- प्रा. मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषदकोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे जाहीर झालेल्या टाळेबंदीमुळे मार्च महिन्यापासून राज्यातील सर्व ग्रंथालये बंद आहेत. टाळेबंदीनंतर आता सर्व व्यवहार हळूहळू सुरू होत आहेत. अनलॉक-५ची घोषणा करताना सरकारने हॉटेल्स, फूडमॉल्स, रेस्टॉरंट आणि बार हे पन्नास टक्के क्षमतेने सुरू करण्याची परवानगी दिली आहे. ती देत असताना राज्यातील ग्रंथालयांचा मात्र विचार केलेला नाही. यातून राज्यकर्त्यांची अनास्थाच दिसून येते.शरीरासाठी आवश्यक असणारी जीवनसत्त्वे अन्नातून मिळतात; पण मन आणि बुद्धीच्या भरणपोषणासाठी गरजेची असलेली सत्त्वे केवळ वाचनातूनच मिळतात. प्रगल्भ आणि जाणत्या वाचकांमुळेच समाजाची सांस्कृतिक श्रीमंती वाढत असते. सर्वच वाचकांना ग्रंथ खरेदी करून वाचणे शक्य नसते. वाचनभूक भागविण्यासाठी ग्रंथालयांवरच अवलंबून असणारा मोठा वाचकवर्ग आहे. ग्रंथालये बंद असल्यामुळे त्यांची कुचंबणा होत आहे. अभ्यासक, संशोधक आणि स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी यांची गैरसोय होत आहे. ग्रंथालये कधी सुरू होणार? अशी विचारणा सातत्याने वाचकांकडून होत आहे. आजही महाराष्ट्रात असलेल्या वाचनालयांचा जो वाचक वर्ग आहे त्यात ज्येष्ठ नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. वाचन हाच त्यांच्यासाठी विरंगुळा असतो. ज्येष्ठ नागरिक संघाचे आणि हास्य संघाचे नियमित होणारे कार्यक्रम आता होत नाहीत त्यामुळे त्यांचा भावनिक कोंडमारा होत आहे. त्यांनी वाचनालयात जाणे सद्य:परिस्थितीत हिताचे नसले तरी त्यांच्या वतीने कुटुंबातील सदस्य पुस्तकांची देव-घेव करण्यासाठी जाऊ शकतात. अनेक ग्रंथालयांची घरपोच सेवा आहे. शासनाच्या अटींचे पालन करीत आवश्यक ती खबरदारी घेत ही सेवाही कुरिअरप्रमाणे सुरू करता येऊ शकते. सार्वजनिक ग्रंथालयातील सेवक आधीच तुटपुंज्या वेतनावर काम करीत आहेत, त्यात टाळेबंदीमुळे त्यांच्या वेतनात मोठी कपात झाली आहे. वाचनालये अशीच बंद राहिली तर त्यांचे जगण्याचे प्रश्न आणखी गंभीर होणार आहेत.
अस्वस्थ मनाला ऊर्जा देणाऱ्या ग्रंथालयांची दारे अजून बंद का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2020 04:55 IST