इतिहासाची जुनी मढी कशासाठी उकरायची?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 09:22 AM2022-06-08T09:22:25+5:302022-06-08T09:23:20+5:30

काही गोष्टी मागे टाकून पुढे जायचे असते. आपण आज जे करतो आहोत त्यातून नवा इतिहास निर्माण करता येणार आहे काय?

Why dig up the old mound of history? | इतिहासाची जुनी मढी कशासाठी उकरायची?

इतिहासाची जुनी मढी कशासाठी उकरायची?

Next

- पवन वर्मा (राजकीय विषयाचे विश्लेषक)

आपला देश ऐतिहासिक वळणावर उभा आहे. स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे उलटून गेली असली तरी इतिहासाच्या विस्तीर्ण पटावर हा काळ अगदी छोटासा आहे; मात्र अगदी नवजात देशांनीही हे लक्षात ठेवायला हवे की आपण जे करतो त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. एखादी चुकीची घटना देशाचे भवितव्य बदलून टाकू शकते. भारतासारख्या देशानेही भूतकाळ दुरुस्त करून योग्य ते भवितव्य घडवण्याचा पर्याय स्वीकारला पाहिजे.

ज्ञानवापी मशिदीवरून निर्माण झालेला वाद यासंदर्भात महत्त्वाचा आहे. याचे कारण भूत आणि भविष्य यांच्या उंबरठ्यावर हा विषय उभा आहे. ज्ञानवापी या शब्दाचा अर्थ ज्ञानाची, शहाणपणाची विहीर. काशी विश्वनाथ मंदिराच्या जवळ ही मशीद आहे. काशी विश्वनाथ हे शंकराचे जागृत देवस्थान बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असून धार्मिकदृष्ट्या त्याचे महत्त्व मोठे आहे. मंदिर प्राचीन असून स्कंदपुराण तसेच अन्य हिंदू ग्रंथांमध्ये या मंदिराचा उल्लेख आढळतो. ११९४ मध्ये कुतुबुद्दीन ऐबक याने मंदिर उद्ध्वस्त केले.

तेराव्या शतकात एका गुजराती व्यापाऱ्याने ते पुन्हा बांधले. हुसेन शहा किंवा सिकंदर लोधी यांच्यापैकी कोणीतरी ते पंधराव्या शतकात पुन्हा पाडले. राजा तोडरमल यांनी अकबराच्या काळात त्याची पुन्हा उभारणी केली, परंतु १६६९मध्ये औरंगजेबाने हे मंदिर पाडून तेथे ज्ञानवापी मशीद बांधली. मंदिराच्या भग्न अवशेषांवर ही मशीद बांधली गेल्याचा अंदाज जेम्स प्रिन्सेस याने १८३४ साली काढलेल्या रेखाकृतीवरून येतो. शेवटी १८३० मध्ये अहिल्याबाई होळकर यांनी याच जागेवर थोडे बाजूला मंदिर बांधले.

मोगल आक्रमणाने अकराव्या शतकात हिंदू भारताला शरीर आणि मनाने उद्ध्वस्त करून टाकले यात काही शंका नाही. ए. के. वॉर्डर हे टोरांटो विद्यापीठात संस्कृत आणि भारतीय अभ्यासाचे प्राध्यापक आहेत. उपस्थित वादात ते कोणत्याच बाजूचे नाहीत. वॉर्डर लिहितात, ९ ते १३ वे शतक अशा चारशे वर्षांच्या कालखंडात भारतावर जे आक्रमण झाले ते मानवी इतिहासातील सर्वात विध्वंसक म्हटले पाहिजे. संस्कृती विषयाचा अभ्यासक विल ड्युरांट स्पष्टपणे म्हणतो, मुसलमानांनी भारत पादाक्रांत केला ही इतिहासातील कदाचित मोठी रक्तरंजित कहाणी आहे. हजारो मंदिरे जमीनदोस्त केली गेली. देवतांची विटंबना झाली. सुंदर अशी वास्तुशिल्पे तोडली गेली आणि ज्ञानाची पीठे उद्ध्वस्त केली गेली.

भारतासंबंधीच्या या ऐतिहासिक वास्तवावर सारवासारव करण्यात काहीही अर्थ नाही. मनात सद्हेतू बाळगणारे आणि हिंदू-मुस्लीम यांच्यात वैरभाव छेडला जाऊ नये याची काळजी घेणाऱ्या इतिहासकारांनी यापूर्वी ती काळजी घेतली आहे. ढळढळीत पुरावे असतील तर त्याच्याकडे कानाडोळा करता येत नाही आणि चुकीच्या इतिहासाची प्रतिक्रिया उमटतच असते. मध्ययुगात आणि त्यानंतरही केवळ लुटीच्या इराद्याने मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला. 

इतिहासात जे घडले त्याची भरपाई करण्याची इच्छा बाळगणाऱ्यांच्या हाती आधुनिक भारत सोपवावा काय, असा मुद्दा आता उपस्थित केला जात आहे. डोळ्यांवर कातडे ओढून जुनी मढी उकरून काढावीत काय? मग भवितव्याचा बळी गेला तरी चालेल. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हे असे करणे शक्य आहे काय? खंडप्राय देशामध्ये किती मशिदी तुम्ही पाडणार किंवा उत्खनन करून काढणार आणि म्हणणार, चला आता भूतकाळ दुरुस्त झाला.

केवळ आपल्याच देशात नव्हे तर सगळीकडे काळाचे मार्गक्रमण अत्यंत निष्ठूरपणे होत असते हे मान्य केलेच पाहिजे. पण आपण आज जे करतो आहोत त्यातून नवा इतिहास निर्माण करता येणार आहे काय? काही गोष्टी मागे टाकून पुढे जायचे असते हे सर्व देशांनी लक्षात घेतले पाहिजे. आपण इतिहासात किती मागे जाऊ शकतो? आर्यांपर्यंत? हिंदूंनी बुद्धांची मंदिरे नष्ट केली किंवा उलट तिथपर्यंत? ब्रिटिशांनी आपल्याला लुटले म्हणून आता आपण त्यांना व्हिसा देणार नाही का? इस्लामी आक्रमणकर्त्यांनी शतकांपूर्वी जे काही केले त्या कारणाने आजच्या मुस्लिमांकडे ते राक्षस आहेत म्हणून पाहणार? 

काही देशांनी भूतकाळाच्या जखमा रचनात्मक पद्धतीने भरून काढण्याचा प्रयत्न केला. भारतामध्ये १९९१मध्ये असाच एक प्रयत्न झाला. संसदेत पूजास्थानासंबंधी कायदा संमत झाला. त्यातील कलम ४ अन्वये असे ठरले की १५ ऑगस्ट १९४७ रोजी एखाद्या पूजास्थानाची जी काही धार्मिक स्थिती असेल ती तशीच चालू राहील. त्याचप्रमाणे १५ ऑगस्ट ४७ ला यासंबंधी न्यायालयात जी प्रकरणे शिल्लक असतील ती रद्द होतील.

नोव्हेंबर २०१९ मध्ये बाबरी मशीद वादात निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाच्या ५ सदस्यांच्या खंडपीठाने कायद्याची सुसंगतता उचलून धरली. सन्माननीय न्यायाधीशांनी असे जाहीर केले की ‘इतिहास आणि त्या काळात झालेल्या चुकांमुळे वर्तमान आणि भविष्य बिघडता कामा नये असे संसदेने केलेल्या कायद्याने स्पष्ट केले आहे. प्रतिगामी नसण्याचे आपले धोरण हे घटनेच्या मूलभूत तत्त्वांचे पायाभूत वैशिष्ट्य असून सर्वधर्मसमभाव हा गाभ्यातील घटक आहे असेही न्यायालयाने नमूद केले.

भूतकाळ मान्य केला पाहिजे परंतु त्याला भविष्य ओलीस ठेवू देता कामा नये. सर्वसामान्य भारतीयाचे अग्रक्रम काय आहेत? आर्थिक प्रगती, नोकरी, सामाजिक सलोखा, सुरक्षितता की धार्मिक वादंग सततचे अस्थैर्य, विद्वेष, हिंसाचार आणि कट्टरता? आपण भूतकाळात राहणार असू तर भारताचे एक थिजलेले उत्खनन मैदान होईल. झाल्या गेल्यावर पडदा टाकून आपण पुढे गेले पाहिजे.

Web Title: Why dig up the old mound of history?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Indiaभारत