वालेरिया मार्केज. मेक्सिकोची २३ वर्षीय ब्यूटी एन्फ्लूएन्सर. मेक्सिकोमध्ये ती बरीच प्रसिद्ध आहे. ब्युटी आणि लाइफस्टाइलच्या संदर्भात ऑनलाइन व्हिडीओ ती करते. तिचे हे व्हिडीओ आवडीनं पाहिले जातात. त्यामुळे तिचा फॅन फॉलोअरही खूप आहे. सोशल मीडियावर - इन्स्टाग्राम आणि टिकटॉकवर तिचे जवळपास दोन लाख फॉलोअर्स आहेत. लाइव्ह स्ट्रिमिंग करीत असताना एका माथेफिरूनं नुकतीच तिची गोळ्या घालून हत्या केली.
आपल्या ‘ब्लॉसम द ब्युटी लाऊंज’ या ब्युटी सलूनमध्ये ती लाइव्ह स्ट्रिमिंग करीत असताना एक जण तिथे येतो आणि तिच्या कपाळावर, छातीत गोळ्या घालतो. या घटनेची एक व्हिडीओ क्लीपही एक्सवर शेअर करण्यात आली आहे. फुटेजमध्ये दिसतं आहे, वालेरिया टेबलावर बसली आहे आणि आपल्या सहकाऱ्यांशी काही बोलते आहे. या घटनेच्या केवळ काही सेकंद आधी तिचे शब्द कानावर येतात, ‘ते येत आहेत..’ पाठीमागून आवाज येतो, ‘वेले..’ त्याला वेलेरिया प्रत्युत्तर देते. थोड्याच वेळात पार्श्वभूमीवर गोळ्यांचा आवाज ऐकायला येतो. वेलेरिया छातीवर हात ठेवते आणि खाली पडते.
वालेरिया लाइव्ह स्ट्रीमवर नसताना काही वेळापूर्वीच तिनं सांगितलं होतं, मी सलूनमध्ये नसताना एक व्यक्ती तिच्यासाठी महागडं गिफ्ट घेऊन आला होता. मी त्या व्यक्तीची वाट पाहत नाहीए, असं ती सांगते, पण त्या वेळी ती चिंताक्रांत असल्याचं स्पष्टपणे दिसत होतं. आरोपी गिफ्ट देण्याच्या नावाखाली आला आणि त्यानं वालेरियावर गोळीबार केला, असं पोलिसांचं म्हणणं आहे.
वालेरियावर गोळीबार केल्यानं आणि त्यात ती ठार झाल्यानं तिच्या चाहत्यांना प्रचंड धक्का बसला आहे, पण हा खून नेमका कोणी आणि कशासाठी केला असावा? वालेरियाला ठार मारण्याचं नेमकं काय कारण असावं, याबाबतही मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे.
पोलिस आणि तपास अधिकाऱ्यांच्या मते मात्र या खुनामागे कोणतीही वैयक्तिक दुष्मनी किंवा वेलेरियाचे पूर्वी कोणाशी झालेले वाद कारणीभूत नसावेत. ही ‘फेमिसाइड’ची घटना असावी. म्हणजे केवळ एखादी व्यक्ती महिला आहे म्हणून, लिंगभेदभावावर आधारित, स्त्रियांवर असलेल्या द्वेषापोटी हा खून घडलेला असावा. पोलिसांनी त्याच दृष्टीनं आपल्या तपासाची पावलं उचलली.
मेक्सिकोत मोठ्या प्रमाणात होणाऱ्या ‘स्त्रियांच्या हत्या’ हा दिवसेंदिवस चिंतेचा विषय ठरतो आहे. स्त्रियांच्या विनाकारण हत्या होणार नाहीत यासाठी काय करता येईल, याचा मेक्सिकन सरकार गांभीर्यानं विचार करीत आहे. पण आश्चर्याची आणि खेदाची गोष्ट म्हणजे हा प्रश्न फक्त मेक्सिकोपुरता मर्यादित राहिलेला नाही. लॅटिन अमेरिका, पॅराग्वे, उरुग्वे, बाेलिव्हिया .. इत्यादी अनेक देशांतही या प्रश्नानं उग्र स्वरूप धारण केलं आहे. संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक आयोगानंही यावर चिंता व्यक्त केली आहे.
नुकत्याच झालेल्या अभ्यासानुसार निदर्शनास आलं आहे, मेक्सिकोमध्ये गेल्या दशकभरापासून महिलांच्या हत्येचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. तिथे जवळपास दहा ते अकरा महिलांची रोज हत्या होते! संयुक्त राष्ट्रसंघाच्या माहितीनुसार २००१ ते २०२४ या काळात ५० हजारपेक्षाही अधिक महिलांची हत्या करण्यात आली आहे.