डॉ. श्रुती पानसेमेंदू आणि शिक्षण अभ्यासक, ishruti2@gmail.com (लेखन : टीम ऊर्जा)
अंशिका विज्ञानाचा पेपर चांगला गेला म्हणून खूप खुश होती. पेपर संपल्यानंतर अंशिका मैत्रिणींसोबत परीक्षा हॉलबाहेर आली. झालेल्या पेपरबद्दल अंशिकाच्या मैत्रिणींसोबत उत्साहाने गप्पा सुरू होत्या; पण थोड्या वेळातच आनंदी असलेल्या अंशिकाचा मूड बदलला. तिला खूप टेन्शन आलं. पेपरमधले तीन प्रश्न समजून घेण्यात तिच्याकडून चूक झाली आणि तिने वेगळीच उत्तरं लिहिली होती. या चुकीमुळे तिचे पंधरा मार्क्स जाणार होते. अंशिकाने जे केलं ते अनेकजण करतात. प्रत्येकाची चूक वेगळी असते. वेगळ्या कारणाने झालेली असते; पण या 'सिली मिस्टेक्स'मुळे एकच परिणाम होतो तो म्हणजे सगळं येत असूनही पेपर लिहिताना चुका होतात आणि हातातले मार्क्स जातात. या 'सिली मिस्टेक्स' टाळणं सहज शक्य आहे. त्यासाठी त्या का होतात आणि त्या टाळण्यासाठी काय करायला हवं, हे समजून घ्यायला हवं.
'सिली मिस्टेक्स' का होतात ?पेपरचं खूप टेन्शन घेतलेलं असेल, घाई करण्याचा स्वभाव एकाग्रतेचा अभाव, अतिआत्मविश्वास, पेपर सोडवण्याची अपुरी तयारी यामुळे सोप्पा वाटणारा पेपर सोडवतानाही चुका होतात. मुलं खूपच घाबरून जातात. अभ्यास करूनही आठवत नसल्यासारखं वाटतं, मग परीक्षा हॉलमध्ये गेल्यावर सारखं घाईघाईने काहीतरी वाचत राहातात. या गोष्टींमुळे मेंदू गोंधळतो. पेपर सोडवताना मग एखादा प्रश्नच राहून जाणे, प्रश्नाखाली उत्तरासाठी दिलेले पर्याय वाचताना एखादा पर्यायच नजरेतून सुटणे अशा चुका होतात.
पेपर हातात आल्यावर तो घाईघाईत वाचला जातो. या घाईमुळे एखादा प्रश्न चुकीचा वाचला जातो. विचारलेल्या प्रश्नाचा चुकीचा अर्थ काढला जातो. प्रश्नच चुकीचा वाचल्याने मग त्याचे उत्तरही चुकीचेच लिहिले जाते.
अभ्यासासाठी रात्री उशिरापर्यंत जागरण केलेलं असल्यास पुरेशी झोप होत नाही. अपुऱ्या झोपेमुळे अस्वस्थता येते. त्याचा परिणाम पेपर सोडवताना आवश्यक असणाऱ्या एकाग्रतेवर होतो.
परीक्षेच्या काळात आकलन, आपली अभ्यासाची तयारी, लक्ष्य, एकाग्रता, अभ्यास करताना, पेपर सोडवताना आवश्यक असलेलं वेळेचं व्यवस्थापन या प्रत्येक गोष्टीची कसोटी लागते. या गोष्टी जमल्या नाहीत की गोंधळ उडतो.
या चुका टाळायच्या कशा?
समजून उमजून पेपर लिहिण्यासाठी आधी आपलं मन शांत करणं आवश्यक आहे. विषय कोणताही असो पेपर कसा जाईल ही भीती न बाळगता पेपरला जा. परीक्षेच्या ठिकाणी वेळेआधी पोहोचावं. डोळे मिटून थोडावेळ शांत बसावं. अशा प्रकारे मन शांत केल्याने भीती कमी होते.
प्रश्नपत्रिका हातात पडल्यावर आधी ती शांतपणे दोनदा वाचा. त्यामुळे प्रश्नपत्रिकेत काय प्रश्न विचारलेय हे समजतं. जे विषय अवघड, किचकट वाटतात त्या विषयांचे आधीच्या वर्षाच्या प्रश्नपत्रिका त्या विषयाचा अभ्यास करताना सोडवून पाहाव्यात. यामुळे अवघड विषय म्हणून मनावर आलेला ताण कमी होतो.
उत्तरपत्रिकेत घाणेरडं अक्षर काढलेलं असल्यास आपण लिहिलेली उत्तरं तपासणाऱ्यांना कळतच नाही. आणि तिथे मार्क्स कमी होतात. अक्षर सुधारणं ही गोष्ट आपल्या हातात असते. पेपर सोडवून झाल्यानंतर तो काळजीपूर्वक तपासा. त्यामुळे कुठे काही लिहायचं सुटून गेलेलं असल्यास किंवा गणितासारख्या पेपरमध्ये आकडेमोड, समीकरणं, सूत्रं यात चुका झालेल्या असल्यास त्या लक्षात येऊन वेळीच दुरुस्त करता येतात.
एखादा प्रश्न अवघड असल्यास त्याचं टेन्शन न घेता पुढचा पेपर सोडवल्यास भीतीमुळे होणाऱ्या चुका टळू शकतात. जिथे मेंदूचा गोंधळ उडतो, त्यावर ताण पडतो अशा गोष्टी म्हणजे सूत्र, व्याकरणाचे नियम, ऐतिहासिक दिन, सनावळ्या हे जर परीक्षेची तयारी करताना नीट वाचलेलं असेल तर पेपर लिहिताना मेंदूचा गोंधळ उडत नाही. पेपर लिहिताना एका वेळी पूर्ण लक्ष एकाच प्रश्नावर केंद्रित करावं. एका प्रश्नाचं उत्तर लिहिताना दुसया अवघड वाटणाऱ्या प्रश्नाच्या उत्तराचा विचार करू नये. पेपर एकदम सोपा आहे, आपल्याला काय सगळंच येतं, या विचाराने पेपर लिहिताना घाई करू नये. प्रश्न वाचल्यानंतर आपण त्याचं उत्तर कसं लिहिणार, याचं प्लॅनिंग करायला हवं. ते केलं तर उत्तर लिहिताना अपेक्षित गोष्टी सुटत नाही. बर्याचदा पेपर दिल्यानंतर लक्षात येतं की, अमुक एका उत्तरात व्याख्या लिहिणं गरजेचं होतं आणि आपण ती लिहिलेलीच नाही. गणित तर सोडवलं; पण त्याआधी सूत्र लिहिणं गरजेचं होतं ते तर लिहिलेलंच नाही. पेपर सोडवताना ही काळजी घेतली तर 'सिली मिस्टेक्स' नक्कीच टाळता येतील!
Web Summary : Exam stress, haste, and lack of focus cause mistakes. Stay calm, read carefully, manage time, and prioritize sleep. Review answers to prevent errors and improve scores.
Web Summary : परीक्षा का तनाव, जल्दबाजी और एकाग्रता की कमी गलतियाँ कराती हैं। शांत रहें, ध्यान से पढ़ें, समय का प्रबंधन करें और नींद को प्राथमिकता दें। गलतियों से बचने और अंक सुधारने के लिए उत्तरों की समीक्षा करें।