संपूर्ण जग हा एकच जीव आहे

By Admin | Updated: August 2, 2015 04:25 IST2015-08-02T04:25:21+5:302015-08-02T04:25:21+5:30

संपूर्ण जग हा एकच जीव आहे ही संकल्पना अनेक संस्कृतींमध्ये आहे. ‘पिंडी ते ब्रह्मांडी’. मायक्रोकॉजम हे मॅक्रोकॉजमचेच प्रतिबिंब आहे. आपल्या शरीरात जशा स्वत:चे अस्तित्व असलेल्या करोडो पेशी

The whole world is just one life | संपूर्ण जग हा एकच जीव आहे

संपूर्ण जग हा एकच जीव आहे

- श्री श्री रविशंकर

संपूर्ण जग हा एकच जीव आहे ही संकल्पना अनेक संस्कृतींमध्ये आहे. ‘पिंडी ते ब्रह्मांडी’. मायक्रोकॉजम हे मॅक्रोकॉजमचेच प्रतिबिंब आहे. आपल्या शरीरात जशा स्वत:चे अस्तित्व असलेल्या करोडो पेशी आहेत आणि त्या सर्व मिळून आपले अस्तित्व तयार होते तसेच करोडो माणसे आणि इतर प्राणीमात्र मिळून हे जग बनते.

आपले अस्तित्व हे बाकीच्या जगापासून अलग नाहिये. ही संकल्पना आध्यात्मिक वाटत असली तरी आपल्याला नेहमी दिसणाऱ्या सामाजिक आणि वैश्विक परिस्थितीशी ती अगदी मिळतीजुळती अशी आहे. शेजारच्या घराला आग लागलेली असेल आणि आपण काहीच न करता बसून राहिलो तर थोड्याच वेळात ती आग आपल्या घरापर्यंत पोहोचेल.

आज जगातील अनेक भागांत ज्वलंत समस्या आहेत. सिरीया आणि इजिप्तसारख्या अनेक देशांतील सरकार आणि अधिकारी यांना आज संघर्षग्रस्त भागात बळाचा वापर करावा लागत आहे. कधीकधी अगदी टोकाच्या परिस्थितीत गरजेचा असला तरी असा दृष्टिकोन म्हणजे एक प्रतिक्षिप्त क्रिया असते आणि कालांतराने प्रश्न आणखीनच गुंतागुंतीचा होतो.
रोग पसरल्यानंतर त्यावर उपाययोजना करण्यापेक्षा आधीच आरोग्य आणि स्वच्छतेची काळजी घेऊन रोगाचा प्रबंध करणे जास्त चांगले. जसे आपल्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी स्वयंप्रेरित असणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे जगात शांतता आणि सलोखा टिकण्यासाठी स्वयंप्रेरित होणे गरजेचे आहे.
मुलांना जर विविध संस्कृतींची चांगली अशी ओळख करून दिली तर धर्मांधता दूर होईल. मुलांमध्ये सेवावृत्ती जोपासणे हा भ्रष्टाचाराला प्रबंध करण्याचा चांगला मार्ग ठरू शकेल. त्यामुळे जगात शांतता आणण्यासाठी, मानवी मूल्ये असलेले, विविधतेचा सन्मान करणारे असे योग्य शिक्षण गरजेचे आहे. जगातील अगदी थोडेच भीती पसरवण्यास कारणीभूत असतात, सगळे लोक नाही. या जगातील सात अब्ज लोकांपैकी काही हजार लोक गुन्हे करतात आणि संपूर्ण जगावर त्याचा परिणाम होतो. याच नियमानुसार उलटेही काम होऊ शकत नाही का? आपण काही हजार लोक, जे खरोखरच शांत, प्रेमळ आणि संपूर्ण जगाची काळजी घेणारे आहोत, आपण परिवर्तन घडवू शकत नाही का? ‘मी काय करू शकतो’ किंवा ‘एकाने काय होणार’ असा विचार करू नका.
जगात खळबळ माजलेली असताना प्रत्येकाची काहीतरी जबाबदारी असते. एका होमिओपॅथिक गोळीत ८० किलोचे शरीर बरे करण्याची शक्ती असते. त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीचा परिणाम या अंतरीक्षावर, या विश्वावर होत असतो.
आपल्यातून जेव्हा शांती आणि चांगल्या लहरी उत्सर्जित होतात तेव्हा त्याचा नक्कीच परिणाम होतो. आपल्यापैकी ज्या भाग्यवंतांना आपल्यात काहीशी शांती अनुभवाला आली आहे त्यांनी आता, अशांत असलेल्या सर्व लोकांपर्यंत पोहोचण्याचे तसेच जगातील ज्या देशात आणि जगातील ज्या भागात संघर्ष चालू आहे अशा भागात पोहोचण्याचे आव्हान स्वीकारायचे आहे.
आपण सर्व एक असल्याचे ज्ञान आपण जगात पसरवले तर लोक संकुचित वृत्तीतून बाहेर येतील. जीवनाबद्दलचा एक व्यापक दृष्टिकोन ठेवला तर मानवी मूल्ये चेतवली जातील; आणि त्यामुळे विविधतेत एकता आणि एकतेत विविधता दिसून येईल.

Web Title: The whole world is just one life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.