची लढाई:खिलाफत नष्ट करतांना’ या शीर्षकाखालचा एक सविस्तर लेख प्रकाशित झाला आहे. दोन वर्षांपूर्वीच इसिसवर हल्ला करून तिचा खातमा करण्याचा बराक ओबामा यांनी केलेला वायदा पूर्ण होण्याचा क्षण जवळ येतो आहे हे नक्की. मोसुलचा पाडाव होणार हे आता जवळपास नक्की झाले आहे. पण ते कशाप्रकारे होते आणि त्याचे कोणते परिणाम होतात त्यावर या भागात शांतता नांदणार की नाही हे ठरणार आहे. इसिसची सगळी मांडणी कडव्या इस्लामी विचारांवर झालेली आहे. जे अतिरेकी त्यात सामील होतात त्यांच्या दृष्टीने तो एक जिहाद आहे आणि त्याला धार्मिक अधिष्ठान मिळवून देण्यात इसिसचे नेतृत्व यशस्वी झाले आहे. अबू बकर बगदादी स्वत:ला खलिफा म्हणवून घेतो ते याचसाठी. इसिसने सर्व प्रकारच्या मान्यतांना नाकारत स्वत:चे एक कट्टरपंथी तत्वज्ञान मांडले आहे आणि तेच खरे असल्याचा भ्रम निर्माण करून लोकांना आपल्याकडे खेचून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. या तत्वज्ञानाचा पडदाफाश करावा लागेल आणि त्या वैचारिक मांडणीमधला भ्रामकपणा उघड करावा लागेल. इसिसचा पूर्ण पाडाव करायचा असेल तर मोसुल पडल्यावर खूप काळजीपूर्वक वाटचाल करावी लागेल. शिया आणि सुन्नी यांच्यातले अविश्वासाचे आणि संघर्षाचे वातावरण बदलणे आवश्यक आहे. अमेरिकेने सुद्धा मागच्या वेळेप्रमाणे विजय मिळाल्याचे सांगत आपल्या फौजा इराकमधून काढून घेण्याची जल्दबाजी करता कामा नये. आता ही जबाबदारी ओबामांच्या नंतर अमेरिकेची सूत्रे स्वीकारणाऱ्या नव्या राष्ट्राध्यक्षाची आहे. ती कोण पार पाडणार याचे उत्तर अमेरिकेच्या निवडणुकीच्या निकालामधूनच मिळेल असे या लेखात म्हटले आहे.

Web Title: Will this battle of Mosul be decisive?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.