लोकशाहीचे चारही स्तंभ 'पंचप्राणा'च्या मूल्यांसाठी एकसाथ काम का करीत नाहीत?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 11:24 AM2022-08-17T11:24:45+5:302022-08-17T11:25:13+5:30

अद्यापही काही टप्पे गाठावे लागतील. त्यासाठी नरेंद्र मोदी यांनी आपल्या ८२ मिनिटांच्या भाषणात पंचप्राण (पंचसूत्री) मांडली आहे. तशी ती नवीन नाही. पहिल्या चार सूत्रांसाठी प्रत्येकाने नागरिक म्हणून आपण आपले कर्तव्य चोख बजावले पाहिजे.

Why not all the four pillars of democracy work together for the values of 'Panchaprana'? | लोकशाहीचे चारही स्तंभ 'पंचप्राणा'च्या मूल्यांसाठी एकसाथ काम का करीत नाहीत?

लोकशाहीचे चारही स्तंभ 'पंचप्राणा'च्या मूल्यांसाठी एकसाथ काम का करीत नाहीत?

googlenewsNext

सर्वांना अभिमान वाटावा असा भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा झाला. ‘हर घर तिरंगा’ अभियानाने तर वातावरण उत्साहित झाले होते. पंतप्रधान लाल किल्ल्यावरून राष्ट्राला उद्देशून  भाषण करतात. त्यातून देशाच्या वाटचालीची दिशा स्पष्ट होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वातंत्र्यदिनाचे भाषणही अमृतमहोत्सवी होते. पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देश स्वतंत्र झाल्याची घोषणा संसदेत १५ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री करताना हा नियतीशी केलेला करार आहे, असे म्हटले होते. त्यावेळी मांडलेली भूमिका कमी-अधिक का असेना यशस्वीपणे राबविण्यात आपण मोठी मजल मारली आहे.

अद्यापही काही टप्पे गाठावे लागतील. त्यासाठी नरेंद्र मोदी यांनी आपल्या ८२ मिनिटांच्या भाषणात पंचप्राण (पंचसूत्री) मांडली आहे. तशी ती नवीन नाही. पहिल्या चार सूत्रांसाठी प्रत्येकाने नागरिक म्हणून आपण आपले कर्तव्य चोख बजावले पाहिजे. पाचवे सूत्रही महत्त्वाचे आहे. त्यात स्वत: पंतप्रधान, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि नागरिकांचा समावेश अपेक्षित आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. देशाच्या विकासासाठी कटिबद्ध राहणे, कोणाच्या मनात गुलामीचा अंश असता कामा नये, आपल्या वैभवशाली वारशाचा अभिमान, विविधतेतील एकता जपणे या चार सूत्रांचा त्यांनी उल्लेख केला आहे.  मात्र जात-धर्म, समाज घटक म्हणून इतरांचे शोषण करण्यासाठी गुलामी लादण्याचा अंशच जर भारतीयांच्या मनात आजही खोलवर रुजला असेल तर त्याविरुद्ध लढा दिला पाहिजे.

यासाठी जात-धर्म किंवा गरीब-श्रीमंतच्या भेदातून गुलामीचा अंश राहणार नाही, याचा पाठपुरावा सरकारच्या धोरणातूनच वारंवार व्यक्त झाला पाहिजे. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करतानादेखील तसे वातावरण आपण निर्माण करू शकलो आहोत, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. वैभवशाली वारसा खूपच मोठा आहे. कारण हा देश गौतम बुद्धांचा आणि भगवान महावीर यांच्या तत्त्वज्ञानाला जन्म देणारा आहे. अहिंसेचे शस्त्र बनवून स्वातंत्र्य मिळवणारा पृथ्वीच्या पाठीवरील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. हा वारसाच आपली शक्ती आहे. विविधतेतील एकतेचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला आहे. एकाच देशात एवढी विविधता सापडणे अशक्य आहे. ती विविधता भाषेत आहे, पेहरावात आहे, खाद्यसंस्कृतीत आहे, संगीत-गायनात आहे, राहणीमानात आहे.

तिची जपणूक करणेसुद्धा जागतिकीकरणात आव्हान आहे.  शेकडो-हजारो वर्षांची परंपरा निर्माण होणे, त्यातून मानवी मूल्यांना आकार देणे, ही सोपी गोष्ट नाही. तिची जपणूक प्राणपणाने केली पाहिजेच. पाचवे सूत्र सांगताना पंतप्रधान म्हणतात की, नागरिक म्हणून प्रत्येकाने आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले पाहिजे. त्यात पंतप्रधान आणि सर्वच मुख्यमंत्र्यांचाही समावेश असेल असे ते मानतात. मात्र सध्याची भ्रष्ट, गैरव्यवहार आणि शोषणाचे अंश असणारी व्यवस्था पाहून मनात प्रश्न निर्माण होतो.

शिक्षणाचा बाजार, पैशाचा बाजार, सेवेचा बाजार पाहता भ्रष्ट मार्गाने संपत्तीप्रधान  होणे गैर वाटू नये असा आदर्श समाजात निर्माण कसा होतो?  अन्याय, अत्याचार आणि शोषण याला पायबंद घालणारे कमकुवत कसे ठरतात?  लोकशाहीचे चारही स्तंभ या पंचप्राणाच्या मूल्यांच्या जपवणुकीसाठी एकसाथ काम का करीत नाहीत? त्यांच्यामध्ये अविश्वासाचे वातावरण का निर्माण झाले आहे, याचाही यानिमित्त विचार व्हायला हवा. भारताला अशा पंचप्राणांची (पंचसूत्री) फार गरज आहे. मात्र वास्तव वेगळे दिसते आहे. विविध राज्यांत सरकारे पडताना आणि पुन्हा उभी राहताना जो व्यवहार होतो तो पारदर्शी असतो का?

आपली न्याय व्यवस्था सर्वांना न्यायदान करण्यास पुरेशी पडते आहे का? माध्यमे आपली जबाबदारी पार पाडत आहेत का? आदी बाबींचा फेरविचार करून पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानुसार पुढील २५ वर्षांत देशाची सर्वांगीण प्रगती साधायची असेल तर कटिबद्ध व्हायला हवे. आजवरच्या सर्वच सरकारांनी किंबहुना पंतप्रधानांनी भारतीय वारसा जपून विकासाचा प्रयत्न केला, मात्र ते प्रयत्न अपुरे पडले हे मान्य करावे लागेल. त्यावर आता मार्ग काढण्यासाठी या पंचप्राणांचा स्वीकार करून तसे वर्तन करणे आणि आपले कर्तव्य पार पाडणे प्रत्येकाची जबाबदारी राहणार आहे. त्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याची  ऊर्मी यानिमित्ताने मिळो !

Web Title: Why not all the four pillars of democracy work together for the values of 'Panchaprana'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.