गोहत्त्याबंदी नेमकी कशासाठी?

By Admin | Updated: April 11, 2015 00:40 IST2015-04-11T00:40:02+5:302015-04-11T00:40:02+5:30

पश्चिम बंगालमधील दलित संघटनांनी गोहत्त्यांवर घातलेल्या बंदीची टर उडविण्यासाठी कोलकाता येथे गोमांसाच्या पार्टीचे आयोजन केले होते. पण त्यांनी

Why the crime prevention? | गोहत्त्याबंदी नेमकी कशासाठी?

गोहत्त्याबंदी नेमकी कशासाठी?

बलबीर पुंज
(राष्ट्रीय उपाध्यक्ष, भाजपा)

पश्चिम बंगालमधील दलित संघटनांनी गोहत्त्यांवर घातलेल्या बंदीची टर उडविण्यासाठी कोलकाता येथे गोमांसाच्या पार्टीचे आयोजन केले होते. पण त्यांनी हे लक्षात घ्यायला हवे की गोमांसाची निर्यात थांबविण्याची आर्थिक गरज एवढी आहे की, देशाच्या निर्यात व्यवसायासाठी पशुहत्त्या थांबवणे आवश्यक झाले आहे. वास्तविक आपल्या देशात मांसाहार करणे तसेही चांगले समजले जात नाही. तसेच पशुहत्त्या हा धार्मिक बाबतीत अत्यंत संवेदनशील विषय आहे.
आपल्या देशातील लोकांना गायीचे मांस आवडते म्हणून गायींना चरण्यासाठी कुरण लाभावे यासाठी देशात जंगल वृद्धीला प्रोत्साहन द्यायचे का? ब्राझील आणि दक्षिण अमेरिकेतील अन्य राष्ट्रांनी मांसाची निर्यात करण्याच्या हव्यासापायी जंगलाचे रूपांतर जनावरांसाठी चरण्यासाठी गवत वाढविणाऱ्या जागेत करणे सुरू केले होते. उत्तर अमेरिकेतील मांसाहारी बाजारपेठेला मांसाचा पुरवठा करण्याची सत्तर आणि ऐंशीच्या दशकात ब्राझील, कोस्टारिका, होन्डुरास, अर्जेन्टीना या दक्षिण अमेरिकेतील राष्ट्रांनी मोठमोठे गवताळ प्रदेश निर्माण करून जनावरांची भूक भागविणे चालविले होते. जनावरांना लागणारे खाद्यान्न निर्माण करण्यासाठी उपजावू जमिनीचा वापर करण्यात येत होता. त्यामुळे जंगले कमी होत होती. सुरुवातीच्या काळात या राष्ट्रांकडे पैशाचा ओघ वाहत होता. पण जंगले कमी झाल्याने पावसाचे प्रमाणही कमी झाले. जमिनीचा वापर जनावरांसाठी लागणारे खाद्यान्न निर्माण करण्यासाठी होऊ लागला. त्यामुळे सुरुवातीस न दिसणारे आर्थिक परिणाम हळूहळू दिसू लागले होते.
पर्यावरणतज्ज्ञ वंदना शिवा यांच्या ‘द स्टोलन हार्वेस्ट’ या पुस्तकात याची तपशीलवार माहिती देण्यात आली आहे. ‘वर्ल्ड हंगर : बारा दंतकथा’ या पुस्तकाचे लेखक फ्रान्सिस लॅपे मूर यांनी म्हटले आहे, ‘जनावरांसाठी चारा तयार करण्याच्या हव्यासापायी अनेकांनी आपल्या शेतजमिनी विकल्या, त्यामुळे निर्माण झालेल्या भूमिहीन कुटुंबांनी शहरात स्थलांतर करून तेथे स्लम्सची निर्मिती मात्र केली आहे. अशा तऱ्हेने ४८ लाख कुटुंबांचे स्थलांतर झाले.’ हा सर्व तपशील दक्षिण अमेरिकेतील राष्ट्रांविषयी असला तरी त्यातून भारताने बोध घेण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत.
संयुक्त राष्ट्रानेही ‘कॅटल फॉर मीट इंडस्ट्री’ या उद्योगाचा निषेध केला आहे. कारण त्यामुळे भारतापेक्षा आकाराने मोठ्या असलेल्या ब्राझीलसारख्या देशाला मोठाल्या पुरांचा सामना करावा लागून दुष्काळग्रस्त परिस्थितीला तोंड द्यावे लागले होते. त्यामुळे दक्षिण अमेरिकेतील गोहत्त्या थांबविण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाला हस्तक्षेप करावा लागला.
देशातील डावे पक्ष गोहत्त्याबंदीला विरोध करीत आहेत, कारण त्यामुळे फार्मा उद्योगाला लागणारे जिलेटीन मिळेनासे झाले आहे. हे जिलेटीन जनावरांच्या हाडातून मिळते आणि त्याचा वापर फार्मा उद्योगाकडून कॅप्सूल निर्मितीसाठी करण्यात येतो. तो वापर करणे आता बंद झाले आहे, असे सांगून डावे पक्ष दिशाभूल करीत आहेत. कारण नैसर्गिक कारणांनी मरण पावणाऱ्या जनावरांच्या हाडांपासून त्यांना जिलेटीन निर्माण करता येत असते.
गोहत्त्याबंदीचे विरोधक सांगतात की, जनावरांची उपजावू क्षमता संपल्यानंतर अशी जनावरे पोसणे शेतकऱ्यांना कष्टदायक ठरत असते. आपण ऊर्जानिर्मितीसाठी कोळसा वापरत असतो. २०५० सालापर्यंत हे साठे इतके कमी होतील की आपल्याला कोळशाचा वापर पन्नास टक्क्याने कमी करावा लागणार आहे. त्याऐवजी बायोगॅसचा वापर हा पर्याय ठरू शकतो. गायीच्या शेणापासून हा बायोगॅस मिळू शकत असल्याने गायींना जगवणे फार महत्त्वाचे ठरणार आहे. तेव्हा गायींपासून दूध मिळेनासे झाले तरी तिची उपयुक्तता संपत नाही हे लक्षात घेतले पाहिजे. एकीकडे पशुहत्त्येला परवानगी द्यायची आणि दुसरीकडे वाघाची हत्त्या करणाऱ्यांना शिक्षा करायची हा विरोधाभास कुणाच्या लक्षातच येत नाही. भावनेचा प्रश्न तर दूरच राहिला.
माणसाच्या भावनांचा विचार करताना अग्रक्रम लक्षात घ्यायचे असतात. युरोप आणि अमेरिकेतसुद्धा कुत्र्याचे मास खाणाऱ्यांसाठी कुत्र्यांना ठार करण्यात येते. तेव्हा भावनांचा विचार करून त्याला विरोध करण्यात येतो. प्रत्येक राष्ट्रच लोकांच्या भावनांचा आदर करीत असते. मग ‘गोहत्त्याबंदीला विरोध कशासाठी? काही सुधारणावादी किंवा डावे पक्ष वेदांच्या काळात गोमांस खाल्ले जात होते असा दावा करीत असतात.
आता हा युक्तिवाद थांबविण्यासाठी आपण मान्य करूया की तसे कदाचित होत असेलही. पण म्हणून आपण गोमांस खाण्याचे समर्थन करायचे का? गेल्या सात हजार वर्षात परिस्थिती खूप बदलली आहे. धार्मिक मान्यतेमुळे अस्पृश्यतेचं पालन करण्यात येत होते. पण आता अस्पृश्यता संपुष्टात आली असून, घटनेनेसुद्धा ती अमान्य केली आहे. एकेकाळी सती प्रथेचे समर्थन होत होते आणि विधवा स्त्रियांना चितेवर उडी मारून आत्मदहन करावे लागत होते. तेव्हा अनेक धार्मिक प्रथांना विरोध करणारे लोक गोहत्त्याबंदीलाही विरोध करून गोमांस भक्षणाचे परंपरेच्या आधारे समर्थन करीत आहेत.
अल्पसंख्य जमाती या परंपरेने गोमांस भक्षण करणाऱ्या आहेत. पण म्हणून त्यांना नोकरीत प्राधान्य देणे नाकारता येत नाही. उलट या देशात परंपरेने आणि राजाज्ञेने गोहत्त्याबंदी अस्तित्वात होती. अशोकापासून अकबरापर्यंत गोहत्त्याबंदी अस्तित्वात होती, याचे पुरावे अस्तित्वात आहेत. १८५७च्या ब्रिटिश सत्तेविरुद्धच्या बंडानंतर मोगल सम्राट बाहदूरशाह जफर हा सत्तेवर येताच त्याने पहिले फर्मान जे काढले होते ते गोहत्त्याबंदीसंबंधी होते. पण ही ऐतिहासिक तथ्ये दाबून टाकण्यात आली होती. कारण पाश्चात्त्य वसाहतवादी सम्राटांना गोमांस लागायचे. गोहत्त्याबंदीने लोकांचा मूलभूत हक्क डावलण्यात आला, याला कोणताच आधार नाही हेच दिसून येते. उलट अनेकजण गोमातेला पूजनीय मानतात. सरकारने गेल्या ६० वर्षात सलमान रश्दी आणि तस्लिमा नसरीन यांच्या पुस्तकावर बंदी घातली होती. सेन्सॉर बोर्डाने अनेक चित्रपटांवर बंदी घातलेली आहे. तेव्हा गोहत्त्याबंदी लागू करून सरकारने लाखो लोकांच्या भावना जपण्याचा प्रयत्न केला आहे. पण या
भावनिक कारणांपेक्षा आर्थिक युक्तिवाद हा अधिक प्रभावी आहे, हिंदुत्वाच्या युक्तिवादाने त्यात भर घातली आहे इतकेच!

Web Title: Why the crime prevention?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.