‘ते मरून गेले तर किती बरं होईल!..’ युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी ख्रिसमस अर्थात नाताळाच्या दिवशी भगवंताकडे अशी प्रार्थना केली. खरं तर ख्रिसमसच्या दिवशी प्रामुख्यानं शांती, प्रेम, आनंद, कृतज्ञता आणि एकतेसाठी प्रार्थना केली जाते. जगात सगळ्यांनी एकमेकांवर प्रेम करावं, सगळ्यांचं भलं व्हावं, कोणीही दु:खी किंवा चिंतेत राहू नये, सर्वत्र शांती आणि सलोखा राहो, आम्हाला एकमेकांवर प्रेम करण्याची, क्षमा करण्याची आणि मदत करण्याची शक्ती लाभो.. अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. पण एखाद्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांनी थेट एखाद्या व्यक्तीच्या मरणाची अपेक्षा आणि प्रार्थना करावी, याबाबत जगभरात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
झेलेन्स्की यांनी ख्रिसमसला एक व्हिडीओ शेअर केला, ज्यात त्यांनी रशिया-युक्रेन युद्धाचा उल्लेख केला. ते म्हणाले, मी रोज विचार करतो, भगवंताची कृपा व्हावी आणि त्या व्यक्तीचा मृत्यू व्हावा! जगाला संकटात टाकणाऱ्या या व्यक्तीला भगवंतानं जिवंतच ठेवू नये. ही केवळ माझी नव्हे, तर जगातील अनेक लोकांची इच्छा आहे. लोकांची ही इच्छा एक दिवस खरोखरच प्रत्यक्षात येईल!त्यांनी म्हटलंय, युक्रेनी हृदय, विश्वास आणि एकतेवर कब्जा करण्यात रशिया अपयशी ठरलं आहे. त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी या जन्मात त्यांना हे शक्य होणार नाही. त्यांनी युक्रेनसाठी शांतीची प्रार्थना करतानाच देशासाठी संघर्ष करण्याची प्रतिज्ञा घेतली. रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू झाल्यापासून हे युक्रेनचं चौथं ख्रिसमस आहे, हे सांगायलाही ते विसरले नाहीत.
भगवंतानं कोणाला या पृथ्वीवरून उचलावं आणि त्याचं अस्तित्व संपवावं असं झेलेन्स्की यांना वाटतं? त्यांनी कुणाचंही नाव घेतलं नाही, पण त्यांच्या विधानातून त्यांचा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याकडे आहे, हे स्पष्टपणे लक्षात येतं. युद्धाबद्दल बोलताना झेलेन्स्की म्हणाले, रशियानं आम्हाला कितीही वेदना देण्याचा, त्रास देण्याचा प्रयत्न केला, आमच्याशी छळकपट करण्याचा आणि सर्वसामान्य निरपराध माणसांना ठार मारण्याचा कट रचला, तरीही एक गोष्ट ते कधीच करू शकणार नाहीत. त्यावर ते ना कब्जा करू शकत, ना ती बॉम्बस्फोटानं नष्ट करू शकतं. ती गोष्ट म्हणजे सामान्य युक्रेनी माणसाचं हृदय, त्यांचा एकमेकांवरचा विश्वास, त्यांची एकता, त्यांच्यातली हिंमत, त्यांच्यातला जोश आणि त्यांच्यातील समर्पणावर ते कधीही विजय मिळवू शकत नाही.
झेलेन्स्की यांचा पुतीन यांच्यावर एवढा का राग आहे, हेदेखील जगजाहीर आहे. पण केवळ झेलेन्स्कीच नव्हेत, तर संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालांमध्येही पुतीन यांच्या अत्याचाराचे पाढे वाचले गेले आहेत. रशियन सैनिकांनी युक्रेनच्या ज्या नागरिकांना अटक केली आहे, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणं, अतिशय क्रूर आणि अमानवी पद्धतीनं त्यांचा छळ करणं, त्यांना मारहाण करणं, त्यांना विजेचे झटके देणं.. असे अत्याचार त्यांच्यावर केले गेल्याची नोंद अहवालात आहेसंपूर्ण जगात पुतीन हे क्रूरकर्मा म्हणून ओळखले जातात. शिवाय, आपली खासगी माहिती ते कधीही सार्वजनिक होऊ देत नाहीत. त्यांची प्रेमप्रकरणं, त्यांची मुलं याबाबतही आजपर्यंत पुतीन अधिकृतपणे काहीही बोललेले नाहीत.
Web Summary : Zelenskyy's Christmas prayer for the death of those endangering the world, seemingly aimed at Putin, reflects outrage over Russian atrocities in Ukraine. He affirms Ukraine's resilience and unwavering unity despite Russian aggression and war crimes, as reported by UN.
Web Summary : ज़ेलेंस्की की क्रिसमस प्रार्थना, जो दुनिया को खतरे में डाल रहे हैं उनकी मृत्यु की कामना करती है, जाहिर तौर पर पुतिन पर लक्षित है, यूक्रेन में रूसी अत्याचारों पर आक्रोश दर्शाती है। उन्होंने संयुक्त राष्ट्र द्वारा रिपोर्ट किए गए रूसी आक्रमण और युद्ध अपराधों के बावजूद यूक्रेन के लचीलेपन और अटूट एकता की पुष्टि की।